भूतबाधा झाल्याची भीती दाखवून मांत्रिकाचा विवाहितेवर अत्याचार..! गुन्हा दाखल होताच तालुका पोलिसांनी आवळल्या मांत्रिकाच्या मुसक्या…
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडच्या प्रचंड संक्रमणामुळे संपूर्ण तालुक्यात भीतीदायक वातावरण निर्माण झालेले असताना संगमनेर तालुक्यातील दुष्काळी परिसर समजल्या जाणाऱ्या पारेगाव बु. परिसरातून अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक अशी घटना समोर आली आहे. येथील एका पंच्चावन्न वर्षीय मांत्रिकाने एका 45 वर्षीय विवाहितेला भूतबाधा झाल्याची भीती दाखवून मध्यरात्री तिला तिचा नवरा व मुलासमोर बळजबरीने दारु पाजून, तिला शेतात नेऊन अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पारेगाव बु. येथील सावित्रा बाबुराव गडाख याच्याविरोधात बलात्कारासह जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुका पोलिसांनी मांत्रिकाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत 45 वर्षीय पीडितेने संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात राहणाऱ्या एका 45 वर्षीय विवाहितेच्या भावाने आपली बहीण सतत अशक्त राहते, तिला चक्कर येतात या कारणाने पाच वर्षांपूर्वी पारेगाव बु. येथील भोंदू मांत्रिक सावित्रा बाबुराव गडाख याच्याकडे आणले होते. यावेळी बाबाने मंत्रतंत्र करून तिच्या अंगावरून लिंबू ओवाळून फेकली. सोबत तिला ताईतही बांधला व अंगारा-धुपाराही दिला व तो पाण्यातून घेण्यास सांगितला. त्यानंतर संबंधित पीडितेने आपल्या घरी जाऊन त्याप्रमाणे केले असता काही दिवस तिला आराम वाटल्यासारखे जाणवले. इतकी वर्ष औषधोपचार करून, हजारो रुपये खर्च करूनही गुण आला नाही. पण बाबाच्या अंगारा-धुपाऱ्याने गुण आल्याने संबंधित विवाहिता आपल्या पतीसह नेहमी पारेगाव बु. येथे भोंदू मांत्रिक बाबा सावित्रा गडाख यांच्याकडे येत असत. अलीकडच्या काळात संबंधित बाबा या दांपत्याला पारेगावला येताना दारूच्या बाटल्या घेऊन येण्यास सांगत असे. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.
मात्र एप्रिल मध्ये संबंधित विवाहितेचे दुखणे वाढल्याने 23 एप्रिल रोजी त्यांनी बाबाला फोन करून त्याबाबत सांगितले. त्यावर बाबाने दारूच्या बाटल्या, भेळीचा पुडा व विडीचे बंडल घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार सदरचे दाम्पत्य आपल्या मुलासह रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बाबाच्या वस्तीवर पोहोचले. मात्र त्या ठिकाणी आधीच माणसे आलेली असल्याने त्यांचे काहीतरी काम सुरू होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास बाबाने सदर विवाहितेला पती व मुलासह बोलवले. यावेळी हिला भूतबाधा झाली असून भूत उतरवावे लागेल. त्यासाठी तिला दारु पाजावी लागेल, असे सांगून त्याने बळजबरीने पीडितेचे दोन्ही हात धरून तिला दारू पाजली. त्यानंतर त्याने दिला एकटीलाच आपल्या शेतातील पोल्ट्री फार्मच्या पाठीमागील बाजूस नेले व तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले. त्यावेळी या महिलेने हे पाप आहे असे त्या भोंदूबाबाला सांगितले, मात्र ‘मदांध’ बाबाने त्यावर हे पाप नाही प्रेम आहे, याच्यात एका सलाईनची पावर आहे. तुला दोनवेळा माझ्याकडे यावे लागेल. असे सांगून तो घराच्या दिशेने निघून गेला.
या घटनेने घाबरलेली पीडिता बराच वेळ तिथे तशीच पडून होती. त्यानंतर पहाटे 5 वाजता घरी पोहोचल्यानंतर ती घरात एकटीच रडत बसल्याने तिच्या पतीने तिच्याकडे विचारणा केली. त्यावर पीडितेने आपल्यावर गुदरलेल्या संपूर्ण प्रसंग आपल्या पतीला सांगितला. त्याने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र भोंदूबाबाने तुला दोन वेळा माझ्याकडे यावे लागेल असे सांगितल्याने ती महिला प्रचंड घाबरली होती. त्यामुळे ती मला जगायचंच नाही असे म्हणून वारंवार आत्महत्या करण्याच्या गोष्टी करू लागली. आपल्या कपड्यांवर भोंदूबाबाने जादू केली असेल या भीतीने या दाम्पत्याने 26 एप्रिल रोजी संबंधित पीडितेने अत्याचाराच्या दिनी शरीरावर असलेल्या सर्व कपड्यांना आगीच्या स्वाधीन केले. त्यानंतरही तिच्या मनातून मांत्रिक बाबाची भीती जात नसल्याने यादरम्यान तिने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. मात्र तिच्या पतीने पाहिल्याने पुढील अनर्थ टळला.
मात्र त्याच दरम्यान, त्यांच्या कुटुंबात अनेकजणांना कोविडचे संक्रमण झालेले असल्याने बराच मोठा काळ रुग्णालय आणि विलगीकरण कक्षातच गेला. त्यामुळे त्यांना फिर्याद देण्यास उशीर झाला. आज दुपारी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव रंजना गवांदे-पगार यांच्याशी संपर्क साधून घडला प्रकार कथन केला. त्या नंतर संबंधित 45 वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून पारेगाव बु. येथील सावित्रा बाबुराव गडाख या 55 वर्षीय भोंदू मांत्रिका विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 376 सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतचे अधिनियम 2013 चे कलम 3(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सावित्रा गडाख याला पारेगाव बुद्रुक येथील त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. या वृत्ताने संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून ग्रामीणभागात अद्यापही तंत्र-मंत्राला बळी पडणाऱ्या नागरिकांची आणि अशा भोंदू बाबांची संख्या असल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार करीत आहेत. अशा प्रकारच्या तंत्र-मंत्र व जादूटोणा करणाऱ्या इसमांंवर कोणीही विश्वास ठेवू नये. सावित्रा गडाख या भोंदूबाबाने तालुक्यातील अजूनही कोणाची अशी फसवणूक केली असल्यास त्यांनी समोर यावे असे आवाहन पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी केले आहे.
Visits: 25 Today: 2 Total: 114938