देशात प्रतिबंधित असलेला तीन टन मांगूर मासा पकडला! घारगाव पोलिसांची कारवाई; सुमारे अकरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मानवी व पर्यावरणीय आरोग्यास घातक असल्याने देशात बीजोत्पादन, संवर्धन, पणन व वाहतूक करण्यास बंदी असलेला मांगूर जातीचा तब्बल तीन टन मासा जप्त करण्यात आला आहे. एका मालट्रकमध्ये पाण्याचा कृत्रिम तलाव करुन इंदापूरहून भरलेला हा मासा मध्य प्रदेशात चालला होता. मात्र तालुयातील बोटा शिवारात काहींना संशय आल्याने त्यांनी सदरील वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता सदरचा प्रकार उघड झाला. सुरुवातीला घारगाव पोलिसांनी त्यावर कारवाई करण्यास टाळाटाळही केली, मात्र पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी पोलिसांचे कान उपटताच सदरील मालट्रक ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी अहमदनगरच्या मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी मनीषा देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वाहनचालकासह त्याच्या सहाय्यकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त केलेल्या माशांची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली आहे. अलिकडच्या काळात जिल्ह्यात झालेली अशाप्रकारची बहुधा ही पहिलीच कारवाई ठरली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार बुधवारी (ता.२) सायंकाळी पाचच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील बोटा शिवारात उघड झाला. पुण्याहून नाशिकच्या दिशेने जात असलेल्या एका आयशर ट्रकमधून पाणी गळत असल्याने बोट्यातील काही तरुणांना संशय आला. त्यावरुन त्यांनी सदरील मालट्रक थांबवून पाठीमागे चढून बघितले असता आजुबाजूला तात्रपत्री लावून ट्रकच्या मध्यभागी कृत्रिम तलाव केल्याचे व त्यात भारतात बंदी असलेले काळ्या रंगाचे मांगूर जातीचे मासे वळवळत असल्याचे ‘त्या’ तरुणांना दिसले. याबाबत वाहनचालकाकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्याच्याकडे काहीही नसल्याचे समोर आले. त्यामुळे संशय बळावल्याने घारगाव पोलिसांना कळविण्यात आले. मात्र त्यानंतर तब्बल दोन तास प्रतीक्षा करुनही घारगाव पोलीस ठाण्यातही कर्मचारी फिरकले नाहीत.

त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना माहिती दिली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच घारगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले व सायंकाळी सातच्या सुमारास त्यांनी सदरील मालट्रक ताब्यात घेत पोलीस ठाण्याच्या आवारात नेला. याबाबत घारगावचे निरीक्षक संतोष खेडकर यांनी अहमदनगरच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना माहिती कळविल्यानंतर गुरुवारी विभागाच्या विकास अधिकारी मनीषा देसाई व सहाय्यक अधिकारी प्रतीक्षा पाटेकर यांनी घारगावमध्ये येवून जप्त केलेल्या माशांची तपासणी केली असता ते प्रतिबंधित असलेल्या मांगूर जातीचे असल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी देसाई यांच्या फिर्यादीवरुन मालट्रकचा चालक लोणाजी रतनलाल ताड (वय ४६) व त्याचा सहाय्यक करण हरी चौहान (वय २९, दोघेही रा.दलपूर राजगड, ता.सरदारपूर, जि.धार, मध्यप्रदेश) यांच्यावर भरतीय दंडसंहितेच्या कलम १८८, २७३, २७७ नुसार गुन्ह्याची नोंद करीत जप्त केलेल्या सुमारे तीन हजार किलो वजनाच्या मांगूर माशांना नियमानुसार दहा फूट खोल व तीस फूट रुंद खड्डा घेवून आंबीखालसा फाट्यानजीक गाडण्यात आले. या कारवाईत घारगाव पोलिसांनी २ लाख ७० हजार रुपये किंमत असलेला तीन टन मांगूर मासा व ८ लाख रुपये किंमतीचा आयशर कंपनीचा ट्रक (क्र.एम.पी.०९/जी.एच.१७१९) असा एकूण १० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरचा मासा आंध्र प्रदेशातील अण्णा नामक व्यक्तीच्या सांगण्यावरुन पुणे जिल्ह्यातील भिगवण (ता.इंदापूर) येथून भरुन तो मध्य प्रदेशातील इंदूर येथे नेला जात होता. याबाबतचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष खेडकर करीत आहेत.

थायलंडमध्ये विकसित झालेली माशांची मांगूर जात मांसाहारी श्रेणीतील आहे. हा मासा दूषित पाण्यासह दलदलीतही वेगाने वाढतो. इतर मासे पाण्यातील ऑसिजनचे प्रमाण कमी होताच मृत्यू पावतात, मात्र हा मासा त्याला अपवाद असून तो ज्या तलावात वाढतो त्या तलावातील स्वजातीय लहान माशांसह इतर सर्व कीटकांनाही खाऊन टाकतो. याशिवाय कुजलेले मांस, किडे व मानवी मांस भक्षण करण्यात व ते पचवण्यातही हा मासा सक्षम असल्याने त्यापासून मानवी जीवासह पर्यावरणालाही मोठा धोका आहे. देशात सर्वप्रथम १९९८ साली केरळमध्ये या माशाच्या बीजोत्पादन, संवर्धन, पणन व वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर सन २००० साली केंद्र सरकारने त्यावर बंदी घातली, तेव्हापासून देशात या माशांचे उत्पादन, साठा, पुरवठा व विक्री करण्यास बंदी आहे.


मानवी जीवाला घातक असलेल्या या माशांची माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात सदरील मालट्रक पकडणार्‍या नागरिकांना तब्बल दोन तास पोलिसांची प्रतीक्षा करावी लागली. यावरुन घारगाव पोलीस ठाण्यात बोकाळलेला भ्रष्टाचारही ठळकपणे समोर आला असून अधिकारी व कर्मचारी मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अखेर दोन तासांनी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी घारगावच्या निष्क्रिय पोलिसांचे कान उपटले आणि त्यानंतरच्या दहाच मिनिटांत सदरची कारवाई करण्यात आली.

Visits: 134 Today: 1 Total: 1105289

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *