‘अखेर’ निळवंडे धरणातून विसर्जनासाठी पाणी सोडले! 2012 ची पुनरावृत्ती टळली; आवर्तनाचे पाणी कधी पोहोचणार याची उत्सुकता..
नायक वृत्तसेवा, अकोले
जोपर्यंत नदीपात्रात पाणी सोडणार नाही तोपर्यंत विसर्जन करणार नाही अशी भूमिका घेत तब्बल 19 दिवस सार्वजनिक गणेश मंडळांसह तब्बल 60 हजार घरगुती गणपतींचे विसर्जन खोळंबल्याचा संगमनेरचा इतिहास आहे. 2012 साली घडलेल्या या घटनेची दोनच वर्षांनी पुन्हा पुनरावृत्ती झाली होती. मात्र त्यानंतर शांतता समितीच्या प्रत्येक बैठकांमध्ये हाच विषय केंद्रीत राहील्याने प्रशासनाने पुन्हा तशीवेळ येवू दिली नाही. त्याची प्रचिती पुन्हा एकदा मिळाली असून शुक्रवारी होणार्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी सहा वाजता निळवंडे धरणातून 1 हजार 134 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. म्हाळुंगी व आढळा नदी यापूर्वीच प्रवाहित असल्याने पुणेनाक्याजवळील संगमावर मोठ्या मूर्ती विसर्जित करण्यासाठी पुरेसे पाणी असेल अशी अपेक्षा आहे.
संगमनेर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाला 127 वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी मोठ्या जल्लोशात साजर्या होणार्या या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी सार्वजनिक गणेश मंडळांसह शहरातील हजारो घरगुती गणपतींचे प्रवरानदीच्या वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याची संगमनेरकरांची पारंपरिक पद्धत आहे. मात्र 2012 साली दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केवळ विसर्जनासाठी नदीपात्रात पाणी सोडण्यास प्रशासनाने मनाई केली होती. त्यामुळे संगमनेरच्या सार्वजनिक गणेश मंडळांनी जोपर्यंत नदीपात्रात पाणी येत नाही, तोपर्यंत विसर्जन करणार नसल्याची भूमिका घेतली होती.
मात्र त्यानंतरही प्रशासन नरमले नाही. त्याचा परिणाम संगमनेर शहरातील 115 हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांसह तब्बल 60 हजारांहून अधिक घरगुती गणपती जागेवरुन हललेच नाहीत. त्यामुळे संगमनेरात शांतता व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने अखेर गणेश स्थापनेच्या 18 व्या दिवशी निळवंडे धरणातून प्रवरानदीपात्रात पाणी सोडण्यात आले दुसर्या दिवशी सायंकाळी ते पाणी संगमनेरात पोहोचल्यानंतर संगमनेरात सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका निघाल्या व त्यांच्यासोबतच खोळंबलेल्या घरगुती गणपतींचेही विसर्जन झाले होते.
तसा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी कार्यकर्त्यांसह स्थानिक प्रशासनानेही त्यानंतर प्रत्येक वर्षी नदीपात्रात पाणी असेल याची खबरदारी घेण्यास सुरुवात केली, मात्र 2014 साली तसाच प्रसंग पुन्हा निर्माण झाला होता. विसर्जनाच्या आदल्या दिनी रात्री उशिरापर्यंत धरणाची कवाडे उघडली गेली नाही. त्याचा परिणाम शहरातील एकाही मंडळाने मिरवणुकीची तयारी न केल्याने पुन्हा पेच निर्माण झाला. मात्र त्यावेळी प्रशासनाने पुढाकार घेत जलसंपदा विभागाला पाणी सोडण्यास भाग पाडल्याने मध्यरात्री 12 वाजता धरणातून पाणी सोडले गेले ते विसर्जनाच्या दिवशी सायंकाळी उशिराने संगमनेरात पोहोचल्यानंतर शहरात गणरायांचे विसर्जन सुरु झाले होते.
यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होवूनही ऐन विसर्जनालाच प्रवरापात्र कोरडे असल्याने पुन्हा असा पेच निर्माण होवू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली असून आज सकाळी सहा वाजता निळवंडे धरणातून 1 हजार 134 क्यूसेकने पाणी सोडले गेले आहे. सदरचे पाणी उद्या संध्याकाळपर्यंत संगमनेरात पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र आढळा व म्हाळुंगी या दोन्ही नद्यांना सध्या पाणी असल्याने संगमावर याक्षणीही विसर्जनासाठी वाहते पाणी उपलब्ध असल्याने यंदा पुन्हा मागील प्रकरणांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाही.