बेशिस्तीला चाप लावण्यासाठी शहर पोलीस रस्त्यावर! दोन तासांत पन्नास कारवाया; कागपत्रांशिवाय वाहने चालविणार्यांवर बडगा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नियमित घडणार्या दुचाकी चोरीच्या घटना, रस्त्यांवरील अपघात आणि वाहतुकीचा खोळंबा अशा वेगवेगळ्या कारणाने सतत चर्चेत असलेल्या संगमनेर शहरात आता पोलिसांची आक्रमकता दिसू लागली आहे. सोमवारी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी फौजफाट्यासह थेट रस्त्यावर उतरुन महामार्गावरील बेशिस्तीला लगाम घालण्याची कवायत केली. त्यातून बेशिस्तीचा धूर सोडीत रस्त्याने सुसाट धावणार्या ४५ जणांच्या वाहनांना ब्रेक लागला असून त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत होत असून अशा कारवायांमध्ये सातत्य ठेवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील प्रगत शहरांच्या पंक्तीत आघाडीवर असलेल्या संगमनेरातील अरुंद रस्ते, त्यात जागोजागी बोकाळलेली बेसुमार अतिक्रमणे आणि त्यात बेशिस्त वाहनांची भर यामुळे वैभवशाली शहराचा ढोल वाजवणार्या संगमनेरची पार रया गेली आहे. मध्यंतरी पालिकेने शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविल्यानंतर काहीकाळ सुरळीत असलेली शहरातील वाहतूक व्यवस्था आता अस्ताव्यस्त झाल्याने सामान्य नागरिक पालिका आणि पोलिसांच्या नावाने बोटं मोडीत होती. याबाबत दैनिक नायकने गेल्या शनिवारी (ता.५) शहराच्या बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेची पोलखोल करताना पालिका आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. त्याची दखल घेत सोमवारी सायंकाळी शहर पोलीस रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले.
सोमवारी (ता.७) सायंकाळी पोलिसांनी बसस्थानक चौकात नाकाबंदी लावून सरसकट दुचाकी वाहनांची तपासणी सुरु केली. या कारवाईतून गेल्या अनेक दिवसांपासून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला जात असलेल्या दुचाकी वाहनांचा शोध घेण्यासह अपघातमुक्त रस्ते निर्माण व्हावेत यासाठी वाहन परवाना नसतानाही वाहने चालविणारे अल्पवयीन विद्यार्थी, रहदारीस अडथळा निर्माण करुन उभी राहणारी वाहने, दुचाकीवर नियमानुसार क्रमांक न टाकता फॅन्सी नंबर प्लेट लावणे, शिरस्त्राणाशिवाय (हेल्मेट) वाहन चालवणे अशा वेगवेगळ्या कारणांनी कारवाया करण्यात आल्या. याशिवाय मद्यप्राशन करुन वाहने चालविणार्यांविरोधातही पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
सोमवारी सायंकाळी ५ ते ७ अशा दोन तासांच्या या मोहिमेत पोलिसांनी परवाना नसतानाही दुचाकी वाहने चालविणार्या १५ जणांवर दंडात्मक कारवाई करीत ७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. यासोबतच शिरस्त्राण (हेल्मेट) नसलेल्या १० जणांकडून पाच हजार रुपये, भररस्त्यात वाहने उभी करुन रहदारीस अडथळा निर्माण करणार्या दहा जणांकडून पाच हजार रुपये व विना क्रमांकाच्या अथवा फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या दहा दुचाकी चालकांकडून पाच हजारांचा दंड वसुल करण्यात आला. सायंकाळी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पोलिसांनी एकूण ४५ वाहन धारकांकडून २२ हजार ५०० रुपयांची दंड वसुली केली. त्या सोबतच मद्यप्राशन करुन वाहन चालविणार्या सहा जणांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
बसस्थानक परिसरात सुरु असलेल्या या कारवाईच्या वेळी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचेही दिसले. तसेच, अनेक विद्यार्थ्यांनी आपले पालक, परिसरातील कथित स्वयंघोषीत पुढारी यांना फोन करीत मदतीचे साकडेही घातले. त्यामुळे या कारवाई दरम्यान अनेकांनी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना फोन करुन अमुक तमुकला सोडून द्या म्हणून आग्रह केल्याचे, मात्र त्यांनी तो धुडकावल्याचेही बघायला मिळाले. यावेळी ऑनलाईन दंडात्मक कारवाई करताना बँक खातेच नसल्याचे सांगणार्या एकूण दहाजणांकडून रोखीने दंडाची वसुली करण्यात आली. या कारवाईची वार्ता गावभर पसरल्याने एरव्ही सायंकाळच्यावेळी प्रचंड गर्दीने व्यापलेल्या या परिसरात जेमतेम गर्दी दिसत होती.
वास्तविक शहरातील अतिक्रमणं व परस्पर निर्माण होणार्या रिक्षा थांब्यांवर पालिकेचे थेट नियंत्रण असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र पालिकेच्या अतिक्रमण विभागातील काही अधिकारी व कर्मचार्यांचे अशा घटकांशी अर्थपूर्ण संबंध असल्याने वारंवार घटना व दुर्घटना घडूनही आजवर कधीच त्यावर पालिकेला नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे दिवसेंदिवस शहराच्या बेशिस्तीत भर पडत असताना आता पोलिसांनीच आपली जबाबदारी वठवण्यासाठी थेट रस्त्यावर उतरुन कारवाया करण्यास सुरुवात केल्याने काही प्रमाणात शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्याची आशा निर्माण झाली आहे. पालिकेनेही आपले दायित्त्व ठळक करताना नियमित अतिक्रमण हटाओ मोहिमेसह शहरातील बेकायदा रिक्षा थांबे उध्वस्त करण्याची गरज आहे.
वारंवार घडणार्या दुचाकी चोरीच्या घटना, अल्पवयीन मुलांकडे वाहने सोपविण्याची पद्धत, वाहतूक नियमांची पायमल्ली आणि त्यामुळे घडणार्या दुर्दैवी घटना रोखण्यासाठी सोमवारपासून संगमनेर पोलिसांनी धडक कारवाया करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहने घेवून रस्त्यावर फिरताना प्रत्येकाने वाहन चालविण्याचा परवाना व वाहनाची कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागेल. कायद्यातील तरतुदीनुसार अल्पवयीन मुलांकडे वाहने देणार्या पालकांवरही कायदेशीर कारवाई होवू शकते, त्यामुळे पालकांनी परवाना नसताना पाल्यांकडे वाहने देवू नयेत.
– भगवान मथुरे
पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर