सिन्नर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी अन्यथा स्वाभिमानीने दिला आंदोलन करण्याचा इशारा

नायक वृत्तसेवा, सिन्नर
तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने ३० ऑगस्टपर्यंत दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. दुष्काळ जाहीर न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.१६) संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत व अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे यांनी प्रास्ताविक केले. सिन्नर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर सखोल चर्चा या बैठकीत करण्यात आली. यावेळी बहुतांश भागात पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे ऑगस्ट महिना संपत आला तरीही खरीप हंगामातील कुठल्याही पिकाची पेरणी झालेली नाही. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यासोबतच पिण्याच्या पाण्यासह दूध उत्पादक शेतकर्यांना जनावरांच्या चार्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

येत्या २५ तारखेला याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन देणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी सांगितले. ३० ऑगस्टपर्यंत दुष्काळ जाहीर न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी सांगितले. अहमदनगर जिल्हा स्वाभिमानीचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दुग्ध उत्पादक शेतकर्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान शासनाने द्यावे, अशी मागणी केली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी बाजार समितीचे संचालक कृष्णा घुमरे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाप्रमुखपदी तुषार शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली. सिन्नर तालुक्यातील थकीत कर्ज संदर्भात सुधाकर मोगल यांनी मार्गदर्शन केले. बाजार समितीचे सभापती रवींद्र पवार यांनी तालुक्यात चारा छावणी, चारा डेपो सुरू करावेत, या विषयावर भर दिला. सिन्नर तालुकाध्यक्ष आत्माराम पगार यांनी आभार मानले. यावेळी गजानन घोटेकर, सागर गवळी, कळवण तालुकाध्यक्ष रवी शेवाळे, राजू शिरसाट, संपत पगार, कैलास शिंदे, धनंजय निरगुडे, नीलेश पगार, सचिन पगार, कचेश्वर गाडे, संजय वारुळे, संजय पगार, केशव कोकाटे, जालिंदर थोरात, नवनाथ घुगे, सुनील चकोर, रवींद्र शेळके आदी उपस्थित होते.
