अगस्ति कारखाना नियमित सुरूच ठेवणार ः गायकर २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा; ‘ते’ ठरावही केले मंजूर


नायक वृत्तसेवा, अकोले
चालू हंगामात बाहेरील (गेटकेनचा) अडीच लाख मेट्रिक टन व कार्यक्षेत्रातील २ लाख मेट्रिक टन अशा एकूण साडेचार लाख मेट्रिक टन उसाचे गाळप अगस्ति सहकारी साखर कारखाना करेल. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जावून पाहिजे ते प्रयत्न करु, मात्र कारखाना बंद पडू न देता नियमित सुरू ठेवू, असा विश्वास अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी व्यक्त केला.

अकोलेतील अगस्तिनगर येथील अगस्ति सहकारी साखर कारखान्याची २०२२-२०२३ (१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३) या आर्थिक वर्षातील अधिमंडळाची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता.७) दुपारी १ वाजता अगस्ति साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष सीतारामगायकर यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय खेळीमेळीत पार पडली. या सभेत राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर अगस्तिचे अध्यक्ष सीताराम गायकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून सदस्यपदी नियुक्त करावी अशी सभासद प्रकाश महाले यांनी केलेल्या सूचनेस रावसाहेब भोर यांनी अनुमोदन दिल्यानंतर ठराव टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

सभेच्या प्रारंभीच उपाध्यक्ष सुनीता भांगरे यांनी स्वागत केले. सीतारामगायकर यांच्या अध्यक्षीय नावाची सूचना ज्येष्ठ संचालक अ‍ॅड. मनोज देशमुख यांनी केली. त्यास संचालक विकास शेटे यांनी अनुमोदन दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह उपस्थित संचालक व पदाधिकार्‍यांनी पुष्पहार अर्पण केले व अभिवादन करून सभेची सुरुवात झाली. अहवाल वर्षात सर्वाधिक ऊस उत्पादन घेणार्‍या १२ ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा सपत्नीक रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. मुख्य लेखापाल विजय सावंत यांनी अहवालातील दोष दुरुस्ती व मागील वार्षिक सर्वसाधारण सभा इतिवृत्ताचे वाचन केले. विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन कार्यकारी संचालक सुधीर कापडणीस यांनी केले. या सभेतील विषयपत्रिकेवरील सर्व विषयांवर सविस्तर विचार विनिमय झाल्यावर सभासदांनी मंजुरी दिली.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते मधुकर नवले, उत्कर्षा रुपवते, अमित भांगरे, विठ्ठल चासकर, बी. जे. देशमुख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, प्रकाश मालुंजकर, माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, मधुकर तळपाडे, बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे, भाऊपाटील नवले, सेना तालुकाध्यक्ष डॉ. मनोज मोरे, महेश नवले, सोन्याबापू वाकचौरे, मच्छिंद्र मालुंजकर, रावसाहेब वाळुंज, गोरख मालुंजकर, राजेंद्र कुमकर, यमाजी लहामटे, कैलास वाकचौरे, पर्बत नाईकवाडी, मच्छिंद्र धुमाळ, पाटीलबा सावंत, अशोक आरोटे, विकास शेटे, विक्रम नवले यांसह सर्व संचालक व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना अध्यक्ष गायकर म्हणाले, आपल्या पुढे आव्हान आहे हे खरे आहे. मात्र, अडचणीत मार्ग काढावा लागतो. अगस्ति कारखान्यावर सध्या १६५ कोटी कर्ज आहे. अगस्तिवरील सर्व कर्ज व व्याजाचा सविस्तर हिशोब सभासदांना अवगत करून पुढील तीन वर्षांत अगस्तिचा इथेनॉल प्रकल्प संपूर्ण कर्जमुक्त होईल, तसेच या राज्य सरकारकडून अडचणीतील साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेमार्फत ७५ कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज मिळवून देण्याच्या घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दलचा अभिनंदनाचा ठराव मांडला तो टाळ्यांच्या कडकडाटात संमत करण्यात आला.

तालुक्याची भाग्यलक्ष्मी असलेल्या अगस्ति कारखान्याला जिल्हा सहकारी बँक व तालुक्यातील पतसंस्थांनी अडचणीच्या काळात केलेली मदत स्वागर्ताह आहे. कारखान्यासाठी अध्यक्ष सीताराम गायकर व संचालक मंडळाचे अतोनात प्रयत्न सुरु आहे. गायकर साहेब तुम्ही आहे तोपर्यंत पुढील २५ वर्ष आपण तुमच्या पाठिशी कारखान्यासाठी कायम राहू, असा विश्वास देवून कारखाना रस्त्यासाठी आपण ५ कोटींचा निधी दिला आहे. पुढील कामासाठीही दुसर्‍या टप्प्यात निधी देवू असे सांगून माझे जे काम आहे ते मी कायम करेल असा विश्वास व्यक्त केला.

जर पुढील २५ वर्ष आमदार म्हणून डॉ. किरण लहामटे हेच राहणार असतील तर आम्ही व इतरांनी काय अकोले तालुका सोडून बाहेर जायचे काय? असा सवाल उपस्थित करून आमदार डॉ. लहामटे यांच्यावर बी. जे. देशमुख यांनी टीकास्त्र सोडले.


आम्ही अगस्तिसाठी अनेक ठिकाणी कर्जासाठी गेल्यावर त्यांना अगस्ति बंद पडणार आहे, त्यांना कर्ज देवू नका असा फोन करण्याच्या घटनाही काही हितशत्रूंकडून घडत आहे. आम्ही काम करताना चुकलो असेल तर आमचे कान धरा. मात्र अगस्ति कारखान्याबाबत बदनामीकारक अफवा पसरवू नका, अशी विनंती अध्यक्ष सीताराम गायकर यांनी केली.

Visits: 17 Today: 1 Total: 115058

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *