शाहीर विठ्ठल उमप ‘मृद्गंध’ पुरस्कारांची घोषणा!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जांभूळ अख्यानाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृति दिनानिमित्त दिल्या जाणार्या ‘मृद्गंध’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी हा सोहळा होवू न शकल्याने यंदा दोन वर्षांच्या एकत्रित पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून येत्या 26 नोव्हेंबर रोजी मुंबईतील रवींद्र नाट्य गृहात हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

मागील वर्षी पुरस्कार प्राप्त झालेल्या राज्यातील कला, संगीत व साहित्य प्राप्त मान्यवरांची नावेही जाहीर करण्यात आली असून श्रीमती माया जाधव यांना जीवन गौरव, प्रेमानंद गज्वी यांना साहित्य, प्रशांत दामले यांना अभिनय, अशोक वायंगणकर यांना संगित, रवींद्र भिलारी यांना सामाजिक कार्य आणि कुमारी प्राजक्ता कोळी यांना नवोन्मेश प्रतिभा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यावर्षीच्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये जयंत सावरकर यांना जीवन गौरव, श्रीमती डॉ.विजया वाड यांना साहित्य, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना सामाजिक, श्रीमती उत्तरा केळकर यांना संगीत, सत्यपाल महाराज चिंचोळकर यांना लोककला तर ओम राऊत या उदयोन्मुख कलाकाराला नवोन्मेश प्रतिभा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विठ्ठल उमप फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृति दिनाचे निमित्त साधून 26 नोव्हेंबर रोजी संगीत समारंभाचे आयोजन करुन सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उत्तुंग कार्य करणार्या मान्यवरांना या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. या समारंभात राज्यात नावाजलेल्या कलाकारांची दरवर्षी हजेरी लागते. यावर्षी 26 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून समारंभाचे पहिले पुष्प महेश काळे सादर करणार असून त्यानंतर सत्यपाल महाराजांच्या प्रबोधनात्मक भजनांचा कार्यक्रम होणार आहे.
