भंडारदर्याच्या सांडव्याचा दरवाजा उघडला! पावसाची संततधार कायम; तीन हजार दोनशे क्यूसेकचा विसर्ग

नायक वृत्तसेवा, अकोले
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर धरणांच्या पाणलोटात परतलेल्या पावसाला अद्यापही म्हणावा तसा जोर नसला तरीही संततधार टिकून असल्याने जिल्ह्यातील तीनही मोठ्या धरणांची जलस्थिती समाधानकारक अवस्थेत पोहोचली आहे. रविवारपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील पावसाचा जोर काहीसा वाढल्याने सकाळी धरणाची पाणीपातळी ८३ टक्क्यांवर पोहोचली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज सकाळी १० वाजता धरणाच्या सांडव्यातून २ हजार ३६२ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने निळवंडे धरणाच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या निळवंडे धरणाचा पाणीसाठा ४१ टक्के तर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणाचा पाणीसाठा ५१ टक्क्यांवर पोहोचला आहे. लाभक्षेत्रात मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे.

गेल्या काही दिवसांपासून जोर ओसरलेल्या वरुणराजाला रविवारी उत्तर नक्षत्रात काहीसा जोर चढल्याचे बघायला मिळाले. भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील घाटघर, रतनवाडी व पांजरेसह मुळा खोर्यातील हरिश्चंद्रगड, पाचनई, कोळथे, खडकी, अंबित, कुमशेत, लव्हाळी अशा सर्वदूर जलधारा कोसळत आहेत. त्यामुळे या दोन्ही धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली असून वेगाने जलसाठे हलू लागले आहेत. भंडारदरा क्षेत्रातील घाटघर व रतनवाडीत आज सकाळपासूनच पावसाचे धूमशान सुरु असल्याने धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने पाणी पातळी नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज सकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांत भंडारदरा धरणात ४२७ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाल्याने धरणासाठा ८२.७२ टक्के झाला होता. सूर्योदयानंतर पावसाला आणखी जोर चढल्याने पाण्याची आवकही रुंदावली आहे, त्यामुळे सकाळी १० वाजता धरणाच्या सांडव्याचा दरवाजा उघडण्यात आला असून त्याद्वारे २ हजार ३६२ क्यूसेक तर विद्युत निर्मितीसाठी ८३५ क्यूसेक असा एकूण ३ हजार १९७ क्यूसेकचा प्रवाह प्रवरा नदीपात्रात सोडण्यास सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत सदरचा प्रवाह निळवंडे धरणात अडविला जाणार असून निळवंड्याला जलसाठा समाधानकारक अवस्थेत पोहोचल्यानंतर प्रत्यक्ष प्रवरापात्रात पाणी सोडले जाणार आहे. भंडारदरा धरण ८३ टक्क्यांवर पोहोचल्याने लाभक्षेत्रातून आनंद वाहू लागला आहे.

दुसरीकडे मुळा खार्यातही सर्वदूर पावसाला जोर कायम असून छोटे-मोठे ओहोळ खळाळत वाहत असल्याने मुळा नदी दुथडी भरुन वाहत असून कोतुळनजीकच्या नदीपात्रातून ६ हजार ५९२ युसेक वेगाने धरणाकडे पाणी वाहत आहे. कळसूबाईच्या शिखरांवरही संततधार कायम असल्याने वाकी जलाशयावरुन ५५६ क्यूसेकने ओव्हरफ्लोचे पाणी वाहत असून त्याद्वारे २४ तासांत निळवंडे धरणाच्या पाणीसाठठ्यात ३२ दशलक्ष घनफूटाची भर पडली आहे. त्यातच आता भंडारदर्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेल्याने निळवंडे धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढण्यास मदत होणार आहे.

तालुयाच्या पश्चिम घाटमाथ्यावरील पावसात सातत्य कायम असताना पूर्वभागातील स्थिती मात्र अद्यापही चिंताजनक आहे. या परिसरातील पाडोशी व सांगवी ही लघु प्रकल्प अद्यापही भरली नसल्याने दुष्काळी भागांना संजीवनी देणार्या आढळा मध्यम प्रकल्पात चालू हंगामात थेंबभरही पाणी जमा झालेले नाही. त्यामुळे आढळेच्या लाभक्षेत्रात काहीशी चिंता दाटली असून शेतकर्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. यंदा बिताका डोंगररांगांवरही पावसाला फारसा जोर नसल्याने धरणात पाण्याची आवक सुरु झालेली नाही.

आज सकाळी ६ वाजता धरणातील पाणीसाठे : मुळा १३ हजार १०८ दशलक्ष घनफूट (५२.४२ टक्के), भंडारदरा ९ हजार १३१ दशलक्ष घनफूट (८२.७२ टक्के), निळवंडे ३ हजार ३६० दशलक्ष घनफूट (४०.३८ टक्के) व आढळा ५३७ दशलक्ष घनफूट (५०.६६ टक्के). पाऊस : घाटघर १४६ मि.मी., रतनवाडी १४१ मि.मी., पांजरे १०४ मि.मी., भंडारदरा ७५ मि.मी., वाकी ५७ मि.मी., निळवंडे २० मि.मी., अकोले ०७ मि.मी., संगमनेर ०१ मि.मी., राहाता ०२ मि.मी., कोपरगाव ०३ मि.मी व नेवासा ०२ मि.मी. विसर्ग : भंडारदरा – २ हजार ३६२ क्यूसेक + ८३५ क्यूसेक = ३ हजार १९७ क्यूसेक.
