ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा राजकीय ‘संन्यास’ की ‘राज्यसभा’? राज्यातील काँग्रेस ‘व्हेंटिलेटरवर’; कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ‘नाट्यमय’ पद्धतीने गेल्या दीड दशकांपासून काँग्रेसचा ‘ताबा’ असलेली नाशिक पदवीधरची जागा ‘अपक्ष’ म्हणून खेचून घेतली. पक्षाने अखेरपर्यंत आपणास ‘एबी’ फॉर्म दिला नसल्याचे तांबे आजही सांगत असतांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र दोनपैकी एक फॉर्म कोराच दिल्याचा दावाही केला आहे. या घडामोडींवरुन खोटं कोण बोलतंय; तांबे की पटोले? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे या संपूर्ण घडामोडींबाबत काँग्रेसचे ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांनी अद्यापही आपले ‘मौन’ सोडलेले नाही. त्यामुळे सत्यजीत तांबेंच्या मार्गाने थोरातांच्या कन्या डॉ. जयश्री या देखील भाजपच्या कंपूत सहभागी होतील व थोरात राजकीय संन्यास घेतील किंवा काँग्रेसचे निष्ठावान म्हणून राज्यसभा गाजवतील अशा चर्चा आता संगमनेरसह संपूर्ण राज्यात झडू लागल्या आहेत. त्यातून राज्यात आधीच कमकुवत असलेली काँग्रेस ‘व्हेंटिलेटरवर’ गेली असून पक्षाचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे.

गेल्या संपूर्ण वर्षात राज्याला राजकीय भूकंपाचे अनपेक्षित हादरे बसले. वर्ष सरता सरताही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सिटीझनविल’ या पुस्तक प्रकाशनाचा योग साधून राज्याच्या राजकीय पटलावर गेल्या अनेक दशकांपासून वावरणार्या थोरात-तांबे घराण्यालाच राजकीय सुरंग लावला. त्याचा धूर दिसण्यास महिन्याभराचा कालावधी लागला आणि त्यातून नाट्यमय घडामोडी घडत काँग्रेसची नाचक्की करीत सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यानंतर आजवर त्यांनी आपण ‘पक्ष’ आणि ‘अपक्ष’ असे दोन अर्ज दाखल केले होते, मात्र वेळेत पक्षाने एबी फॉर्म दिला नसल्याचा दावाही केला. त्यावर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी वारंवार ‘दोन’ एबी फॉर्मचा विषय समोर करीत तांबेंनी बंडखोरी केल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी बाळासाहेब थोरात आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना आपण कोणताही आदेश देवू शकत नसल्याचे सांगत नानांनी एकप्रकारे सत्यजीत तांबे यांच्याभोवती राजकीय चक्रव्यूहाचा फासच आवळला. डॉ. सुधीर तांबे असोत, अथवा सत्यजीत तांबे यांनी या कालावधीत माध्यमांशी बोलतांना बाळासाहेब थोरात आमचे कुटुंबप्रमुख असल्याचे वारंवार सांगितले. त्यांचा हाच दावा राज्यातील राजकारणात काहीतरी वेगळं घडतं असल्याचे सांगणारा ठरला आणि त्यातून वेगवेगळे राजकीय अर्थही काढण्यास सुरुवात झाली. सत्यजीत तांबे यांनी भरलेला अपक्ष अर्जच यासर्व चर्चांच्या मागे असल्याने त्यावर कुटुंबप्रमुख या नात्याने बाळासाहेब थोरात यांची भूमिका समोर येणं अपेक्षित होते.

सत्यजीत तांबे यांची उमेदवारी दाखल करण्यासाठी गेलेल्या त्यांच्यासोबतच्या मोजक्या मंडळींमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय उत्तराधिकारी डॉ. जयश्री थोरात यांचाही समावेश होता. त्यावरुन तांबेंच्या भूमिकेला थोरातांची मूकसंमती असल्याचेही दिसून आले. तांबे यांची उमेदवारी दाखल झाल्याच्या क्षणानंतर डॉ. जयश्री थोरात अचानक तेथून अदृष्यही झाल्या होत्या. त्यातून सत्यजीत तांबे यांनी घेतलेला निर्णय बाळासाहेब थोरात यांना अमान्य आहे की त्यांच्या भूमिकेला समर्थन आहे? याबाबत माध्यमांकडून होवू शकणारी संभाव्य प्रश्नांची सरबत्ती टाळण्यासाठीच त्या तेथून निघून गेल्याचे बोलले गेले. त्यानंतरच्या 20 दिवसांत पुलाखालून बरेच पाणीही वाहून गेले आणि सत्यजीत तांबे यांनी दणदणीत विजयही मिळवला, मात्र बाळासाहेब थोरात यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.

या सर्व घटनाक्रमाने अस्वस्थ झालेली माध्यमं गेल्या महिना-दीड महिन्याच्या कालावधीत झालेल्या विविध राजकीय घटनांना एका माळेत गुंफीत त्यातून आपापल्या पद्धतीने त्याचे अर्थ राज्यातील नागरिकांसमोर मांडीत आहेत. नाना पटोले यांचे म्हणणे ‘सत्य’ मानल्यास सत्यजीत तांबे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्याबाबत कोणतीही अडचण नव्हती हे स्पष्ट होते. मग असे असतानाही त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करुन पक्षाने अन्याय केल्याचे वातावरण का तयार केले? इतक्या घडामोडी घडूनही काँग्रेसचे बाजीप्रभू म्हणून राज्याला परिचयाचे असलेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपले मौन का नाही सोडले?. या सर्व घडामोडीत थोरात यांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर डॉ. सुधीर तांबे अथवा सत्यजीत तांबे त्यापासून परावृत्त झाले नसते का? असे असंख्य प्रश्न मागे ठेवून या निवडणुकीचा प्रचार सुरु झाला.

डॉ. जयश्री थोरात यांचे उमेदवारी दाखल करण्याच्या ठिकाणापासून अचानक निघून जाणे, हातावरील शस्त्रक्रिया व त्यानंतर उपचारांच्या कारणाने ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी अज्ञातवास पत्करणे यातून सत्यजीत तांबे यांचा निर्णय थोरातांना मान्य नसल्याचेही वातावरण तयार झाले होते. मात्र जेव्हा पदवीधर मतदारसंघात प्रचार सुरु झाला, तेव्हा सत्यजीत तांबे यांच्यासाठी केवळ बाळासाहेब थोरात यांची प्रचार यंत्रणाच नाहीतर या पाचही जिल्ह्यातील काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्तेही मैदानात उतरले. प्रत्यक्ष निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर मतदारसंघात लागलेले फ्लेक्स व जाहिरातींमध्येही ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची छायाचित्रे झळकू लागली.

त्यातूनच बाळासाहेब थोरात यांच्या पुढील राजकीय प्रवासाचे आडाखे बांधले जावू लागले आहेत. यापुढील काही महिने सत्यजीत तांबे अपक्षच राहून भाजपाला पूरक असलेली भूमिका बजावतील. वर्षअखेरीस देशात लोकसभा आणि राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचे वातावरण निर्माण होईल. त्यावेळी सत्यजीत तांबे यांच्यासह बाळासाहेब थोरात यांच्या उत्तराधिकारी डॉ. जयश्री थोरातही भाजपवासी होतील व बाळासाहेब थोरात राजकीय संन्यास घेतील असा अंदाज काही राजकीय जाणकारांनी वर्तविला आहे. तर या सर्व घडामोडीत काँग्रेससोबत एकनिष्ठ राहून थोरात स्वपक्षाकडून राज्यसभेची मागणी करुन केंद्रीय पातळीवर जातील असाही एक मतप्रवाह समोर येत आहे.

येत्या मंगळवारी (ता.7) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात वयाची सत्तरी ओलांडून 71 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्याचदिवशी डॉ. सुधीर तांबे विधीमंडळाच्या वरीष्ठ सभागृहातून निवृत्तही होणार आहेत. थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (ता.5) संगमनेरात सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला गेल्या दीड महिन्यांपासून माध्यमांपासून दूर असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरातही हजेरी लावणार आहेत. त्यासाठी आज (ता.4) सायंकाळपर्यंत ते संगमनेरात पोहोचणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे राज्यभरातील माध्यमांचे प्रतिनिधी सद्यस्थितीबाबत त्यांचे मत जाणून घेण्यासाठी गर्दी करण्याचा अंदाज असून थोरातांच्या वक्तव्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

देशाचे पहिले कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या आग्रहावरुन सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी विधानसभेची उमेदवारी केली होती. मात्र त्यानंतर पक्षाने त्यांच्याजागी बी. जे. खताळ पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. पक्षाच्या या निर्णयाने त्यांनी बंडखोरी केली नाही. 1985 साली पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न फसल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली व विजयही मिळवला. मात्र त्यानंतर त्यांनी पक्षासोबतच राहण्याचा निर्णय घेतला, जोे आजवर कायम आहे. नंतरच्या काळातही काँग्रेसमध्ये अनेक स्थित्यंतरे घडली, परंतु थोरातांची पक्षनिष्ठा तसूभरही कमी झाली नाही. या पार्श्वभूमीवर ते काय भाष्य करतात याकडे राज्यभरातील जनतेचे लक्ष लागून आहे.

