राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा बोलबाला गुरुग्राममध्ये पार पडली स्पर्धा; चौदा सुवर्णसह अठ्याहत्तर पदकांची लयलुट


नायक वृत्तसेवा, संगमनेर
हरयाणातील गुरुग्राममध्ये पार पडलेल्या 26 व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत संगमनेरच्या गीता परिवाराच्या दैनंदिन कराटे वर्गातील मुलांचाच बोलबाला बघायला मिळाला. कराटेच्या विविध चार प्रकारात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत संगमनेरातील 49 स्पर्धकांनी सहभाग नोंदवताना 14 सुवर्णपदकांसह एकूण 78 पदकांची कमाई केली. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यातील स्पर्धकांचा मोठा सहभाग होता.

ओकिनावा मार्शल आर्टच्यावतीने गुरुग्राम येथील इन्फीनिटी बॅडमिंटन अकादमीत झालेल्या चार दिवशीय स्पर्धेत महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तेलंगाणा, हरयाणा, पंजाब, दिल्ली, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक या राज्यांमधून सातशेहून अधिक कराटे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. काता आणि कुमिती या मार्शल आर्टमधील सांघिक आणि वैयक्तिक प्रकारात या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात गीता परिवाराच्या दैनंदिन कराटे वर्गातील 19 मुलींनी सहभागी होताना या दोन्ही प्रकारात तीन सुवर्ण, सात रौप्य व 22 कांस्यपदकांची कमाई केली.

तर मुलांच्या गटात सहभागी झालेल्या संगमनेरच्या तीस स्पर्धकांनी या संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व गाजवताना 11 सुवर्णपदकांसह 16 रौप्य व 23 कांस्यपदके मिळवली. या एकूण स्पर्धेत गीता परिवाराच्या कराटेपटूंनी एकूण 14 सुवर्ण, 23 रौप्य व 41 कांस्यपदकांसह 78 पदके मिळवताना नवा विक्रमही केला. दत्ता भांदुर्गे, प्रमोद मेहेत्रे, विकास गुंजाळ, आशुतोष गायकवाड, ऋषीकेश कडूस्कर, अश्वीनी कोळी, सचिन राजपूत, ओम जोर्वेकर व शुभम गायकवाड यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे.

Visits: 190 Today: 2 Total: 1104384

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *