संगमनेरात फडकला पाकिस्तानसदृश्य झेंडा! समाज माध्यमातून काडीफेक; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कधीकाळी जातीय तणावाचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्या संगमनेरने आपली ‘ती’ ओळख खूप मागे सोडली आहे. त्यातून सौहार्दाचे वातावरण निर्माण झाल्याने गेल्या काही दशकांमध्ये संगमनेरचे नाव जिल्ह्यातील आघाडीच्या शहरांमध्ये गणले जात आहे. मात्र गेल्या काही काळापासून हा सौहार्द संपवून शहराला पुन्हा जातीय आगीच्या भक्ष्यस्थानी घालण्याचे पद्धतशीर षडयंत्र राबवण्यात येत असून रविवारी असाच प्रकार समोर आला. मागील दोन महिन्यांपासून चर्चेत असलेल्या जोर्वेनाका येथील हायमास्टच्या खांबावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकत असल्याची आवई उठवण्यात आली. त्यासाठी लांब अंतरावरुन काढलेल्या व्हिडिओचाही आधार घेतला गेला. हा प्रकार राष्ट्रभावनांशी निगडीत असल्याने शहरातील वातावरणात वेगाने बदल होवू लागले. मात्र पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ चौकशी केली असता सदरील ध्वज पूर्णतः धार्मिक असल्याचे आणि पाकिस्तानच्या ध्वजाशी त्याचा काहीएक संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यावरुनही वाद नको म्हणून पोलिसांनी सामंजस्याने तेथील ‘तो’ ध्वजही खाली उतरवला आहे.

रविवारी (ता.२०) सायंकाळी शहरात अनेकांच्या मोबाईलवर निषेधाचे संदेश येवून धडकू लागले. संगमनेरात पाकिस्तानचा झेंडा.. अशा आशयाच्या काही संदेशांना दूरवरुन काढलेल्या एका व्हिडिओचीही जोड देण्यात आली. मात्र त्यावेळी वातावरणात हवाच नसल्याने सदरील ध्वज जागेवरच असल्याने तो पाकिस्तानचा अथवा त्यासारखा असल्याचेही त्यातून स्पष्ट होत नाही. समाजकंटकांनी त्याचाच आधार घेवून धार्मिक चिन्ह असलेल्या या ध्वजाला पाकिस्तानी ध्वजाचे नाव देवून दोन समाजातील सामाजिक सौहार्दाच्या वातावरणात काडी टाकण्याचा प्रयत्न केला. त्यातून सुरुवातीच्या काहीवेळ अशा प्रवृत्तींना यशही मिळाले, मात्र ज्या वार्याच्या वेगाच्या ही अफवा गावभर पसरली, त्याच वेगाने पोलिसांनीही कारवाई केली.

पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी तत्काळ फौजफाट्यासह जोर्वेनाका गाठून तेथील मायमास्टवर लावलेल्या झेंड्याची खात्री केली. सदरील झेंडा कोणत्याही बाजूने पाकिस्तानसारखा दिसत नसल्याचेही यावेळी स्पष्ट झाले. कोणीतरी शहरातील वातावरण खराब करण्यासाठीच हा उद्योग केल्याचे समोर आल्यानंतर पालिकेला कळवून रात्रीच त्यावरील झेंडा खाली उतरवण्यात आला. यावेळी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील वातावरण खराब करण्याचे काहींचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसते. मध्यंतरी काहींनी औरंगजेबाचे स्टेट्स ठेवून शिवप्रेमींना चुचकारण्याचे प्रयत्न केले होते. जोर्वेनायावरील प्रकारही शहरातील सामाजिक सौहार्द नष्ट करण्यासाठी रचले गेले होते. मात्र पोलिसांनी त्यावेळी त्याचा फारसा गांभीर्याने तपास केला नसल्याने त्या प्रकरणाचे खरे सूत्रधार आजही बाहेर आहेत आणि काही निरपराध मात्र खितपत पडले आहेत. रविवारी घडलेला प्रकारही तितकाच गंभीर असून पोलिसांनी त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, अन्यथा आज दिसत असलेली शांतता वादळापूर्वीची ठरण्याची शयता अधिक आहे.

