पारंपरिक शिवजन्मोत्सवही आता दोन गटांमध्ये विभागला! नवा पायंडा; संगमनेरात पहिल्यांदाच शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन मिरवणुका..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या दोन दशकांपासून तारखेनुसार की तिथीनुसार या वादात अडकलेला मात्र शिवसेनाप्रमुख, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी तिथीचाच पुरस्कार केलेला शिवजन्मोत्सव यंदा दोन गटांत विभागला गेला आहे. गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेच्यावतीने तिथीनुसार साजर्या होणार्या या उत्सवाच्या दिनी ठिकठिकाणी मिरवणूका काढल्या जातात. मात्र आता शिवसेनेतच दोन गट निर्माण होवून पक्ष आणि पक्षचिन्ह एका गटाकडे गेल्याने शिवसेनेची पारंपरिक मिरवणूक कोणाची? असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर सामंजस्याने तोडगा निघावा असे प्रशासनाला अपेक्षित असताना त्यावर दोन्ही गटाचे एकमत न झाल्याने अखेर पोलिसांनी शिवसेनेला (शिंदे गट) दुपारी तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सायंकाळी पारंपरिक वेळेला मिरवणूक काढण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी संगमनेरात शिवसेनेच्या दोन मिरवणुका कधीही निघाल्या नव्हत्या, यानिमित्ताने आता हा नवा पायंडाही सुरू झाला आहे.
राज्यातील सत्तासंघर्षानंतर गेल्या सहा-आठ महिन्यांपासून राज्यात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. शिवसेना आमचीच, आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक असे ठणकावत दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे सुरु असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व पक्षाचे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धावही घेतली आहे आणि त्यावर ‘सर्वोच्च’ निर्णय येणंही प्रलंबित आहे. मात्र आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाकडून ठाणे-मुंबईतील शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्याचे काही प्रकार समोर येत आहेत.
त्यातच गेल्या काही दशकांपासून शिवसेनेचा उत्सव अशी ओळख निर्माण झालेल्या तिथीनुसारच्या शिवजयंती उत्सवावरुनही या दोन्ही गटात संघर्ष होण्याची चिन्हे होती, त्यानुसार संगमनेरात घडलेही तसेच होते. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या ठाकरे गटाला निर्णय होईस्तोवर पूर्वीप्रमाणेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि धगधगती मशाल हे चिन्ह आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल-तलवार हे चिन्ह वापरण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आयोगाच्या निर्णयाला तूर्त स्थगिती असल्याचे स्पष्ट आहे. अशा स्थितीत ठाकरे गटाकडून 21 फेब्रुवारी तर शिंदे गटाकडून 24 फेब्रुवारी रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र अर्जाद्वारे शिवसेनेच्या पारंपरिक शिवजयंती मिरवणुकीवर दावा सांगण्यात आला.
यातून वाद निर्माण होवू नये यासाठी शहर पोलिसांनी सुरुवातीला दोन्ही गटाच्या प्रमुखांसह काही मोजक्या कार्यकर्त्यांना बोलावून त्यांची मते जाणून घेतली. त्यातून दोन्ही गट आपापल्या ‘बॅनर’खाली मिरवणुका काढण्याचा आग्रह करु लागले. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांनी दोन्ही गटांनी सामंजस्याने निर्णय घेवून एकच मिरवणूक काढावी व महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा हा उत्सव आनंदाने साजरा करावा असे आवाहन केले व त्या बैठकीत परवानगीचा निर्णय टाळला. दरम्यानच्या काळात शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांची मुख्यालयात बदली झाली व त्यांच्या जागी नाशिक ग्रामीणमधून भगवान मथुरे यांची शहर निरीक्षकपदी नियुक्ती झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आता अवघ्या दोन दिवसांवर आल्याने शिवजयंतीची पारंपरिक मिरवणूक कोणाची याचा निर्णय होणे आवश्यक होते. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही गटांना पुन्हा पाचारण करुन एकमताबाबत विचारणा केली असता तसे काही घडल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव पोलिसांनी दोन्ही गटांना त्यांच्या अर्जानुसार स्वतंत्र परवानगीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडून नगरपालिकेजवळून निघणारी सायंकाळची मिरवणूक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून काढण्यास शहरप्रमुख अमर कतारी यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षीची शिवसेनेची पारंपरिक मिरवणूक ठाकरे गटाकडून निघणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
तर, शिवसेनेच्या शिंदे गटाकडून शहरप्रमुख विकास भरीतकर यांनी दिलेला अर्ज निकाली काढतांना पोलिसांनी त्यांना त्यांच्या पद्धतीने दुपारी मिरवणूक काढून ती सायंकाळच्या मिरवणुकीपूर्वी विसर्जीत करण्याच्या अटीवर परवानगी दिली आहे. या मिरवणुकीची वेळ आणि मार्ग कसा असेल याबाबत शिंदे गटाचे तालुकाप्रमुख रमेश काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यावर विचार सुरू असल्याची प्रतिक्रिया दिली. या माध्यमातून राज्यातील सत्ता संघर्षात स्वराज्य निर्माते, महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीही दोन गटांत विभागली गेली आहे. पक्षातंर्गत अनेक गट असले तरीही यापूर्वी शिवसेनेच्या शिवजयंती उत्सवाबाबत मात्र कधीही वेगळी विचारधारा निर्माण झाली नव्हती. सत्ता संघर्षाची धग मात्र आता या उत्सवालाही बसली असून पारंपरिक मिरवणुकीच्या दोन भागांचा नवा पायंडा या वर्षीपासून रुजण्यास सुरुवात होणार आहे.