शिर्डीत उद्धव ठाकरेंनी भाकरी फिरवली! वाकचौरेंसाठी घोलपांचा बळी; लोकसभेतील रंगत वाढणार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पहिल्यांदा खासदारकी देणार्‍या शिवसेनेला सोडून काँग्रेसवासी झालेल्या आणि नंतर राजकीय लाटांवर स्वार होवून पुन्हा शिवसेनेची (ठाकरे गट) कास धरणार्‍या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्ष प्रवेशाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. पंधरवड्यापूर्वी घडलेल्या या घडामोडींनंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोठी उलथापालथ व्हायला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तालुयातील दुष्काळ पाहणी दौर्‍यानंतर काही तासांतच त्यांनी जिल्ह्यात पक्षांतर्गत भाकरी फिरवली असून साडेपाच दशकांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या माजी मंत्री बबन घोलप यांचा राजकीय बळी घेवून त्यांच्या जागी आमदार सुनील शिंदे यांना जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सामान्य शिवसैनिकांच्या मनात आजही ‘गद्दार’ म्हणूनच प्रतिमा असलेल्या वाकचौरेंसाठी पक्षाला पडत्या काळात सावरणार्‍या निष्ठावानालाच बाजूला सारले गेल्याने त्याचे परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसण्याची दाट शयता निर्माण झाली असून शिर्डी लोकसभेची निवडणूक अधिक रंगतदार बनली आहे.

श्री साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी असलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी २०१४ साली नोकरीचा राजीनामा देवून शिवसेनेकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि ते मोदी लाटेवर स्वार होवून सहजासहजी विजयी झाले. त्यानंतरच्या पाच वर्षात त्यांनी किती विकासकामे केली हा वेगळा विषय मात्र या कालावधीत त्यांनी वाढवलेला जनसंपर्क अफाट होता. ‘आपला माणूस-आपल्यासाठी’ असं वाहनावरच घोषवाय लिहून मतदार संघातील गाव न् गाव आणि वाडी न् वस्ती फिरुन त्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत आपले नाव पोहोचवले. मंगल सोहळा असो अथवा शोक, निरोप मिळाला की खासदार हजर. त्यामुळे जनमानसात भाऊसाहेब वाकचौरे यांनी मानाचे स्थान प्राप्त केले.

सर्व काही सुरळीत असताना गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अचानक शिवसेनेचा त्याग करुन राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळीच त्यांनी राजकीय आत्महत्या केल्याच्या चर्चा सुरु झाल्या आणि निवडणुकीचे निकाल हाती येईपर्यंत त्यावर शिक्कामोर्तबही झाले. या दरम्यानच्या काळात त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सामान्य शिवसैनिक त्यांच्या विरोधात पेटून उठला. त्यामुळे निवडणुका असतानाही खासदारांना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं जिकरीचे बनले होते. संगमनेरातील काही संतप्त शिवसैनिकांनी तर त्यांना रस्त्यात गाठून आपला रोष व्यक्त केला. त्याचे फळ आजही फौजदारी खटल्यांच्या माध्यमातून ते चाखीत आहेत. यातून पक्ष सोडून गेलेल्या वाकचौरेंबाबत सामान्य शिवसैनिकाच्या मनात खद्खद् असल्याचे वेळोवेळी स्पष्टपणे समोरही आले.

मात्र या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सामान्य शिवसैनिक व पदाधिकार्‍यांशी सल्लामसलत केल्याशिवाय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी पुन्हा एकदा मातोश्रीचे दरवाजे उघडले. त्याचा परिणाम इतकी वर्ष गद्दार म्हणून संबोधल्याने मनात निर्माण झालेले वेगळेस्थान, वाढलेली कटुता विसरुन ज्याच्या विरोधात अंगावर खटले भरले, आज त्याचाच जय जयकार कसा करायचा? अशा संभ्रमात शिवसैनिक पडला. माजी मंत्री आणि शिर्डीचे यापूर्वीचे संपर्कप्रमुख बबन घोलप यांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही.

वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बंडाने झालेल्या पडझडीतही ज्या शिलेदारांनी उद्वव ठाकरेंचा बुरुज लढता ठेवला त्यात बबन घोलप यांचा समावेश होता. या फुटीनंतर शिवसेनेत राहिलेल्या अन्य आमदार व खासदारांबाबतचे वेगवेगवळे गोपनीय अहवालही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मिळाले. त्यात शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे काठावर उभे असल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी घोलप यांना मातोश्रीवर पाचारण करुन शिर्डीचा किल्ला सोपवला, त्याचवेळी आगामी लोकसभेची तयारी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. त्यावेळी पहिल्यांदा ते शिर्डीत आले तेव्हाही त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात आपणच लोकसभेचे उमेदवार असल्याचे सांगितले होते. गेले वर्षभर त्यांनी याच विचारातून, भावनेतून आणि प्रेरणेतून काम केले आहे.

मात्र त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करीत गेल्या २३ ऑगस्ट रोजी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना सोडून काँग्रेस व्हाया भाजपा असा प्रवास करीत पुन्हा मातोश्रीवर डोके टेकवले आणि त्याचवेळी शिर्डीची उमेदवारीही पदरात पाडून घेतली. त्यावेळी तेथून दोनशे किलोमीटर अंतरावरील देवळालीत बसलेल्या आणि गेल्या ५५ वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या बबन घोलप या ढाण्या वाघाच्या डोळ्यातून मात्र अश्रू तराळत होते. ठाकरेंनी एकदा तरी त्यांचे मत जाणून घ्यायचे होते, एका शब्दाने तर त्यांना विचारायचे होते. पण, प्रत्यक्षात तसं घडलं नाही.

त्यानंतर घोलप यांनी ठाकरेंची भेट घेवून आपल्या मनातील सल बोलूनही दाखवली. पण तरीही पक्षप्रमुखांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे घोलप आगामी लोकसभेत वाकचौरेंसाठी पक्षाचे काम करतील का? याबाबतही साशंकता निर्माण झाल्याने शुक्रवारी (ता.८) संगमनेर तालुयातील दुष्काळी भागाच्या दौर्‍यावर आलेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रात्री मुंबईत पोहोचताच धक्कादायक निर्णय घेतला आणि आज सकाळी सामनामधून तो जाहीरही करण्यात आला. त्यानुसार माजीमंत्री बबन घोलप यांची शिर्डीचे संपर्कप्रमुख या पदावरुन उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी आमदार सुनील शिंदे यांच्यावर अहमदनगरसह शिर्डी लोकसभेचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पक्षाच्या या निर्णयानंतर बबन घोलप यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात असून पक्षाच्या निर्णयावर त्यांची भूमिका काय असेल याविषयी वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. विरोधी गटातील भाजप व शिंदे गटाकडून विद्यमान खासदार लोखंडे यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचेही नाव चर्चेत आहे. लोखंडे यांच्या कामाबाबत भाजप फारसा समाधानी नाही, त्यामुळे त्यांना तिकीट मिळेल की नाही याबाबत आजतरी साशंकता आहे. आठवले यांना यापूर्वीही मतदारसंघात मोठा विरोध झाला आहे, शिर्डीने त्यांचा पराभवही केला आहे. आजही त्या स्थितीत फारसा बदल झालेला नसल्याने भाजप वेगळे धाडस करणार नाही. अशा स्थितीत भाजप अथवा शिवसेनेला (शिंदे गट) पर्यायी उमेदवार कोण? असा प्रश्न निर्माण झालेला असताना ठाकरे गटाच्या शिवसेनेत घडलेल्या या घडामोडी भाजप-शिवसेनेच्या (शिंदे) पथ्यावर पडत असल्याचे दिसत आहे.


गेल्या दोन निवडणुकांपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा खासदार आहे. अर्थात या दोन्ही निवडणुकांचे विश्लेषण पाहता येथील उमेदवार दोन्ही वेळा नरेंद्र मोदी यांच्या लाटेवरच निवडून आल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतही तसेच घडले तर आश्चर्य निर्माण होणार नाही. अशा स्थितीत भाजपा-शिवसेनेच्या (शिंदे) उमेदवाराशी तगडी लढत देण्याच्या विचाराने उद्धव ठाकरे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षप्रवेश दिला. वाकचौरे यांचा दांडगा जनसंपर्क, पूर्वानुभव आणि जनमानसातील चेहरा अशी ओळख शिर्डीची जागा मिळवून देईल असा ठाकरे यांचा कयास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *