अकोले तालुक्यात कोरोना विषाणूंनी घेतला अकरावा बळी!
अकोले तालुक्यात कोरोना विषाणूंनी घेतला अकरावा बळी!
रुग्णसंख्या पोहोचली 511 वर तर सक्रीय 118 रुग्णांवर उपचार सुरू
नायक वृत्तसेवा, अकोले
अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वाढत असताना बळींच्या संख्येतही भर पडत आहे. शुक्रवारी (ता.28) दुपारी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असणार्या अकोले शहराजवळील धुमाळवाडी येथील 69 वर्षीय वृद्धाचा कोरोना विषाणूंनी बळी घेतला आहे. यामुळे तालुक्यातील बळींची संख्या 11 झाली आहे.
धुमाळवाडी येथील मयत व्यक्तीचा 21 ऑगस्ट रोजी खासगी प्रयोगशाळेकडून कोरोना पॅाझिटीव्ह अहवाल प्राप्त झाला होता. दरम्यान शुक्रवारी कोरोना विषाणूंशी सुरू असलेली अखेर संपुष्टात आली. तत्पूर्वी गुरुवारी (ता.27) सकाळी 13 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर सायंकाळी रात्री उशिरा खासगी प्रयोगशाळेकडून आलेल्या अहवालात तालुक्यातील चार व्यक्तींचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला. यामध्ये कोतूळ येथील 67 वर्षीय पुरुष, 59 वर्षीय महिला, सावरगाव पाट येथील 41 वर्षीय पुरुष, बदगी बेलापूर येथील 64 वर्षीय पुरुष अशा चार व्यक्ती पॅाझिटिव्ह आढळल्या. तर शुक्रवारी राजूर ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये पाडाळणे येथील 25 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय पुरुष आणि ब्राम्हणवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये ब्राम्हणवाडा येथील 56 वर्षीय व 64 वर्षीय पुरुष अशा चार व्यक्ती पॅाझिटिव्ह सापडल्या आहेत.
दिवसभरात खासगी व अँटीजेन टेस्ट मिळून एकूण आठ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. तर खाणापूर कोविड सेंटरमधील 35 व्यक्तींचे स्त्राव घेऊन अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अद्याप त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 511 झाली आहे. त्यापैकी 382 रुग्णांनी यशस्वीपणे मात केली आहे. सध्या 118 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर बळींची संख्या 11 झाली आहे.