पावसात भिजून थोडीफार सहानुभूती मिळते : मंत्री भुजबळ पुण्याकडे जाताना जोरदार स्वागत; राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांची मात्र पाठ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अस्पृश्यता निवारण आणि महिलांच्या शिक्षणाचे कार्य सुरु झालेल्या पुण्यातील फुलेवाड्यातून प्रेरणा मिळत असल्याने आपण पुण्याकडे जात आहोत. रस्त्यात जागोजागी होणारे स्वागत आणि मिळणारा कार्यकर्त्यांचा पाठिंबा उत्साह वाढवणारा आहे. राज्यातील जनतेचा विकास व्हावा या एकमेव हेतूने आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. असे सांगत पावसात भिजून थोडीफार सहानुभूती नक्कीच मिळते. मात्र घरं फोडण्याची सुरुवात कोणी केली याची आठवण करुन देत राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली.

राज्याच्या सत्तेत सहभागी झाल्यानंतर मंत्री भुजबळ आज पुण्यातील फुलेवाड्याच्या भेटीला निघाले होते. त्यांच्या प्रवासाची माहिती मिळाल्यानंतर संगमनेरातील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पुणे-नाशिक महामार्गावरील रायतेवाडी फाटा येथे त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती. त्यासाठी काहीवेळ थांबलेल्या भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. विशेष म्हणजे या कार्यक्रमादरम्यान स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही पदाधिकारी दिसून आला नाही. त्यामुळे संगमनेरातील राष्ट्रवादी कोणाच्या पाठीशी अशाही चर्चा सुरु झाल्या.

सिन्नरमधील सत्कार आटोपून पुण्याकडे जाताना मंत्री भुजबळ यांचे तालुक्यातील रायतेवाडी फाटा येथे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजीही केली व भुजबळ यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाशिकमधील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांमधून सामाजिक कार्याची दिशा मिळते, त्यामुळे सकाळी या दोन्ही ठिकाणी जावून आता आपण पुण्याकडे जात असल्याचे ते म्हणाले.

रस्त्यात जागोजागी होणारे सत्कार पाहता कार्यकर्त्यांना आपला मुद्दा मान्य असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. रविवारी शरद पवार यांच्या गटाकडून प्रसिद्ध झालेल्या पावसातील छायाचित्राबद्दल विचारले असता ‘साहेबांचे वय जास्त आहे, त्यामुळे पावसात भिजल्याने थोडभफार सहानुभूतीही मिळेल’ असे उपरोधिक उत्तर त्यांनी दिले. तर, सुप्रिया सुळे यांच्या घर फोडले या वक्तव्यावर बोलताना त्यांनी त्याची सुरुवात कोणी केली असा प्रतिसवाल करीत गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे यांच्यापासून धनंजय मुंडे यांना बाजूला करण्याच्या प्रकाराची आठवणही करुन दिली.

काही मिनिटांच्या या संवादातून त्यांनी मूळ राष्ट्रवादीतील नेत्यांवर थेट टीका करण्याचे टाळले, मात्र अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय राज्याच्या आणि जनतेच्या विकासासाठी आणि हितासाठी घेतल्याचा वारंवार पुनरुच्चार त्यांनी केला. या सत्कार सोहळ्याला संगमनेरातील समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी मात्र या सोहळ्याला पाठ दाखविल्याने संगमनेरचा राष्ट्रवादी कोणासोबत अशा चर्चाही सुरु झाल्या. या कार्यक्रमानंतर मंत्री भुजबळ पुण्याकडे रवाना झाले आहेत.

