शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पेच मुंबईतील बैठकीनंतरही कायम ऐनवेळी उमेदवारी देण्याची परंपरा कायम राहण्याची दाट शक्यता


नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला पेच शुक्रवारी (ता.१५) मुंबईतील बैठकीनंतरही सुटला नाही. उमेदवारीसंबंधी पक्षाचा काहीच निर्णय झाला नसल्याचे शिर्डीच्या पदाधिकार्‍यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार ऐनवेळी ठरण्याची परंपरा यावेळीही पाळली जाणार का? बदलत्या राजकीय परिस्थितीत पक्षाला हे परवडणार का? याकडे लक्ष लागले आहे.

शिवसेना फुटीनंतर माजी मंत्री बबनराव घोलप ठाकरे गटात सक्रीय झाले. त्यावेळी त्यांच्या उमेदवारीचे संकेत देण्यात आले. मात्र, मधल्या काळात पक्षाची भूमिका बदलल्याचे दिसून आले. अलीकडेच भाऊसाहेब वाकचौरे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. त्यामुळे ते उमेदवार असल्याची चर्चा सुरू झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नगर जिल्ह्याच्या दौर्‍यात तसे संकेतही मिळाले. त्यामुळे नाराज झालेल्या घोलप यांनी पक्षाच्या पदाचे राजीनामे दिले. याचा परिणाम स्थानिक पदाधिकार्‍यांवरही झाला.

वाकचौरे यांना विरोध होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शुक्रवारी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. पक्षाचे मुंबईतील नेते माजी आमदार सुनील शिंदे यांनी ही बैठक घेतली. बैठकीला घोलप यांचे कार्यकर्ते आणि शिर्डीतील पदाधिकारी उपस्थित होते. घोलप मात्र बैठकीला गेले नाहीत. आम्हांला घोलप यांच्यासोबत ठाकरे यांच्याशीच भेट घालून द्यावी, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली. आमदार शिंदे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. भाऊसाहेब वाकचौरे यांनी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांची पक्षात पुन्हा येण्याची इच्छा होती, त्यामुळे त्यांना प्रवेश दिला. मात्र, त्यांना उमेदवारी द्यायची की नाही, याचा अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे कोणीही संभ्रम न ठेवता काम सुरू ठेवावे, असेही शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्यामुळे हा गुंता शुक्रवारच्या बैठकीतही सुटला नाही.


पुन्हा ऐनवेळी उमेदवारी?
शिर्डी मतदारसंघात पूर्वी शिवसेनेने ऐनवेळी उमेदवारी दिल्याची उदाहरणे आहेत. भाऊसाहेब वाकचौरे आणि सदाशिव लोखंडे यांना यापूर्वी अशीच ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे यावेळीही असाच निर्णय होतो की काय, याकडे लक्ष लागले आहे. मात्र, यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी असल्याने त्याचा पक्षाला फटका बसणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *