भोजापूर चारीतून ओव्हरफ्लोचे पाणी आल्याने शेतकरी आनंदी आमदार थोरातांचा पाठपुरावा; निळवंडेतूनही पाणी सोडण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने निमोण-तळेगाव पट्ट्यातील गावांना भोजापूर चारीद्वारे धरणाचे पाणी देण्यासाठी काम झाले आहे. यावर्षीही आमदार थोरात यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यातून भोजापूरच्या चारीला ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आल्याने दुष्काळग्रस्त गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भोजापूर धरण हे निमोण परिसरातील गावांसाठी वरदान ठरले आहे. यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाला मात्र पावसाळ्याच्या उत्तरार्धात पट्टाकिल्ला परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यावर्षी संपूर्ण तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते की काय अशी भीती आहे. यावर तातडीने उपाययोजना व्हावी याकरीता माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे तातडीने पाणी सोडावे अशी मागणी सरकारकडे केली होती. समवेत टंचाई आढावा बैठक घेऊन पिण्याचे पाणी जनावरांचा चारा व रोजगार हमीच्या कामाबाबत प्राधान्यक्रम द्यावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.
निमोण पंचक्रोशीतील गावांसाठी भोजापूर धरणातून तातडीने पाणी सोडावे अशी मागणी शासनाकडे केली होती. याच मागणीसाठी निमोण, नान्नज दुमाला, तळेगाव परिसरातील विविध गावांमधील शेतकरी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती. यासाठी गावोगाव बैठकही झाल्या. तसेच आमदार थोरात यांचा सततचा पाठपुरावा व सोबत कार्यकर्त्यांची मागणी यामुळे प्रशासनावर दबाव येऊन धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने चारीला ओव्हरफ्लोचे पाणी सुटले आहे. यामुळे सोनेवाडी, पळसखेडे, निमोण, कर्हे, पिंपळे, नान्नज या गावांबरोबरच उर्वरित गावांमध्येही ओव्हरफ्लोचे पाणी येणार आहे.
निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची मागणी…
आमदार बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी परिस्थितीत जनतेला दिलासा देण्याकरीता शासनाने तातडीने निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावे अशी मागणी केली आहे. सध्या भंडारदरा व निळवंडे धरण हे पूर्ण क्षमतेने भरले असून कोणतेही राजकारण न करता ओव्हरफ्लोचे पाणी तातडीने दुष्काळी भागाला मिळावे अशी आग्रही मागणीही थोरात यांनी सरकारकडे केली आहे.