इतिहासात दुसर्‍यांदा शिर्डीच्या खासदारांवर ओढावली नामुष्की! संतप्त शिवसैनिकांकडून फितुरीचा आरोप; संगमनेरात पाय ठेवू देणार नसल्याचाही एल्गार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्याच्या सत्तासंघर्षात सध्या विविध नाट्यमय घडामोडी घडत आहेत. या सत्तानाट्यात मंगळवारी राजधानी दिल्लीत शिवसेनेचे डझनभर खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी जुळवून घेत असतांना शेकडों किलोमीटर अंतरावरील महाराष्ट्रात मात्र ‘त्या’ सर्वांच्या नावाने शिमगा सुरू होता. संगमनेरातही संतप्त शिवसैनिकांनी एकत्रित येत शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांना अपशब्दांची लाखोळी वाहत शिवसेनेच्याच कार्यालयावर लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरील त्यांच्या प्रतिमेला काळे फासले गेले. यावेळी शिवसैनिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करतांना शिवसेनेशी गद्दारी करणार्‍या खासदार लोखंडे यांना संगमनेरात पाय ठेवू देणार नसल्याचाही एल्गार केला. शिर्डी मतदारसंघातील सेनेच्या खासदारांवर इतिहासात दुसर्‍यांदा ही नामुष्की ओढावली आहे. यापूर्वी 2014 साली तत्कालीन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही पक्षत्याग करुन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, तेव्हाही त्यांना अशाच प्रसंगाचा सामना करावा लागला होता. मंगळवारी त्याची पुनरावृत्ती झाली.

महिन्याभरापूर्वी राज्य विधीमंडळातील शिवसेनेच्या 55 आमदारांमधील तब्बल 39 आमदारांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची साथ करीत आपल्या वेगळ्या गटाची घोषणा केली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सूत्रातून 31 महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर 1 जुलैरोजी शिंदे गटाने भाजपाशी जवळीक करुन राज्यात सत्ता स्थापन केली व मुख्यमंत्रीपदावर बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे विराजमान झाले. या दरम्यानच्या काळात विविध राजकीय घडामोडीही घडल्याने राज्यातील वातावरण दुषीत झाले. राज्यातील आमदारांपाठोपाठ शिवसेनेच्या काही खासदारांनीही शिंदेगटाचाच सूर आळवण्यास सुरुवात केल्याने विधीमंडळा नंतर संसदीय मंडळातही बंडाळीचा वास येवू लागला होता.

मात्र ज्या पद्धतीने राज्यातील विधान परिषदेची मतदान प्रक्रिया राबविल्यानंतर शिवसेनेतील आमदारांची बंडाळी उघड झाली, तशीच राष्ट्रपतीपदाचे मतदान झाल्यानंतर संसदीय मंडळातील खासदारही वेगळ्या गटाची स्थापना करतील असा अंदाज बांधला गेला होता. असं आक्रीत घडू नये यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांशी संवाद साधून त्यांच्या मागणीनुसार पुरोगामी लोकशाही आघाडीचा दंडक मोडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबाही दिला व त्याप्रमाणे सेनेच्या सर्व खासदारांनी मतदानही केले. त्यामुळे खासदारांची बंडखोरी इतक्याच घडणार नाही असे वाटत असतांना महिनाभरापूर्वी घडलेल्या घटनेचीच पुनरावृत्ती घडली आणि शिवसेनेच्या 12 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट जवळ केला.

मंगळवारी खासदारांच्या बंडखोरीचे वृत्त राज्यात येवून धडकताच अनेक ठिकाणचे शिवसैनिक संतप्त झाले. ज्या-ज्या मतदार संघातील खासदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतला त्या-त्या खासदारांच्या मतदार संघात शिवसैनिकांनी आंदोलने केली. शिर्डी लोकसभा मतदारसंघातही खासदार सदाशिव लोखंडे यांच्या बंडाळीचा निषेध नोंदविला गेला. शहरप्रमुख अमर कतारी यांनी यासाठी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार शहरातील शिवसैनिकांनी शिवसेनेच्या स्थानिक कार्यालयात जमा होवून चक्क आपल्याच कार्यालयावर लावलेल्या फ्लेक्सवरील खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रतिमेला काळे फासले. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनाच्या तर खासदार लोखंडे यांच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी शिवसेनेच्या विविध पदाधिकार्‍यांनी आपल्या भावना व्यक्त करीत खासदार लोखंडे यांना गद्दार, फितूर अशी वेगवेगळी विशेषणं लावून त्यांना अपशब्दांची लाखोळीही वाहिली.

या आंदोलनात नागपूरचे संपर्कप्रमुख नरेश माळवे, भारतीय कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख मुजीब शेख, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, शहरप्रमुख अमर कतारी, उपशहर प्रमुख विकास डमाळे, दीपक वन्नम, इम्तियाज शेख, वेणूगोपाल लाहोटी, राजू सातपुते, अमोल डुकरे, फैजल शेख, रवींद्र गिरी, अजीज मोमीन, महिला आघाडीच्या संगीता गायकवाड, आशा केदारी, सुदर्शन इटप, अनुप म्हाळस आदिंसह शहर व परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते.


संगमनेरातील सर्व शिवसैनिक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवणारे आहेत. शिवसेनेशी गद्दारी करणारा कोणीही असला तरीही सामान्य शिवसैनिक त्याची गय करीत नाही हे संगमनेरच्या शिवसैनिकांनी 2014 साली दाखवून दिले आहे. खासदार लोखंडे यांनी आमचा सर्वांचा विश्वासघात केला आहे, त्यातून त्यांना माफी मिळणार नाही. यापुढे खासदार लोखंडे यांना संगमनेर मतदारसंघात आम्ही पायही ठेवू देणार नाही.
– अमर कतारी
शिवसेना शहरप्रमुख, संगमनेर


शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे शिवसैनिकांच्या परिश्रमाने आणि सामान्य मतदारांच्या भरवशाने निवडून आले आहेत. त्यांचे शिवसेना पक्षासाठी कोणतेही योगदान नाही. शिर्डी मतदार संघात तर त्यांची प्रतिमा गायब होणार्‍या ‘मिस्टर इंडिया’सारखीच होती. त्यांना मतदारसंघातील कामांचीही जाण नव्हती आणि ते कधी शिवसैनिकांच्या अथवा मतदारांच्या सुख-दुःखातही सहभागी झाले नाहीत. मात्र सत्तेच्या लालसेने त्यांनी कोणत्याही स्वकर्तृत्त्वाशिवाय दोनवेळा खासदारकी दिलेल्या शिवसेनेशी फंदफितुरी केली आहे. शिवसेना हा निष्ठावान सैनिकांच्या जीवावर चालणारा पक्ष आहे, तेथे खासदार लोखंडेंसारख्या गद्दारांना स्थान नसल्याने यापुढे त्यांना मतदार संघात फिरु देणार नाही.
– नरेश माळवे
संपर्कप्रमुख – नागपूर (दक्षिण)

Visits: 23 Today: 1 Total: 118689

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *