‘पोक्सो’च्या गुन्ह्यात हॉटेलचा मालक गजाआड! उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे; यापुढे कायद्याची अशीच अंमलबजावणी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
विनासाहस अधिकच्या पैशांसाठी अनैतिकतेचा आधार घेवून अल्पवयीन जोडप्यांना ‘एकांत’ अथवा ‘खोली’ उपलब्ध करुन देणार्यांची आता खैर नाही. गेल्या काही दिवसांत कॉफी हाऊसच्या नावाने सुरु असलेले ‘कॅफे’ आणि काही लॉजमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बुधवारीही अशाच एका घटनेत सतरावर्षीय तरुणीवर दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. या घटनेनंतर पोलिसांनीही कठोर भूमिका घेतली असून अल्पवयीन मुलींवरील अत्याचारासाठी जागा उपलब्ध करुन देणार्यांनाही त्याच प्रकरणात सहआरोपी केले जात आहे. बुधवारच्या प्रकरणातही पोलिसांनी अज्ञात लॉज व कॅफे हाऊस चालकांचा गुन्ह्यात समावेश केल्यानंतर आता त्यातील साईतेज हॉटेलचा चालक ज्ञानेश्वर किसन क्षीरसागर याला अटक करण्यात आली आहे. या वृत्ताने अनैतिक पैशांतून समृद्धीचा आनंद उपभोगू पाहणार्या लॉज व कॅफेच्या माध्यमातून फोफावलेल्या प्रवृत्तींमध्ये खळबळ उडाली आहे.
घुलेवाडीतील मालुंजकर वस्तीत राहणार्या आशिष राऊत (वय २०) याने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी ओळख करुन नंतर तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत संगमनेर, शिर्डी येथील विविध लॉज, कॅफे हाऊस यासह कर्हेघाट, विठ्ठलकडा, पेमगिरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेवून तिच्यावर अत्याचार केले. दोघांमधील हा प्रकार समजलेल्या आरोपीचा मित्र किरण सोपान राऊत (वय ३०) यानेही पीडितेच्या अज्ञानाचा फायदा घेतला आणि तिला ‘ब्लॅकमेल’ करीत पहिल्या आरोपीचाच कित्ता गिरवला.
सततच्या या त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी आशिष राऊत (वय २०) व किरण सोपान राऊत (वय ३०, दोघेही रा.मालुंजकर वस्ती, राऊत मळा, घुलेवाडी) या दोघांसह त्यांना साहाय्य करणारा सागर मालुंजकर, जागा उपलब्ध करुन देणारे शिर्डी व संगमनेर येथील लॉजमालक, संगमनेरातील अकोले बायपास व नाशिक महामार्गावरील कॅफे हाऊसचे मालक अशा पाचजणांवर भारतीय दंडसंहितेच्या कलम ३७६ (२) (एन), ३६३ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे कलम ४, ६, ८, १२ व १७ प्रमाणे गुन्हा दाखल करीत पहिल्या दोन्ही आरोपींना अटक केली, त्यांना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अटक आरोपींच्या चौकशीतून नांदूर शिंगोटे (ता.सिन्नर, जि.नाशिक) येथील हॉटेल साईतेजचे नाव समोर आले. याठिकाणी आरोपींनी पीडितेला वेळोवेळी नेवून अत्याचार केला होता. पोलिसांनी तत्काळ तेथे छापा घालून हॉटेल चालक आरोपी ज्ञानेश्वर किसन क्षीरसागर (रा.निमोण, ता.संगमनेर) याला अटक केली. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणात संगमनेर व शिर्डीतील लॉजसह शहरालगत मात्र ग्रामीण हद्दीत असलेल्या ‘त्या’ दोन कॅफे हाऊसची नावे समोर आली होती. पोलिसांकडून त्याबाबत चौकशी सुरु असून प्रकरणातील सर्व आरोपींची नावे निष्पन्न करुन त्यांना अटक करणार असल्याचे तपासी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांनी सांगितले.
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या अथवा छेडछाडीच्या प्रकरणात ज्या लॉजचे अथवा कॅफे हाऊसचे नाव समोर येईल त्यांनाही त्या प्रकरणात सहआरोपी केले जाईल. यापूर्वीच्या पठार भागातील एका प्रकरणात संगमनेरातील एंजल कॅफेच्या मालक व चालकाला अटक केली होती, ते अद्यापही कारागृहात आहेत. त्यामुळे लॉजचालकांनी ओळखपत्र आणि नियमानुसार नोंद केल्याशिवाय कोणालाही खोल्या देवू नयेत व कॅफेचालकांनी परवानगी मिळवताना जो हेतू सांगितला होता त्याचे स्मरण करुनच व्यवसाय करावा, अन्यथा अशा प्रकरणांमध्ये कोणाचीही गय होणार नाही.
– सोमनाथ वाघचौरे
पोलीस उपअधीक्षक, संगमनेर उपविभाग