… आणि जिल्हा न्यायाधीशांना पाहताच जुगार्‍यांनी ठोकली धूम! घुलेवाडी जि. प. शाळेतील प्रकार; बीडीओ, तहसीलदार, शिक्षणाधिकार्‍यांसमोर घडला प्रकार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणासंदर्भात दाखल याचिका निकाली काढण्याच्या प्रक्रियेत औरंगाबाद उच्च न्यायालयाने तालुकास्तरावर समित्यांची स्थापना केली आहे. प्रथम वर्ग जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील संगमनेरच्या समितीत गटविकास अधिकारी, तहसीलदार व शिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे. या समितीने सोमवारी घुलेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी शाळेच्या आवारातील एका भिंतीच्या आडोशाला काहीतरी गोंधळ असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी तेथे जावून पाहिले असता तिघे जुगार खेळत होते. त्यातील दोघांनी साहित्य उचलून पळ काढला, तर एकजण पकडला गेला.

बालमनावर शिक्षणाचे सिंचन करुन त्यांना जबाबदार नागरिक म्हणून घडवण्यात सिंव्हाचा वाटा असलेल्या जिल्हा परिषदांच्या मराठी शाळा राष्ट्र निर्माणाच्या प्रक्रियेत खूप महत्वाच्या आहेत. मात्र एकूणच भारतात शिक्षणासाठीच्या खर्चाची तरतूद आजही दुय्यमच असल्याने उत्तम शिक्षक असूनही या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा मात्र अपूर्‍या संसाधनांमुळे खालावत आहे. शिक्षण क्षेत्राच्या वाढत्या खासगीकरणाशी स्पर्धा करताना सरकारी शाळा कमी पडत असल्याने अनेक उपक्रमशील शिक्षक व ग्रामस्थांनी पुढाकार घेवून शाळांचे सौंदर्य वाढवले आहे.

निमजसारख्या छोट्या गावातील शाळेत सुनील नवले या उप्रकमशील शिक्षकाने बायोगॅसची निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारला आहे. त्यावरच शाळेचा पोषण आहार शिजवला जातो हे खूप कौतुकास्पद आहे. मुलांच्या सहभागातून त्यांच्यात पर्यावरणाविषयी जाणीवा जागृत करीत त्यांच्याचकडून वेगवेगळ्या झाडांचे रोपण करुन त्याच्या संगोपनाची जबाबदारीही विद्यार्थ्यांवरच सोपविली गेली आहे. गावकर्‍यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवित शाळेच्या सुशोभीकरणात हातभारही लावला आहे. अशीच उदाहरणे जिल्ह्यात शेकड्याने मोजली जातील इतकी आहेत. अकोल्यात भाऊसाहेब चासकर, नगरात हेरंब कुलकर्णी यांच्यासारखी माणसं अशावेळी चटकन डोळ्यासमोर उभी राहतात.

घुलेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतही अशाच पद्धतीने शिक्षणाचे काम सुरु आहे. वास्तविक या शाळेच्या कार्यक्षेत्रात मागासलेल्या समाज बांधवांच्या अनेक वसाहती असल्याने या शाळेचे कामही जास्त आणि तणावाचे आहे. अशाही स्थितीत तेथील शिक्षकवृंद मुलांवर शिक्षण संस्कार करण्याचे कर्तव्य अव्याहतपणे बजावत आहेत. समितीच्या सदस्यांनी ज्यावेळी शाळेच्या कार्यपद्धतीची पाहणी केली, त्यावेळी सगळ्याच सदस्यांनी समाधान व्यक्त केले. सगळे काही व्यवस्थित असताना जाता जाता मात्र एक धक्कादायक प्रकार घडला.

समितीचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश दिलीप घुमरे शाळेच्या कार्यालयापासून पुढे परिसराची पाहणी करीत असताना त्यांना एका भिंतीच्या आडोशाला काहीतरी हालचाल दिसली. त्यांनी आपल्या अंगरक्षकासह तेथे जावून पाहिले असता तिघेजण पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे त्यांना दिसले. त्याचवेळी त्यातील दोघांनी बसण्यासाठी अंथरलेली चादर, पत्ते, पैसे व अन्य साधने घेवून तेथून पळ काढला. तर प्रवीण डावरे या अंगरक्षकाने अनिल दिलीप तामचीकर (वय २१, भाटवस्ती, घुलेवाडी) याला पकडले. शहर पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.

याप्रकरणी प्रवीण डावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी अनिल तामचीकरसह पसार असलेल्या शुभम मच्छिंद्र तामचीकर, शिवा मायरेकर (दोघेही रा.भाटवस्ती) यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षणासारखे पवित्र कार्य सुरु असलेल्या ठिकाणी जुगार खेळणार्‍या तामचीकर याची जिल्हा न्यायाधीश घुमरे यांनी चांगलीच कानउघडणी केली. या प्रकाराने मोठ्या परिश्रमाने आणि समर्पित वृत्तीने ज्ञानदान करणार्‍या शिक्षकांच्या आनंदात मात्र विरजण पडले.

Visits: 204 Today: 3 Total: 1101405

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *