धनादेशाचा अनादर केल्याने एक लाख दहा हजारांची नुकसान भरपाई! संगमनेरच्या महानगर दंडाधिकार्यांचा निर्वाळा; अन्यथा तीन महिन्यांचा तुरुंगवास..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दुकानदाराकडून घेतलेल्या वस्तुच्या बदल्यात त्याला दिलेला धनादेश खात्यात पैसेच नसल्याने वठला नाही. त्यामुळे संबंधित दुकानदाराने त्याविरोधात संगमनेरच्या अतिरिक्त महानगर दंडाधिकार्यांच्या न्यायालयात चलनक्षम पत्रकाच्या कायद्यान्वये दावा दाखल केला होता. त्यावरील सुनावणीनंतर न्यायालयाने वरवंडी येथील विठ्ठल तान्हाजी गागरे याला पंधरा दिवसांच्या आंत संबंधित दुकानदारास 1 लाख 10 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अलिकडच्या काळात धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी झालेली ही तिसरी शिक्षा आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथील विठ्ठल तान्हाजी गागरे यांनी बाभळेश्वर येथील साईसेवा ट्रॅक्टर्स या दुकानातून 73 हजार 500 रुपये किंमतीचे रोटावेटर मशीन खरेदी केले होते. त्यापोटी गागरे यांनी संबंधित दुकानदाराला मशीनच्या किंमतीचा धनादेश दिला. त्यानंतर साईसेवा ट्रॅक्टर्सच्या संचालकांनी सदरचा धनादेश बँकेत भरला असता गागरे यांच्या खात्यात आवश्यक पैसे नसल्याने तो अनादरीत (बाऊन्स)झाला. त्यामुळे संबंधित दुकानाचे मालक सुभाष नाईकवाडी यांनी गागरे यांच्या विरोधात संगमनेरच्या अतिरीक्त महानगर दंडाधिकार्यांच्या न्यायालयात भारतीय चलनक्षम पत्रक कायद्याच्या कलम 138 अन्वये दावा केला.
याप्रकरणी दंडाधिकार्यांसमोर झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तीवाद सादर झाला. यावेळी साईसेवा ट्रॅक्टर्सच्यावतीने कामकाज पाहणार्या अॅड.विजयानंद पगारे यांनी जोरदार युक्तीवाद करताना न्यायालयासमोर सबळ पुरावे सादर केले. त्यांचा युक्तीवाद व पुरावे ग्राह्य मानून महानगर दंडाधिकारी जे.व्ही.पेखले-पुरकर यांनी आरोपी विठ्ठल गागरे यांना दोषी धरुन साईसेवा ट्रॅक्टर्स यांना पंधरा दिवसांच्या आत 1 लाख 10 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. न्यायालयाने दिलेल्या मुदतीत सदरची रक्कम अदा न केल्यास आरोपीला तीन महिने तुरुंगवासाची शिक्षाही सुनावण्यात आली. या खटल्यात अॅड.पगारे यांना अॅड.किरण रोहोम, अॅड.पल्लवी निकाळे, अॅड.सुनीता जाधव व प्रशांत बोबडे यांनी साहाय्य केले.