न घडलेल्या बातमीचा पत्रकारांकडून पाठलाग! यंत्रणाही गोंधळली; मात्र तासाभरात अफवा असल्याचे झाले स्पष्ट..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
हाती आलेल्या माहितीची सत्यता पडताळून ती वाचकांपर्यंत पोहोचवणारा घटक म्हणजे पत्रकार. वाचकांची रुची पाहून वेगवेगळ्या क्षेत्रातून वास्तव घडामोडी, गुन्हे, कार्यक्रम व रोमांचक प्रसंगाच्या बातम्या शोधण्याचे काम पत्रकारांकडून सुरु असते. मात्र गेल्याकाही वर्षात सोशल माध्यमांच्या रुपातून बातमी आणि बातमीदारी यांचा कोणताही स्पर्श नसलेले घटकही समाजात बातम्या पेरु लागल्याने त्याचे चांगले-वाईट परिणामही दिसून येत आहेत. असाच काहीसा प्रकार शनिवारी सायंकाळनंतर संगमनेरातून समोर आला. व्हाटसअॅप विद्यापीठातून तयार झालेल्या एका बुद्धीवंताने संगमनेर पोलीस दलात एसीबीचा ‘ट्रॅप’ लागल्याची पुडी सोडली. बघताबघता या पुडीचा धूर इतका पसरला की चक्क त्यात एक-दोन नव्हेतर तब्बल अर्धाडझन पत्रकार गुरफटले. मात्र सरतेशेवटी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे समोर आले आणि संगमनेरातील ‘त्या’ पत्रकारांचा न घडलेल्या बातमीच्या मागील पाठलाग थांबला. मात्र सुमारे तासभर सुरु असलेल्या पत्रकारांच्या धावपळीची खुमासदार चर्चा मात्र अद्यापही सुरु आहे.

शनिवारी रात्री साडेआठची वेळ.. एका सहकारी पत्रकाराचा फोन आहे; ‘साहेब पोलीस खात्यात ट्रॅप लागलाय!’. कोणत्या पोलीस ठाण्यात अशा प्रतिप्रश्नावर त्याने ‘अद्याप ते कन्फर्म नाही, मात्र शहर किंवा तालुका आहे’ असे तो म्हणाला आणि मी तालुका पोलीस ठाण्यात जावून येतो असे म्हणतं त्याने फोन ठेवला. त्यानंतर काही क्षणातच दुसर्या एका सहकार्याचा फोन आला; ‘साहेब, समजले का?’ असा प्रश्न विचारीत त्याने तीच घटना सांगण्यास सुरुवात केली. या दरम्यान अन्य एकाने फोन करुन आपल्या अमुकतमूक सहकार्याच्या घरात वैद्यकीय अडचण निर्माण झाल्याचे व संबंधितास रुग्णालयात नेल्याची माहिती दिली.

एकीकडे पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी ‘ब्रेकींग’ समोर दिसत असताना सहकारी मित्राची रुग्णालयीन धावपळही समोर आल्याने प्रथम प्राधान्य म्हणून त्याला फोन करुन काही मदत हवीय का अशी विचारणा करायला पाहिजे असे वाटल्याने त्याला फोन केला. आश्चर्य म्हणजे सदरच्या बातमीची लिंक त्याच्यापर्यंतही पोहोचल्याने तो सोबत नेलेला रुग्ण तपासणीनंतर दवाखान्यात आपल्या पत्नीच्या भरवशावर सोडून बातमीसाठी बाहेर पडल्याचे त्याने सांगितले. यावरुन पत्रकाराच्या धावपळीच्या जीवनाचे आणि बातमीसाठीच्या समर्पणाचे दर्शनही घडून गेले. या कालावधीत आणखी दोन-चार सहकारी मित्रांनीही फोन करुन ‘ट्रॅप’ची माहिती दिल्याने या विषयाचे गांभीर्यही कमालीचे वाढले होते. त्यामुळे त्याची सत्यता शोधणे आवश्यक होते.

आता ही गोष्ट खरी की खोटी हे तपासावे म्हंटल्यावर त्याच विभागातील कर्मचार्यांना फोन करणे अनिवार्य होते. म्हणून काहींची नावे डोळ्यासमोर आली, मात्र त्याचवेळी यातील कोणी तर एसीबीच्या जाळ्यात फसले नसेल ना? असाही विचार मनात डोकावून गेला. त्यामुळे कधी नव्हे ते अशा काही कर्मचार्यांना सुरुवातीला ‘व्हाटसअॅपवर’ हाय असा संदेश पाठवून त्यांच्याशी संपर्क होईल का हे पडताळले गेले. त्यातील शहर पोलीस ठाण्यातील एकाला संदेश जाताच तो ऑनलाईन दिसल्याने त्याला फोन केला असता त्यांनाही अशीच माहिती मिळाल्याचे मात्र ती कन्फर्म नसल्याचे समोर आले. त्यामुळे कथीत प्रकार शहर पोलीस ठाण्यात घडला नसल्याचे स्पष्ट झाले.

त्यातून तालुका पोलीस ठाण्यातच हा प्रकार घडला असावा अशी शंका समोर आल्याने तिघे पत्रकार चक्क रिमझीम पावसातही घुलेवाडीकडे रवाना झाले. तर तिघे शासकीय विश्रामगृहात एसीबीच्या पथकाची वाट बघत बसले. तालुक्यात कोठेही एसीबीने कारवाई केल्यास लाचखोराला शासकीय विश्रामगृहात आणून त्याची चौकशी केली जाते. मात्र तासभर थांबूनही विश्रामगृहात कोणीच येईनात म्हणून त्यांच्या मनात भलत्याच शंका
निर्माण झाल्या. तालुका पोलिसांमध्ये असा प्रकार घडला का? याची माहिती मिळवण्यासाठी तेथील एका अधिकार्याला विचारणा केली असता त्यांनी कानावर हात ठेवल्याने तालुक्यालाही असा प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट झाले. शेवटी अखेरचा पर्याय म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहमदनगर आणि नाशिक येथील पथकातील ‘सूत्रांनाच’ फोन लावला गेला, आणि त्यातून ‘आमचे संपूर्ण पथक मुख्यालयीच आहे, संगमनेरातील कोणतीही तक्रार नाही किंवा प्रलंबितही नाही’ असे उत्तर दोन्हीकडून मिळाल्याने एक-दोन नव्हेतर अर्धाडझन पत्रकारांनी सुमारे तासभर पाठलाग केलेली ती माहिती केवळ अफवाच असल्याचे आणि त्याला चक्क पत्रकार आणि पोलीस यंत्रणेतील अनेक कर्मचारीही बळी पडल्याचे आणि न घडलेल्या घटनेचा पत्रकारांनी विनाकारण तासभर पाठलाग केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर यानिमित्ताने शासकीय विश्रामगृहात जमलेल्या पत्रकारांची टाळ्या देत हास्याचे फवारे उडवित खुमासदार चर्चा रंगली.

शनिवारी सायंकाळनंतर न घडलेल्या या बातमीची प्रथम माहिती देणारा पत्रकार जेवण करीत असतानाच उठून बातमीमागे धावला, तर दुसरी माहिती देणारा चक्क आपला रुग्ण पत्नीच्या भरवशावर दवाखान्यातच सोडून तालुका पोलीस ठाण्याच्या दिशेने धावला. एकजण बारा किलोमीटरचे अंतर कापून शहरात परतला तर चौथ्याने कुटुंबासह देवदर्शनाला जाण्याचा बेत रद्द केला. या घटनेतून पत्रकारांची बातमीसाठी धावपळ आणि आपल्या कर्तव्याच्या प्रति समर्पणाचा भावही अगदी स्पष्टपणे दिसून आला.

