जोर्वेनाक्याचा ‘मास्टरमाईंड’ पकडला! दोन महिन्यांनी दोघे लागले हाती; अटक झालेल्यांची संख्या बावीस..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
भररस्त्यात अतिक्रमणं थाटून रहदारीचा रस्ता अडवत खोळंबलेल्या वाहनचालकाने केवळ हॉर्न वाजवला म्हणून मोठ्या जमावासह त्याच्यावर हल्ला चढवण्याच्या प्रकरणातील मास्टरमाईंड अखेर दोन महिन्यांनी पोलिसांच्या हाती लागला आहे. रविवारी शहर पोलिसांनी संशयावरुन पाच जणांना ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर त्यातील दोघांना गजाआड करण्यात आले असून उर्वरीत तिघांना सोडून देण्यात आले आहे. अटक केलेल्या दोघांना आज न्यायालयासमोर हजर केले असून अटक केलेल्या दोघांनाही 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. या वृत्ताने त्यावेळी दंगलीत सहभागी झालेले आणि नंतर अटकेच्या भीतीने दीर्घकाळ पसार होवून आता सगळं शांत झाल्याचे समजून हळूहळू घराकडे परणारे धास्तावले असून घरापासून त्यांचे अंतर पुन्हा एकदा वाढले आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (ता.२३) शहर पोलिसांच्या विशेष पथकाकडून दोन महिन्यांपूर्वी २८ मे रोजी जोर्वेनायावर घडलेल्या दंगलीतील आरोपींचा शोध सुरु असताना त्यातील काही पसार आरोपी घरी पतरल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पथकाने विविध भागात छापे घालून संशयित म्हणून पाच जणांना ताब्यात घेत सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात आणले. यावेळी ताब्यात घेतलेले सर्व संशयित व त्यांचे कुटुंबीय सदरील प्रकरणात आपला सहभाग नसल्याचे ओरडून सांगत होते. मात्र जोपर्यंत खात्री होत नाही, तोपर्यंत कोणालाही सोडणार नाही अशी कठोर भूमिका घेत पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी सुरु केली. त्यातून दोघांचा या घटनेशी थेट संबंध असल्याचे आणि त्यातील एक घटनेचा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले.

रविवारी मध्यरात्री ताब्यात घेतलेल्या सर्व संशयितांची वास्तव माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेले इतर तिघे सोडून दिले व त्यातील या संपूर्ण घटनेचा मुख्य सूत्रधार असलेल्या इरफान आयुब पठाण उर्फ इम्रान वडेवाला (वय ३३, रा.डाकेमळा) व वसीम इसहाक पठाण (वय ३6, रा.नाईकवाडपुरा) या दोघांना अटक केली आहे. आज त्या दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले जाणार असून अटक केलेल्या दोघांनाही 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीतून जोर्वेनाका हल्ला प्रकरणातील अन्य आरोपींची नावेही समोर येण्याची शयता आहे. या कारवाईने प्रकरण शांत झाल्याचे समजून दोन महिन्यांनी हळूहळू घरी परत येत असलेल्या पसार आरोपींमध्ये एकच खळबळ उडाली असून घरात अथवा घराजवळ पोहोचलेले संशयित पुन्हा पसार झाले आहेत.

दोन महिन्यांपूर्वी २८ मे रोजी जोर्वे येथील तन्मय नानासाहेब दिघे, सुमीत पोपट थोरात, विजय मंजाबापू थोरात व कुंडलिक पोपट दिघे या पिकअप घेवून जोर्वेकडे निघालेल्या चौघांना नायावर केवळ हॉर्न वाजवला या कारणावरुन २० ते २५ जणांनी बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर गावातील अन्य काही लोकांसह जखमी चौघेही पुन्हा शहरात आले व त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यातील गोकुळ गणपत दिघे, बाबासाहेब शिवाजी थोरात, जितेंद्र कैलास दिघे व अजय भिमाजी थोरात हे चौघे रात्री साडेनऊच्या सुमारास घराकडे जात असताना पुन्हा दीडशे ते दोनशे जणांच्या सशस्त्र जमावाने त्यांच्यावर हल्ला चढवून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तीन टप्प्यात एकूण २० जणांना अटक केली व ठरावित कालावधीनंतर त्या सर्वांना जामीनही मंजूर झाला. मात्र घटनेपासून पसार असलेल्या सूत्रधारांसह मुख्य आरोपी मात्र पोलिसांच्या हाती लागत नव्हते. मात्र पोलिसांनी त्यांचा शोध मात्र कायम ठेवला होता. त्यातच आता प्रकरण थंड झाले आहे असा समज करुन घेत काहीजण पुन्हा घरी परतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन त्यांनी तत्काळ छापे घालून पाचजणांना ताब्यात घेतले होते. रात्री उशिराने त्यातील दोघांचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक करुन उर्वरीत तिघांना सोडून देण्यात आले आहे. आज त्यांना न्यायालयासमोर उभे करुन त्यांच्या कोठडीची मागणी केली जाणार आहे.

Visits: 126 Today: 2 Total: 1104953

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *