भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 61 टक्क्यांवर! पाणलोटात संततधार कायम; आढळा खोरे मात्र अद्यापही तहानलेले

नायक वृत्तसेवा, अकोले
धरणांच्या पाणलोटात शुक्रवारी परतलेल्या पावसाचा जोर अद्यापही टिकून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तीनही मोठ्या धरणांमध्ये पाण्याची आवक सुरु असून भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 61 टक्क्यांच्या पुढे सरकला आहे. तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर पाऊस टिकून असला तरीही पूर्वभागातील आढळा खोर्यासह संपूर्ण लाभक्षेत्रात मात्र अद्यापही पावसाची अपेक्षा असून बहुतेक भागात जेमतेम पावसावरच बळीराजाने पेरण्या उरकल्याचेही चित्र आहे. त्यामुळे एकीकडे धरणांच्या पाणीसाठ्यात होणारी वाढ सुखावह वाटत असताना दुसरीकडे केवळ ढगाळी वातावरणाने चिंता दाटल्याचे विरोधाभासी चित्रही निर्माण झाले आहे.

उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोटात जोरदार आषाढ सरी कोसळत असून रतनवाडी, घाटघर, सांम्रद, उडदावणे, पांजरे अशा सर्वदूर पावसाला जोर चढत असल्याने निसर्ग सौंदर्याची पंढरी समजल्या जाणार्या भंडारदरा परिसरात पर्यटकांची गर्दीही वाढली आहे. दिवसभर कोसळणार्या पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवाही निर्माण झाल्याने भंडारदर्याचा परिसर स्वर्गीय आनंद देणारा ठरत आहे. तुलनेत निळवंडे धरणाच्या पाणलोटातील पावसाचा जोर काहीसा मंदावला असून कळसूबाईच्या शिखरावरुन उगम पावणार्या कृष्णवंतीचा प्रवाहही खालावला आहे. त्यामुळे वाकी जलाशयावरुन वाहणार्या पाण्याचा वेगही कमी झाल्याने निळवंडे धरणातील पाण्याची आवक मंदावली आहे.

मुळा खोर्यातील हरिश्चंद्रगडाच्या माथ्यासह सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरु असून शनिवारच्या तुलनेत रविवारी सुरु झालेल्या चोवीस तासांत पावसाची गती काही प्रमाणात वाढली आहे. त्याचा परिणाम मुळा धरणाकडे झेपावणार्या पाण्यावर झाला असून आज सकाळी 6 वाजता कोतुळनजीकच्या मुळापात्रातून 2 हजार 829 क्यूसेकचा प्रवाह वाहत आहे. कालच्या तुलनेत त्यात सुमारे पाचशे क्यूसेकची भर पडली आहे. त्यामुळे मुळा धरणातील पाणीसाठाही संथगतीने पुढे सरकला असून सकाळी धरणात 37.53 टक्के पाणी जमा झाले होते. तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर पाऊस टिकून असला तरीही दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या आढळा धरणाच्या पाणलोटात मात्र अजूनही मोठा पाऊस नसल्याने या धरणात अद्याप नवीन पाणी येण्यास सुरुवात झालेली नाही.

जिल्ह्यासाठी वरदान ठरणार्या धरणांच्या परिसरात पाऊस सुरु असतांना लाभक्षेत्रात मात्र केवळ ढगाळी वातावरण असल्याने बळीराजाच्या एका डोळ्यात हसू तर दुसर्या डोळ्यात अश्रू बघायला मिळत आहे. संगमनेर-अकोल्यातील मोठ्या भागात शेतकर्यांनी जेमतेम पावसावरच पेरण्याही उरकल्या आहेत. त्यामुळे चालू आठवड्यात लाभक्षेत्रात पाऊस न झाल्यास अनेक भागात दुबार पेरणीचेही संकट उभे राहू शकते. त्यातच आठवडाभरात राज्यातील बहुतेक भागात मान्सून विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे.

आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील रतनवाडीत 125 मि.मी., घाटघर 120 मि.मी., पांजरे 115 मि.मी., भंडारदरा 111 मि.मी., वाकी 105 मि.मी., निळवंडे 8 मि.मी. व आढळा येथे अवघ्या एक मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणात 9 हजार 665 दशलक्ष घनफूट (37.53 टक्के), भंडारदरा 6 हजार 742 दशलक्ष घनफूट (61.07 टक्के), निळवंडे 2 हजार 127 दशलक्ष घनफूट (25.54 टक्के) व आढळा 537 दशलक्ष घनफूट (50.66 टक्के) इतका पाणीसाठा आहे. चोवीस तासांत भंडारदरा धरणात सर्वाधीक 282 दशलक्ष घनफूट, मुळा धरणात 176 दशलक्ष घनफूट व निळवंडे धरणात 155 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले आहे. भंडारदरा धरणातून विद्युतगृहासाठी सोडलेल्या 840 क्यूसेक पाण्याशिवाय कोणत्याही धरणातून विसर्ग सुरु नाही.

पावसाची संततधार कायम असल्याने भातखाचरांत पाणी साचले आहे. यामुहे भंडारदरा परिसरातील आदिवासी शेतकर्यांनी भात लागवडीला सुरुवात केलेली आहे. मात्र, सद्यस्थितीत अत्यंत अल्पप्रमाणात लागवड झाली आहे.
