दरोड्याच्या तयारीतील तिघांच्या आवळल्या मुसक्या; तर तिघे पळून जाण्यात यशस्वी! संगमनेर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दरोड्याच्या साहित्यासह दुचाकी जप्त..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे कोरोना महामारीचे संकट तर दुसरीकडे चोर्यांचे सत्र सुरू झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्यातच कोरोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मुख्य भूमिका असलेल्या संगमनेर शहर पोलिसांनी समनापूर बाह्यवळण मार्गावर (पुण्याकडे जाणारा मार्ग) शनिवारी (ता.27) मध्यरात्रीनंतर सव्वा दोन वाजेच्या सुमारास दरोड्याच्या तयारीतील तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर इतर तिघे अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. या कारवाईत पोलिसांनी दरोड्याच्या साहित्यासह एक दुचाकी असा 40 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, समनापूर बाह्यवळण मार्गावर (पुण्याकडे जाणारा मार्ग) दरोड्याच्या तयारीतील टोळी असल्याची माहिती गुप्त खबर्याद्वारे शहर पोलिसांना समजली होती. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर सव्वा दोन वाजेच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली आणि या टोळीतील तिघांना पकडले. मात्र अंधार असल्याने इतर तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी खाक्या दाखविताच विक्रम रामनाथ घोडेकर (वय 20), अजित अरुण ठोसर (वय 20, दोघेही रा.पंपींग स्टेशन कासारवाडी रोड, संगमनेर), सर्फराज राजू शेख (वय 19, रा.लाल तारा कॉलनीजवळ, अकोले नाका, संगमनेर) अशी नावे सांगितली असून कलीम अकबर पठाण, हलीम अकबर पठाण, असीफ शेख (तिघेही रा.जमजम कॉलनी, संगमनेर) हे पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

या कारवाईत आरोपींकडून पोलिसांनी एक दुचाकी, कोयते, गलोल असे 40 हजार 180 रुपयांचे दरोड्याचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी वरील सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक 170/2021 भादंवि कलम 399, 402 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निकिता महाले या करीत असून, यामध्ये पकडलेल्या चौघा आरोपींवर आधीच पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहे. त्यामुळे पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांनी कौतुक केले असून, रात्रीची गस्त वाढवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

एकीकडे कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य भूमिका निभावत असलेल्या पोलिसांसमोर चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे नव्हे आव्हान ठाकले आहे. कारण, आधीच कोरोना संकट त्यात चोर्या वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.

