लखीमपूर येथील घटना इतिहासातील काळीकुट्ट घटना ः डॉ. नवले भारतीय किसान सभेतर्फे निषेध; ठिकठिकाणी प्रशासनाला दिले निवेदन

नायक वृत्तसेवा, अकोले
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथील घटना भारतीय शेतकरी आंदोलनाच्या इतिहासातील अत्यंत काळीकुट्ट घटना आहे. आपल्या कॉर्पोरेट भागीदारांना नफा कमावता यावा यासाठी प्रसंगी शेतकर्यांचे बळी घेत केंद्र सरकारला हे कायदे अंमलात आणायचे आहेत, असा आरोप करून भारतीय किसान सभेतर्फे या घटनेचा निषेध करण्यात आला. राज्यात ठिकठिकाणी शेतकर्यांनी प्रशासनाला निवेदन देत आपला निषेध नोंदवत संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे, अशी माहिती किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.

डॉ.नवले यांनी म्हटले आहे की, ‘संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली दिल्लीत दहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून आंदोलन सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. आंदोलन करणार्या शेतकर्यांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करणार्या उपमुख्यमंत्री व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांना सभा स्थळाकडे जात असताना काळे झेंडे दाखवण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उभे होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री टेनी यांचा मुलगा आशिष मिश्र टेनी याने व त्याच्या गुंडांनी शेतकर्यांना शांततामय आंदोलन करत असताना त्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडून टाकले. भारतीय शेतकरी आंदोलनाच्या इतिहासातील ही अत्यंत काळीकुट्ट घटना आहे. अखिल भारतीय किसान सभा या क्रूर घटनेचा तीव्र शब्दांत धिक्कार करत आहे. संयुक्त किसान मोर्चाने सबंध देशभर या घटनेचा तीव्र धिक्कार करण्यासाठी शांततामय मार्गाने निषेध व्यक्त करणारी आंदोलने करण्याचे आवाहन केले आहे. अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयांवर या घटनेचा निषेध करणारी निवेदने देण्यात येत असून मोर्चे व निदर्शनांच्या माध्यमातून भाजपप्रणीत दडपशाही, गुंडागर्दी व रक्तपातपूर्ण भ्याड हल्ल्यांचा किसान सभा धिक्कार करत आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री टेनी यांना तातडीने बडतर्फ करा, त्यांचा मुलगा व त्याच्याबरोबर हल्ल्यात सामील असणार्या सर्वांवर खुनाच्या कलमाखाली हत्येचा गुन्हा दाखल करा व सर्व आरोपींना तातडीने अटक करा आणि मृत शेतकर्यांच्या कुटुंबांना तसेच जखमी शेतकर्यांना योग्य नुकसान भरपाई द्या अशी मागणी किसान सभा करत आहे.’

नवले यांनी पुढे म्हटले आहे, ‘आपल्या कॉर्पोरेट साथीदारांना शेतीचे संपूर्ण क्षेत्र नफा कमावण्यासाठी व अनिर्बंध मक्तेदारी निर्माण करण्यासाठी बहाल करण्याच्या अत्यंत कुटील हेतूने केंद्र सरकारने तीन केंद्रीय कृषी कायदे केले आहेत. आपल्या कॉर्पोरेट भागीदारांना नफा कमावता यावा यासाठी प्रसंगी शेतकर्यांचे बळी घेत केंद्र सरकारला हे कायदे अंमलात आणायचे आहेत. मात्र संयुक्त किसान मोर्चा केंद्र सरकारचे हे कुटील कारस्थान कधीही साध्य होऊ देणार नाही. संयुक्त किसान मोर्चा, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व अखिल भारतीय किसान सभा, अत्यंत नेटाने लोकशाही चौकटीत व शांततेच्या मार्गाने आपले आंदोलन सुरू ठेवेल, अधिक तीव्र करेल,’ असेही त्यांनी म्हटले आहे.
