डोहात बुडालेल्या ‘त्या’ दोघा तरुणांचे मृतदेह सापडले! फोफसंडीतील दुर्देवी घटना; तब्बल दहा तास सुरु होते शोधकार्य..


नायक वृत्तसेवा, अकोले
निसर्ग पर्यटनासाठी अकोले तालुक्यातील फोफसंडीत गेलेले संगमनेर तालुक्यातील कनोलीचे दोघे तरुण पाणवठ्याच्या डोहात बुडाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी घडली होती. बचावलेल्या दोघांकडून गावकर्‍यांना हा विषय समजल्यानंतर काल सायंकाळपासूनच त्यांचा शोध सुरु झाला होता. मात्र अपुरा प्रकाश, तुफान पाऊस आणि उफाळलेल्या ओढ्यांमुळे रात्री शोधकार्य थांबवण्यात आले. आज सकाळी प्रशासनाच्या विविध विभागांकडून पुन्हा शोध मोहीम सुरु झाल्यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत. अकोले ग्रामीण रुग्णालयात त्यांची उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या घटनेने कनोली गावच्या पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

याबाबत राजूर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यातील कनोली येथे राहणारे अभिजीत दत्तु वर्पे, पंकज कमलाकर पाळंदे, सिद्धांत व सिद्धार्थ दादासाहेब वाबळे हे चौघे तरुण दोन दुचाकीवरुन तालुक्यातील फोफसंडी येथे निसर्ग पर्यटनासाठी आले होते. अतिशय दुर्गम भागात मोडणार्‍या या परिसरातील डोंगरदर्‍या आणि जलप्रपात पाहून दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही मंडळी फोफसंडी परिसरात पाणवठ्याचा डोह म्हणून ओळखल्या जाणार्‍या ठिकाणी आले. उंच कड्यावरुन झेपावणारा दुधाळ प्रपात आणि त्याच्या पुढ्यात असलेला पाणवठा, आसपास हिरवाईने नटलेला परिसर, त्यातून फेसाळत खळाळणारे ओहोळ पाहून उत्साहित झालेल्या या तरुणांना जलप्रपाताच्या पार्श्वभूमीवर पाणवठ्याच्या कडेला उभे राहून सेल्फी घेण्याचा मोह झाला.

मात्र त्या गडबडीत सेल्फी घेणार्‍या अभिजीतच्या हातातील मोबाईल निसटून थेट डोहात पडला. सदरील मोबाईल पाण्यात खाली जात असल्याचे पाहून त्याने तो पकडण्याचा प्रयत्न केला, पण निसरड्या जागेमुळे त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. परंतु या पाणवठ्याची खोली अधिक असल्याने आणि त्यातच त्याला पोहताच येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. ते पाहून पोहता येत असलेल्या काठावरील तिघांतील पंकज पाळंदे याने आपल्या मित्राला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र प्रकृतीच्या नियमानुसार बुडणार्‍याने त्याला मिठी मारल्याने अवघ्या काही क्षणात दोघेही खोली असलेल्या डोहात बुडाले.

अचानक घडलेला हा सगळा पाहून काठावर असलेले सिद्धांत व सिद्धार्थ वाबळे हे दोघे भाऊ प्रचंड घाबरले आणि त्यांनी आरडाओरड करीत मदतीसाठी गावाच्या दिशेने धाव घेतली. फोफसंडीत असलेला पाणवठ्याचा हा डोह गावाच्या एका बाजूला असून उंचावरुन खळाळत कोसळणार्‍या धबधब्याच्या पाण्याने त्याची खोली वाढली असून खालच्या भागात कपारी तयार झालेल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थही या डोहापासून दूर राहतात. त्यामुळे घटना घडली त्यावेळी आसपास कोणीही नसल्याने मदतीची याचना करणार्‍यांना निसरड्या पायवाटेने गावात जावे लागले.

सदरची घटना समजताच फोफसंडीचे सरपंच सुरेश वळे, ग्रामसेवक संजय दुशिंग, चिमाजी उंबरे, दत्तू मुठे आदिंनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गावातील पोहणार्‍या काहींच्या मदतीने त्यांनी शोधकार्य सुरु करुन याबाबत राजूर पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, पोलीस शिपाई अशोक गाढे व विजय मुंढे यांनी आवश्यक सामग्री योबत घेत सायंकाळी घटनास्थळाकडे धाव घेतली. तत्पूर्वी अकोले आपत्ती व्यवस्थापन व वन्यजीव विभागाचे कर्मचारीही तेथे हजर झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर संगमनेरहून त्यांचे नातेवाईकही फोफसंडीत दाखल झाले. डोहात बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध सुरु असतानाच सायंकाळी सातच्या सुमारास पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने आणि त्यातच काळ्याकुट्ट ढगांमुळे मिट्ट काळोख पसरल्याने शोधकार्यात अडथळा निर्माण झाला, त्यामुळे रात्री आठच्या सुमारास शोधकार्य थांबविण्यात आले.

आज (ता.३०) सकाळपासून पुन्हा बुडीतांचा शोध सुरु करण्यात आला. यावेळी पोलीस, वन्यजीव व आपत्ती टीमसह फोफसंडीतील ग्रामस्थ व पोहणार्‍यांनी प्रशासनाला सहकार्य करीत शोधकार्याला वेग दिल्याने सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास खोल असलेल्या पाणवठ्याच्या या डोहाच्या तळाशी कपारीत अडकलेल्या दोघाही मित्रांचे मृतदेह आढळून आले. त्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांची ओळख पटविण्यात आली असता मयत झालेल्यांमध्ये अभिजीत दत्तू वर्पे (वय २७) व पंकज कमलाकर पाळंदे (वय २७, दोघेही रा.कनोली) यांचा समावेश असल्याचे समोर आले.

या घटनेत मृत्यू पावलेल्या अभिजीत वर्पे याचे अकोल्यात इलेट्रीक दुचाकीच्या बॅटरीचे दुकान असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्याला फोफसंडीचा परिसर आणि तेथील निसर्ग सौंदर्याबाबतची माहिती होती. तर पंकज पाळंदे हा तरुण मूळचा राहाता तालुक्यातील असल्याचे मात्र सध्या कनोलीत वास्तव्यास असल्याचे समजते. ऐन उमेदीत असलेल्या दोघा कर्तृत्ववान तरुणांचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने संगमनेर तालुक्यासह अकोल्यातही शोककळा पसरली आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.


डोंगरमाथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक असल्याने तालुक्यातील अनेक ठिकाणं निसर्गसौंदर्याने नटलेली आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. मात्र सततच्या पावसामुळे हा परिसर निसरडा आणि धोकादायक झालेला आहे, त्यामुळे अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असते. सदरची घटना घडलेला डोह अवघ्या दहा बाय दहा फूट आकाराचा मात्र रांजन खळग्यांप्रमाणे पोटात आडव्या आणि खोलगट कपारी असलेला आहे. या डोहात स्थानिक नागरिकही उतरण्यास धजावत नाहीत. पर्यटकांनी अनोळखी पाणवठ्यात उतरण्याचा मोह टाळण्याची गरज आहे.
– प्रवीण दातरे
सहाय्यक पोलीस निरीक्षक, राजूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *