अवघ्या पाच दिवसांतच संगमनेर तालुक्यात सतराशेहून अधिक रुग्ण! तालुक्यात आजही सुमारे चारशे तर जिल्ह्यात आढळले साडेचार हजार रुग्ण..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाच्या दुसर्या लाटेत अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णवाढ चिंताजनक पध्दतीने होत असून आजही जिल्ह्यात उच्चांकी 4 हजार 475 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. चालू महिन्याच्या सुरुवातीपासून संगमनेर तालुक्यातील संक्रमणाची गतीही वाढली असून अवघ्या पाच दिवसांत सरासरी 344 रुग्णगतीने तालुक्यात 1 हजार 721 रुग्णांची वाढ झाली आहे. आजही तालुक्यात 386 रुग्ण आढळले असून त्यात शहरातील 72 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील रुग्णगतीही सध्या प्रचंड भरात असून मागील पाच दिवसांत सरासरीने 3 हजार 720 रुग्ण दररोज इतक्या प्रचंड वेगाने जिल्ह्यात 18 हजार 602 रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 1 लाख 93 हजार 642 तर संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या 16 हजार 896 झाली आहे.
संक्रमणाच्या दुसर्या लाटेत कोविडची दाहकता अधिक वाढल्याने प्रादुर्भाव वाढण्यासोबतच बाधित रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. सध्याचा स्ट्रेन अतिशय घातक असून सुरक्षा साधनांशिवाय एखाद्या बाधिताशी थोडाफार संपर्क आला तरीही त्याचे संक्रमण होत आहे. यावेळच्या संक्रमणाने आपली लक्षणेही बदलली असून त्याकडे दुर्लक्ष केल्यास सामान्य दिसणारा बाधित अवघ्या काही तासांतच कोलमडून पडत असल्याची शेकडों उदाहरणे समोर आली आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनीही सध्याच्या स्ट्रेनबाबत अधिक सावधानता बाळगण्याची गरज असल्याचे वारंवार सांगीतले आहे. दुसर्या लाटेत संक्रमणागतीही मोठी असल्याने गेल्या महिन्याभरापासून राज्यात ‘कठोर निर्बंध’ लागू करण्यात आले आहेत. मात्र त्याचा कोणताही परिणाम सध्याच्या संक्रमणावर झालेला दिसत नाही, यावरुनही हा स्ट्रेन किती भयानक आहे याचा अंदाज बांधता येवू शकतो.
गेल्या महिन्यात (एप्रिल) जिल्ह्यातील कोविड संक्रमणाचा वेग सर्वाधीक असल्याचे मानले गेले. त्या एकाच महिन्यात दररोज सरासरी 2 हजार 627 रुग्ण समोर आल्याने अवघ्या 30 दिवसांतच जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत तब्बल 78 हजार 799 रुग्णांची भर पडली. तर मृत्यूदरातही आधीपेक्षा लक्ष्यनीय वाढ होवून दररोज सरासरी 26 याप्रमाणे एप्रिल महिन्यातील 30 दिवसांत जिल्ह्यातील तब्बल 771 जणांना आपला जीव गमवावा लागला. यात राहाता येथील पत्रकार अशो सदाफळ, शिर्डीचे पत्रकार बाबा मनीयार व श्रीरामपूर येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे यांचाही समावेश होता. संगमनेरातील संसर्गातही या एकाच महिन्यात प्रचंड वाढ होवून सरासरी थेट 215 रुग्ण दररोज या गतीवर जावून एकट्या संगमनेर तालुक्यात 6 हजार 445 रुग्ण समोर आले.
स्थानिक प्रशासनाकडून कोविड मृतांची संख्या माध्यमांना दिली जात नसल्याने मृतांची नेमकी संख्या समोर येणार नसली तरीही या एकाच महिन्यात कोविड संक्रमणातून एकट्या संगमनेर तालुक्यातील दोनशेहून अधिक जणांचा बळी गेला. यावरुन जिल्ह्यातील जाहीर न झालेल्या मृतांच्या एकूण आकड्याचा अंदाज बांधता येईल. दुसर्या संक्रमणातील हाच महिना उच्चांकी असेल असा अनेकांचा अंदाज होता.
मात्र मे महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांतच तो पूर्णतः फोल ठरला असून जिल्ह्यासह संगमनेर तालुक्याच्या रुग्णगतीने आणि मृतांच्या संख्येने एप्रिलची सरासरी खुप मागे टाकली आहे. एप्रिलच्या 30 दिवसांच्या तुलनेत चालू महिन्यातील पहिल्या पाच दिवसांचा विचार करता संक्रमणाच्या गतीत प्रचंड वाढ होवून जिल्ह्यात दररोज सरासरी 3 हजार 720 रुग्ण या वेगाने तब्बल 18 हजार 602 रुग्णांची वाढ झाली. तर मृत्यूदरातही नवा उच्चांक गाठतांना कोविडने गेल्या चार दिवसांतच दररोज सरासरी 43 रुग्ण या गतीने आत्तापर्यंत जिल्ह्यातील 171 जणांचा बळी घेतला आहे. ही सरासरी मागील महिन्याच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे, यावरुन कोविड संक्रमणाचा सध्याचा स्ट्रेन किती घातक आणि जीवघेणा आहे याचा सहज अंदाज बांधता येईल. अर्थात मृत्यूची संख्या वाढण्यामागे केवळ संक्रमण हे एकमेव कारण नसून ऑक्सिजन, रेमडेसिवीर अथवा अन्य औषधे आणि सर्वांसाठी आवश्यक असलेली रुग्णालयातील खाट न मिळाल्यानेही अनेकांनी आपले जीव गमावले आहेत.
आज जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील रुग्णगतीत पुन्हा मोठी वाढ झाल्याचे समोर आले. आज शासकीय प्रयोगशाळेकडून 1 हजार 53, खासगी प्रयोगशाळेकडून उच्चांकी 2 हजार 385 आणि रॅपीड अँटीजेनद्वारा प्राप्त निष्कर्षातील 1 हजार 37 अहवालांमधून जिल्ह्यातील 4 हजार 475 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. आजच्या अहवालातही अहमदनगर महापालिका क्षेत्रात सर्वाधीक 766, नगर ग्रामीणमध्ये 468, संगमनेर 386, श्रीगोंदा 300, पारनेर 286, श्रीरामपूर 283, राहाता 281, कर्जत 244, कोपरगाव 238, राहुरी 219, अकोले 204, नेवासा 156, शेवगाव 152, पाथर्डी 144, जामखेड 130, इतर जिल्ह्यातील 106, भिंगार लष्करी परिसरातील 92, इतर राज्यातील 11 व लष्करी रुग्णालयातील नऊ जणांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत आजही उच्चांकी भर पडून एकूण रुग्णसंख्या आता 1 लाख 93 हजार 642 झाली आहे.
संगमनेर तालुक्याच्या संक्रमणातही आजही मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. अर्थात शासकीय प्रयोगशाळेकडून स्राव चाचण्यांचे अहवाल प्राप्त होण्यास पुन्हा पाच ते दहा दिवसांचा उशीर होवू लागल्याने तालुक्यातील रुग्णवाढीची गती अनियमितपणे समोर येत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकही संभ्रमित होत असून कधी अचानक रुग्णसंख्येचा डोंगर तर कधी अचानक पायथा अशी स्थिती दिसत आहे. याच श्रृंखलेत आजचाही दिवस असून आज संगमनेर शहरातील 72 (यातही केवळ ‘संगमनेर’ असा उल्लेख असलेले 30 रुग्ण समाविष्ट आहेत) जणांसह एकूण 286 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तालुक्याने आता सतरा हजारांचा टप्पा ओलांडण्याच्या दिशेने आगेकूच करीत 16 हजार 896 रुग्णसंख्या गाठली आहे.