‘क्रश बक्स’ कॅफेचा मालकही झाला गजाआड! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार; दोघा लॉज चालकांना यापूर्वीच अटक..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ‘कॅफे सेंटर’च्या नावाखाली अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराची ठिकाणं वाढल्याचे दिसत आहे. या समस्येवर रामबाण उपाय शोधतांना संगमनेरच्या उपअधीक्षकांनी अशाप्रकरणांमध्ये संबंधित लॉज व कॅफे मालक आणि चालकांनाही सहआरोपी करण्याचा स्तुत्य प्रयोग सुरु केला असून त्याचा सकारात्मक परिणाम समोर येवू लागला आहे. कारवाईच्या या साखळीत गेल्या बुधवारी दाखल झालेल्या गुन्ह्यातील आणखी एका आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. सदरील आरोपीचे संगमनेरात ‘क्रश बक्स’ नावाचे कॅफे सेंटर असून याच ठिकाणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार तपासात समोर आला. तेव्हापासून आरोपी पसार होता, मात्र पोलिसांनी मंगळवारी रात्री त्याला शिताफिने अटक केली असून न्यायालयाने त्याला एकदिवसाची कोठडी सुनावली आहे. राहुल गौतम भालेराव असे अटक केलेल्या कॅफे मालकाचे नाव आहे.
गेल्या एप्रिलपासून घुलेवाडी शिवारातील मालुंजकर वसाहतीत राहणार्या आशीष नानासाहेब राऊत (वय 20) याने एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिच्यावर संगमनेर व शिर्डी येथील काही लॉज व कॅफे सेंटरसह पेमगिरी, विठ्ठलकडा व कर्हेघाटात नेत तिच्यावर वेळोवेळी शारीरिक अत्याचार केले. सदरचा प्रकार परिसरातीलच किरण सोपान राऊत (वय 30) याला समजल्यानंतर त्यानेही पीडितेला ‘बिंग’ फोडण्याची भीती दाखवून पहिल्या आरोपीच्या पायावर पाय ठेवला. सततच्या या प्रकाराला वैतागून अखेर गेल्या बुधवारी (ता.23) पीडितेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला वरील दोघांसह त्यांना साथ देणार्या सागर मालुंजकर व अज्ञात लॉज व कॅफे चालकांवर अत्याचारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल करीत पहिल्या दोन्ही आरोपींना अटक केली होती.
त्यांच्या चौकशीतून सुरुवातीला नांदूर शिंगोटे येथील साईतेज हॉटेलचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा घालीत हॉटेलचा मालक ज्ञानेश्वर किसन क्षीरसागर (रा.निमोण) याला अटक केली. या दरम्यान शिर्डीतील आकाश भास्कर बोंडारे या लॉज मालकाचे नावही समोर आल्याने पालिसांनी त्याच्याही मुसक्या आवळल्या. अत्याचाराच्या या प्रकारात शहरातील तीन कॅफे हाऊसची नावे समोर आली असून त्यांच्या मालकांचे नाव निष्पन्न झाल्यापासून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. त्यातील ‘क्रश बक्स’ या अनेक अल्पवयीन मुलींना नासवणार्या कॅफे हाऊसचा चालक मंगळवारी (ता.29) शहर पोलिसांच्या हाती लागला.
बुधवारी (ता.30) त्याला न्यायालयासमोर हजर केले असता आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अत्याचाराच्या या प्रकरणात मुख्य दोघांसह त्यांना सहाय्य करणारा सागर मालुंजकर आणि पाच लॉज व कॅफेच्या मालकांचा समावेश आहे. त्यातील एका मदतगारासह संगमनेरातील दोघे कॅफेचालक अद्यापही पसार असून त्यांच्याकडून अटकपूर्व जामीन मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, मात्र पोक्सोच्या प्रकरणात न्यायालये अधिक गंभीर असल्याने त्यांना जामीन मिळण्याची शक्यता दुर्मीळ आहे. अशा स्थितीत पसार आरोपींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचा एकमेव मार्ग शिल्लक राहतो.
मागील काही कालावधीत संगमनेर शहरालगतच्या ग्रामीण हद्दित वेगवेगळ्या ठिकाणी पाश्चात्य नावांची सरमिसळ असलेले ‘कॅफे शॉप’ नावाचे अश्लिल कृत्यांची अधिकृत केंद्रेच सुरु झाली आहेत. अशा ठिकाणांवर आतील भागात आडोसे तयार करुन त्या जागेचे तासानुसार पैसे घेतले जातात. त्यातून अनेक तरुण शालेय व महाविद्यालयातील अल्पवयीन मुलींना कॉफीच्या नावावर येथे घेवून येतात व फूस लावून त्यांच्यावर अत्याचार करतात. गेल्याकाही दिवसांत अशा प्रकारांमध्ये मोठी वाढ झाली असून पोलिसांनी आता लॉज व कॅफे मालकांनाही अशा गुन्ह्यात सहआरोपी करायला सुरुवात केल्याने संगमनेरातील ‘कुप्रसिद्ध’ कॅफे हाऊसला आता घरघर लागण्यास सुरुवात झाली आहे.