राजकीय गर्तेत अडकला म्हाळुंगी नदीवरील पूल! कोसळलेल्या पुलाची वर्षपूर्ती; संतप्त नागरिक धक्कातंत्राच्या तयारीत..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मोठ्या लोकसंख्येसह शेकडो विद्यार्थ्यांचा रोजचा वावर असलेला म्हाळुंगी नदीवरील स्वामी समर्थ केंद्राजवळचा पूल कोसळून वर्ष होत आले आहे. मात्र त्याच्या दुरुस्तीबाबत अद्यापही कोणतीच हालचाल दिसत नसल्याने साईनगर, पंम्पिंग स्टेशन परिसरातील हजारो नागरिकांसह सराफ विद्यालय व ओहरा महाविद्यालयाच्या शेकडो विद्यार्थ्यांची आजही परवड सुरुच आहे. विशेष म्हणजे स्थानिक भाजप पदाधिकार्यांनी येथील रहिवाशांच्या अडचणी सोडवण्याऐवजी या पुलाचा वापर आपल्या राजकारणासाठी केल्याने शहरातील विकासकामे बंद करुन वळविण्यात आलेला सात कोटी रुपयांचा निधी प्राप्त होवूनही पुलाच्या दुरुस्तीबाबत कोणतीही प्रक्रिया सुरु झालेली नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून केवळ राजकीय आश्वासनांची खैरात वेचणार्या येथील नागरिकांमध्ये संतापाच्या लाटा उसळू लागल्या असून पालिकेविरोधात आता नव्याने आंदोलनाचे हत्यार उपसण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.
ठेकेदार आणि कमिशन या सूत्राने चालणार्या संगमनेर नगरपरिषदेच्या कारभाराबाबत वेगळे काही सांगण्याची आवश्यकता नाही. याच सूत्रातून जन्माला आलेल्या एका आडहत्यारी ठेकेदाराने म्हाळुंगी नदीपात्रातून गटारीचे पाईप टाकताना कोणताही विचार न करता चक्क पुलाचा पायाच उकरण्याचा प्रताप केला होता. त्याचा परिणाम त्यानंतरच्या पावसाळ्यात आलेल्या पुराच्या पाण्याने पुलाच्या एका बाजूचा संपूर्ण भरावच वाहून नेला आणि गेल्या वर्षी १३ ऑटोबर रोजी दुपारी एकच्या सुमारास हजारो नागरीक आणि विद्यार्थ्यांना दररोज वाहून नेणारा हा पूल स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या बाजूने खाली बसला. तेव्हापासून या पुलावरुन होणारी संपूर्ण वाहतूक पूर्णतः बंद आहे.
सदरचा पूल खचला त्यावेळीही पालिकेत प्रशासक राज होते जे आजही कायम आहे. अशाही स्थितीत पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी नागरी गरज लक्षात घेवून गेल्या वर्षीच्या पुरात वाहून गेलेल्या कच्च्या पुलाला नवसंजीवनी देवून अवघ्या आठच दिवसांत पर्यायी मार्ग निर्माण करुन नागरिकांच्या अडचणी काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या सर्व घडामोडींना आता वर्ष होत आले आहे. असे असतानाही अद्यापपर्यंत या पुलाबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याने या पुलावरुन दररोज शहरात ये-जा करणार्या नागरिकांच्या संतापात भर पडायला सुरुवात झाली आहे.
दरम्यानच्या वर्षभरात स्थानिक भाजपा पदाधिकार्यांनी ‘लोणी’चे बळ वापरत जोमाने सुरु असलेल्या पालिकेच्या कचेरी समोरील व्यापारी संकुलाचे बांधकाम बंद पाडले व त्या संकुलाच्या कामासाठी राज्य सरकारकडून प्राप्त झालेला सात कोटी रुपयांचा निधी साडेचार कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या म्हाळुंगी नदीच्या पुलासाठी वळविला. या सगळ्या गोष्टींनाही आता सहा महिन्यांचा काळ लोटला आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी पालिकेच्या व्यापारी संकुलाचा निधी रोखण्यात आला, त्यावेळी पालिकेने त्या संकुलाच्या दुसर्या व तिसर्या मजल्याच्या कामासाठी निविदा सूचनाही प्रसिद्ध केली होती. असे असतानाही स्थानिक राजकारणाने ती प्रक्रिया थांबवण्यास भाग पाडले.
सदरील निधी वळविण्याबाबतचा शासन आदेश प्राप्त होताच स्थानिक भाजप पदाधिकार्यांनी परिसरातील नागरिकांच्या भेटी घेवून मोठ्या बढाया मारल्या. मात्र त्याही आता हवेतच विरल्या असून पुढील आठवड्यात या पुलाला कोसळून वर्ष होत असतानाही अद्यापपर्यंत मिळालेल्या निधीतून पुलाचे काम करण्याबाबत कोणतीही हालचाल झाल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे साईनगर व पंम्पिंग स्टेशन परिसरात राहणार्या नागरिकांचा संताप अनावर झाला असून शासनाला जाग आणण्यासाठी व्यापक स्वरुपाचे आंदोलन उभारण्याची आणि स्थानिक प्रशासनाविरोधात धक्कातंत्र राबविण्याची योजना आखली जात आहे. त्यासाठी आज (ता.३) परिसरातील नागरिकांची बैठकही बोलावण्यात आली असून त्यात कृती समितीच्या स्थापनेसह आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. राज्यात भाजप-सेना (शिंदे गट) सरकार स्थापन झाल्यापासून संगमनेरात सुरु असलेल्या विकासकामांना खीळ घालण्याचे प्रकार वाढले असून त्यात कचेरी समोरील पालिकेच्या बहुउद्देशीय व्यापारी संकुलासह म्हाळुंगी नदीच्या पुलाचाही त्यात समावेश झाला आहे. स्थानिक पदाधिकारी नागरी सुविधेपेक्षा मिळालेल्या राजकीय शक्तीचा वापर उणेदुणे काढण्यातच वाया घालीत असल्याने गेल्या वर्षभरापासून पुलाअभावी प्रचंड त्रास सहन करणार्या नागरिकांचा संताप आता अनावर होवू लागला आहे. त्याचे दृश्य परिणाम येणार्या काळात अधिक ठळकपणे समोर येण्याची दाट शयता आहे.
म्हाळुंगी नदीवरील मोठा पूल खचल्याने पालिकेने दुचाकी व तीनचाकी वाहने जातील अशा आकाराचा समांतर कच्चा पूल उभारुन नागरिकांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हाळुंगी नदीला आलेल्या पाण्याने सदरील पुलही आता कमकुवत व धोकादायक बनला असून तो कोणत्याही क्षणी खचण्याची दाट शक्यता आहे. त्याच कारणाने विसर्जनाच्या दिनी पालिकेने या पुलावरुन होणारी संपूर्ण वाहतूक थांबविली होती.