निळवंडे पाईपलाईन नादुरुस्त झाल्याने शहराला होतोय दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा! राजकीय आणि प्रशासकीय आशीर्वादातून फोफावलेल्या वाळूतस्करीने ‘अमृतवाहिनी’ बनली ‘गटारगंगा’

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहराला थेट धरणातून पाणी पुरवठा करणार्या जलवाहिनीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. एरव्ही या पाईपलाईनमधून येणार्या पाण्याचा प्रवाह अडखळल्यास नदीपात्रातून शहराला पाणी पुरवठा केला जात. मात्र राजकीय आणि प्रशासकीय आशीर्वादाने पोसलेल्या वाळूतस्करांमूळेे कधीकाळी साक्षात ‘अमृतवाहिनी’ ठरलेल्या प्रवरेची आज गटारगंगा झाली आहे. त्यामुळे ‘पाणीबाणी’च्या वेळी नदीपात्रातील विहिरींमधून पाणी उपसा केल्यास त्यातून दुर्गंधी येत असल्याने संगमनेरकरांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. जवळपास लाखभर लोकांचे जीवन धोक्यात घालून शहरातील वाळूतस्करांची पाठराखण कशासाठी असा गंभीर प्रश्नही यानिमित्ताने उभा राहिला आहे. त्यामुळे संगमनेरकरांना ‘आढ्यात आहे, पण पोहर्यात आणता येत नाही’ असं म्हणायची वेळ आली आहे.

2014 साली तत्कालीन नामदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेरकरांसाठी निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनची योजना प्रत्यक्ष कार्यान्वीत झाली. तेव्हापासून संगमनेर शहराचा पाणीप्रश्न इतिहास जमा झाला आहे. धरणातून आलेल्या पाईपलाईनमध्ये गेल्या सहा वर्षांत अनेकवेळा अडथळे येवून पाणी पुरवठा बंद होण्याचेही प्रकार घडले आहेत, मात्र त्याचा कोणताही विशेष परिणाम आत्तापर्यंत शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाल्याचे दिसले नाही.

यावेळी मात्र परिस्थिती अत्यंत विपरित झाली आहे. गेल्या सहा वर्षात शहराच्या विकासासोबतच ‘वाळूचोर’ नावाची जमातही शहराच्या चोहोबाजूला व्यापक स्वरुपात फुलली आहे. यातील बहुतेक तस्कर राजकीय पक्षाशी निगडीत असल्याने त्यांच्यावर ‘वरदहस्त’ आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत प्रशासकीय अधिकार्यांनी आजवर दाखवलेली नाही हे वास्तव आहे. तर शहरातील घाटांच्या परिसरातून व पाणी पुरवठ्याच्या विहिरींजवळून वाळू उपसा करणार्यांमध्ये नोंदणी संपलेल्या रिक्षांचा अधिक वापर होतो तो देखील दिवसा ढिवळ्या, त्यामागे महसूल आणि पोलीस यंत्रणेतील काहींचे अर्थकारण दडले आहे.

निळवंडे धरणाची पाईपलाईन शहरात आल्यापासून पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या विहिरींकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेल्याने तस्करांनी शहरालगतच्या नदीपात्रातील ना घाट सोडले, ना विहिरी जेथे वाळू मिळेल तेथून अर्निबंध बेसुमार उपसा केला. त्यामुळे पायरीघाटापासून ते थेट आडच्या नदीपर्यंतच्या पात्राची अक्षरशः वाट लागून पात्रातील दगड वरती आला आहे. त्यामुळे आवर्तनाचे पाणी बंद झाल्यानंतर या संपूर्ण परिसरात प्रचंड वाळू उपशामुळे निर्माण झालेल्या भल्यामोठ्या डबक्यात पाणी साचून राहते, आणि काही दिवसांतच त्यातून दुर्गंधी सुटते.

सदरचे डबके पायरीघाट (कल्पवृक्ष गणेश मंदीर) ते गंगामाई घाटापर्यंत पसरलेले आहे, त्यामुळे पालिकेच्या बहुतेक सर्वच विहिरी याच डबक्यात येत असल्याने विहिरींमध्ये उतरणारे पाणीही दुर्गंधीयुक्त असते. साहजिकच ‘शुद्धीकरणा’च्या नावाने बोंबाबोंब असलेल्या संगमनेर शहराला हेच पाणी पुरविण्याची वेळ पालिकेवर आली. त्यामुळे शहरवासियांचे आरोग्यच धोक्यात आले असून कोविड बरोबरच आता अन्य आजारांचीही लाट येण्याची भीती निर्माण झाली आहे.
किमान शहरालगतच्या नदीपात्रातून होणारी वाळूतस्करी तरी रोखावी यासाठी अनेक पर्यावरणप्रेमींनी गळे आळवले, वृक्ष परिवारासारख्या काही संस्थांनी राजकीय आणि प्रशासकीय उंबरेही झिजवले, मात्र त्याचा कोणताही परिणाम आजवर दिसून आला नाही. त्यामुळे स्थानिक राजकारण्यांना आणि प्रशासनातील अधिकार्यांना लाखभर लोकांच्या आरोग्यापेक्षा कार्यकर्त्यांचे आर्थिक हित आणि त्यातून मिळणारी चिरीमीरी अधिक महत्त्वाची वाटत असल्याचेच चित्र सध्या बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे निळवंडेची पाईपलाईन नादुरुस्त असल्याने पालिकेकडून नदीतून पाणी उचलले जात आहे हे माहिती असूनही वाळूतस्करांकडून कोणतीही संवेदनशीलता दिसून आलेली नसून आजही दिवसरात्र शहरालगतच्या पात्रातील प्राचिन घाट आणि पालिकेच्या विहिरींभोवतीची वाळू कोरण्याचे उद्योग राजरोसपणे सुरुच आहेत.
दोन दिवसांपूर्वी बंद पडलेल्या पाईपलाईनमूळे पालिकेने नदीपात्रातील विहिरीतून पाणी पुरवठा केला खरा, मात्र त्यामुळे अनेकांच्या आरोग्यविषयक तक्रारी उद्भवल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या पंपींग स्टेशनवर एक कोटी रुपयांहून रक्कम खर्च करुन ‘फिल्टर प्लाँट’ उभारला गेला होता असे सांगितले जाते, मग निळवंडेची पाईपलाईन बंद असताना शहराला दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा कसा होतोय याचे उत्तर मात्र पालिकेकडेही नाही हे विशेष!.



