वाड्यावस्त्यांवरील मुलांच्या हातात आले शैक्षणिक टॅब रोटरी क्लब संगमनेरकडून 1 कोटींच्या 665 टॅबचे मोफत वितरण
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शैक्षणिक क्षेत्रात अतिशय भरीव काम करणार्या रोटरी क्लब संगमनेरतर्फे वाड्यावस्त्यांवरील, दुर्गम भागातील मुलांना आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा हेतू समोर ठेवून संगमनेर व अकोले तालुक्यातील 37 शाळांमधील 2000 विद्यार्थ्यांना 665 शैक्षणिक टॅबचे वितरण करण्यात आले.
रोटरी क्लब तैवान, रोटरी क्लब पुणे यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविला गेला. टॅब वितरण व शाळा शिक्षकांना प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच मालपाणी लॉन्स संगमनेर येथे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे नॉर्थ क्लबचे अध्यक्ष गिरीष कोणकर, केतन जोशी, पीडीजी ओमप्रकाश मोतीपवळे, एजी गौरव भुजबळ तसेच अध्यक्ष ऋषीकेश मोंढे, सचिव आनंद हासे, रोटरी क्लब अकोलेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र डावरे, प्रकल्प प्रमुख दिलीप मालपाणी, सुनील घुले, योगेश गाडे, पवनकुमार वर्मा आदी उपस्थित होते.
यावेळी गिरीष कोणकर यांनी टॅब प्रकल्पामागची पार्श्वभूमी विशद केली. तसेच शिक्षकांनी टॅब वापरण्याविषयी आणि टॅबचा जास्तीत जास्त वापर कसा केला जावा याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी दिलीप मालपाणी यांचा एजी पुरस्काराबद्दल सन्मान करण्यात आला. शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्वाच्या असलेल्या या प्रकल्पाच्या यशस्वीततेसाठी मदत केलेल्या सर्व लाभार्थी शाळांचे स्कूल कमिटी सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, गावकरी यांचे आभार मानले. सूत्रसंचालन अजित काकडे, संजय कर्पे, डॉ. किशोर पोखरकर यांनी केले, तर आभार अमित पवार यांनी मानले. प्रकल्प यशस्वीततेसाठी महेश वाकचौरे, दीपक मणियार, रवींद्र पवार, विश्वनाथ मालाणी, मोहित मंडलिक, महेश ढोले, संकेत काजळे, मयूर मेहता, डॉ. सागर गोपाळे, अण्णासाहेब थोरात व सर्व रोटरी सदस्यांनी मेहनत घेतली.
अतिशय दर्जेदार व संपूर्ण शालेय अभ्यासक्रम असलेल्या टॅबमुळे जिल्हा परिषद शाळांना, विशेषतः द्विशिक्षकी शाळांना ह्या टॅबद्वारे मुलांना अतिशय सोप्या पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल. टॅब हाताळण्याच्या सरावामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि आकलन शक्ती, विषय ज्ञान निश्चितच वाढेल. हे विद्यार्थी जगाच्या कोपर्यात जरी असेल, तरी ते जगाबरोबर निश्चितच राहतील आणि असा विश्वास आहे.
– सुवर्णा फटांगरे (गटशिक्षणाधिकारी-संगमनेर)