गोंधवणी येथील हातभट्टीच्या दारु अड्ड्यावर छापा

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरातील गोंधवणी येथे गावठी हातभट्टी दारु अड्डे व हातभट्टी दारु तयार करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी आपल्या पथकातील अधिकारी व अंमलदारांना छापा टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार रविवारी (ता.29) पहाटे छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारु यांचा नाश करण्यात आला असून, 2 लाख 13 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, गोंधवणी येथे गावठी हातभट्टी दारु अड्डे व हातभट्टी दारु तयार करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या आदेशावरुन पोलीस उपनिरीक्षक उजे, सहा. पोलीस उपिनरीक्षक राजेंद्र आरोळे, कर्मचारी सुरेश औटी, नितीन शिरसाठ, श्याम बनकर, आदिनाथ चेमटे, प्रदीप गर्जे, सलमान कादरी, गौतम दिवेकर यांसह राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचार्यांनी छापा टाकत अशोक काशिनाथ शिंदे याच्याकडून 42 हजार रुपयांचे कच्चे रसायन व 2500 रुपयांची गावठी दारु, अशोक सीताराम गायकवाड याच्याकडून 45 हजार 500 रुपयांचे कच्चे रसायन व 3 हजार रुपयांची गावठी दारु, राजेंद्र फुलारे याच्याकडून 42 हजार रुपयांचे कच्चे रसायन व 3 हजार रुपयांची गावठी दारु, दिलीप नाना फुलारे याच्याकडून 28 हजार रुपयांचे कच्चे रसायन व 2 हजार रुपयांची गावठी दारु, सुरेश फुलारे याच्याकडून 42 हजार रुपयांचे कच्चे रसायन व 3 हजार 500 रुपयांची दारु असा एकूण 2 लाख 13 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरील सर्व आरोपींविरोधात शहर पोलिसांत गुरनं.568, 569, 570, 571, 572, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. भल्या पहाटे अचानक केलेल्या या कारवाईमुळे शहरातील अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले असून कारवाईचे नागरिकांतून जोरदार कौतुक होत आहे.

