पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रतिंची संगमनेरात होळी! आमदार किशोर पाटील यांचा निषेध; अंमलबजावणी होत नसल्याचा संताप..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जळगाव जिल्ह्यातील पाचोर्‍याचे पत्रकार संदीप महाजन यांनी बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेवरुन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्यामुळे पित्त खवळलेल्या शिंदे समर्थक आमदार किशोर पाटील यांनी फोनद्वारे त्यांना अर्व्वाच्च शब्दात शिवीगाळ करीत धमकी दिली होती. त्याचे राज्यभर पडसाद उमटत असतांनाच आमदार समर्थक गुंडांनी महाजन यांना भररस्त्यात गाठून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी आजुबाजूला अनेकजण हजर असतांनाही हा प्रकार सुरु होता. त्यावरुन आमदार पाटील यांची दहशतही दिसून आली. यासर्व घडामोडींनंतर पाचोरा पोलिसांकडून आमदार पाटील यांच्यासह त्यांच्या गुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल होवून त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षीत होते. प्रत्यक्षात मात्र पोलिसांनी या प्रकरणाकडे सामान्य हातघाई म्हणून बघत अदखलपात्र गुन्हा नोंदवून आमदार महोदय आणि त्यांच्या गुंडांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न केला. त्याच्या निषेधार्थ पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्र परिषदेच्या संगमनेर शाखेने आज ‘पत्रकार संरक्षण कायद्याची’ होळी केली. संगमनेर तालुकाध्यक्ष शेखर पानसरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात आमदार किशोर पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.


पाचोर्‍यात एका आठ वर्षीय बालिकेचा अत्याचार करुन निर्घून खून झाल्याची संतापजनक घटना समोर आल्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले होते. या घटनेचे राजकारण होवू लागल्याने विरोधकांना फायद्याचे ठरु नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले समर्थक आमदार किशोर पाटील यांच्या मार्फत पीडितेच्या कुटुंबाशी संवाद साधला. त्यावरुन पत्रकार संदीप महाजन यांनी परखड शब्दात टीका करतांना भेदरलेल्या मनांचे वास्तव चित्र उभे केले होते. त्याचा राग अनावर होवून लोकप्रतिनिधी म्हणून जनमताने निवडून आलेल्या आमदार किशोर पाटील यांनी थेट महाजन यांना मोबाईलवरुन घाणेरड्या शब्दात शिवीगाळ करण्यात आली व त्यांना दमही भरण्यात आला.


या प्रकाराने विचलित न होता महाजन यांनी आपले कर्तव्य बजावणे सुरुच ठेवल्याने संतप्त झालेल्या आमदार पाटील यांच्या भाडोत्री गुंडांनी मोपेडवरुन जाणार्‍या महाजन यांना भरचौकात गाठून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार दिवसाढवळ्या आणि गजबजलेल्या चौकात घडत असतांना अनेकजण उघड्या डोळ्यांनी बघत होते. मात्र कोणातही त्या गुंडांना रोखण्याचे धाडस नव्हते. यावरुन आमदार पाटील यांच्या दहशतीचाही स्पष्ट अनुभव आला.


एकामागून एक असे दोन प्रकार घडल्यानंतर पाचोरा पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेवून महाजन यांना संरक्षण देण्यासह त्यांच्यावर हल्ला करणार्‍या व तो करण्याचे आदेश देणार्‍यांवर पत्रकार संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल होण्याची गरज होती. प्रत्यक्षात मात्र आमदारांच्या दबावापुढे पाचोरा पोलिसांनी शरणांगती पत्करल्याने अज्ञात इसमांविरोधात केवळ अदखलपात्र (एन.सी) गुन्हा नोंद झाला. यावरुन यंत्रणा कशा राजकारण्यांच्या दावणीला बांधलेल्या आहेत हे चित्रही स्पष्टपणे समोर आले.


वास्तविक सदरील प्रकार वृत्त प्रसिद्ध केल्याच्या कारणावरुन घडल्याचे उघड असल्याने पत्रकार संरक्षण कायद्यातील तरतुदीत बसणारे आहे. या कायद्यातून पत्रकारांना अशा हल्ल्यांपासून संरक्षण देण्यासह झालेल्या नुकसानीचा अथवा औषधोपचाराचा खर्चही आरोपीकडूनच वसुल करण्याची तरतुद आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांचा कारावास आणि दंडाची शिक्षाही होते. प्रत्यक्षात पोलिसांनी दबावात येवून आधी मोबाईलवरुन शिवीगाळ व धमकी आणि नंतर थेट भररस्त्यात हल्ला या घटनाक्रमाला गांभीर्याने घेवून तातडीने कारवाई करणे कायद्याला अपेक्षीत होते. प्रत्यक्षात शासनकर्त्यांच्या दबावात कायद्याच्या रक्षकांनीच त्याची मुस्कटदाबी करीत केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याने राज्यभरातील पत्रकार संघटना आक्रमक झाल्या आहेत.


आज (ता.17) पत्रकारांची मातृसंस्था समजल्या जाणार्‍या मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व शाखांसह पत्रकारांच्या अन्य अकरा संघटनांनी राज्यभरात आज एकाचवेळी आंदोलन करीत पत्रकार संरक्षण कायद्याची होळी केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार गौतम गायकवाड यांनी पाचोरा घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतांना आमदार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी केली. दैनिक नायकचे कार्यकारी संपादक, ज्येष्ठ पत्रकार श्याम तिवारी यांनी राज्यकर्तेच कायद्याचे उल्लंघन करुन पत्रकारांवर हल्ले करु लागले तर राज्यात कायदा शिल्लक राहणार नाही. पोलिसांनी राजकीय दबाव झुगारुन आमदारांसह त्यांच्या समर्थक गुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले पाहीजे. तसे न घडल्यास पत्रकारांचे आंदोलन अधिक तीव्र होण्याचा इशारा दिला.


यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे संगमनेर तालुकाध्यक्ष शेखर पानसरे, ज्येष्ठ पत्रकार गौतम गायकवाड, श्याम तिवारी, विलास गुंजाळ, गोरक्षनाथ मदने, गोरक्ष नेहे, शिवाजी क्षीरसागर, संजय आहिरे, संंदीप इटप, भारत रेघाटे, आनंद गायकवाड, आदेश वाकळे, बाबासाहेब कडू, सचिन सोनवणे आदी पत्रकार उपस्थित होते.

Visits: 109 Today: 1 Total: 1102959

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *