संगमनेरच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला तुटक्या ‘पुला’चे विघ्न! पालिका प्रशासन अनभिज्ञ; सुमारे तीस हजार लोकांची वर्दळ होणार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या मोठ्या कालावधीपासून संगमनेरच्या प्रवरा नदी परिसरात साजर्या होणार्या गुरुपौर्णिमा उत्सवाला यंदा तुटक्या पुलाचे विघ्न आडवे आले आहे. प्रवराकाठी असलेल्या साई मंदिरासह गंगामाई, संतोषी माता व टेकडीवरील हनुमान मंदिरात हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. त्यानिमित्त या सर्व ठिकाणी महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन होत असल्याने शहर परिसरातील 25 ते 30 हजारांहून अधिक भाविकांची या परिसरात गर्दी होते. मात्र गेल्या आठ महिन्यांपूर्वी खचलेल्या येथील मुख्य पूलाचा प्रश्न आजही अधांतरीतच असल्याने यंदाच्या उत्सवात विघ्न आले असून सिमेंटच्या नळ्या टाकून उभारलेल्या तात्पुरत्या पुलावरुनच मोठी वर्दळ होणार असल्याने अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. हा उत्सव अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपला असला तरीही पालिका प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्याचेही दिसून आले आहे.

म्हाळुंगी नदीपात्रातून वाहणार्या गटाराचे काम करताना ठेकदाराने चक्क स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूने प्रवरा नदीकडे जाणार्या पुलाचा पायाच कोरल्याने गेल्या वर्षी 13 ऑक्टोबर रोजी हा पूल एका बाजूने खचला होता. तेव्हापासून हा पूल सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यावर उपाय म्हणून पालिका प्रशासनाने या दुर्घटनेनंतर आठवडाभरातच साईनगर-हिरेमळा भागात जाण्यासाठी म्हाळुंगीच्या पात्रात सिमेंटच्या नळ्या टाकून तात्पुरता कच्चा पूल उभा केला. सध्या याच पूलाचा वापर सुरु असतांना गेल्या आठ महिन्यात मुख्य पूलाचे काम होणे गरजेचे असताना प्रत्यक्षात मात्र त्यावर केवळ राजकारण सुरु असल्याने साईनगर, पंम्पिंग स्टेशन, हिरेमळा, गंगामाई व कासारवाडीच्या रहिवाशांसह सराफ विद्यालय व ओहरा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आजही परवड सुरु आहे.

मध्यंतरी पालिका प्रशासनाने मुख्य पूलावरुनच तात्पूरत्या स्वरुपात लोखंडी पूल तयार करण्याची योजना आखून त्यासाठी निविदा सूचनाही प्रसिद्ध केली होती. मात्र त्यानंतर त्यावरही राजकारण सुरु झाल्याने ‘तो’ विषय बारगळला. त्या दरम्यान काहींनी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करुन पालिकेच्या कचेरीजवळील व्यापारी संकुलाचा सात कोटी रुपयांचा निधी साईनगरच्या मुख्य पूलासाठी वळवण्यात आला. ही प्रक्रिया देखील राजकीय हेतूने प्रेरीत होवूनच केली गेल्याने पावसाळा तोंडावर असल्याने पुलाचे कामही रखडले आणि निधी वळवल्याने पालिकेचा महत्त्वकांक्षी प्रकल्पही रेंगाळला.

गेल्या आठ महिन्यात या परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आंदोलने करुन आपली मागणीही रेटली. मात्र पालिकेत सध्या प्रशासकांचे राज्य असल्याने शासकीय मंजुरीशिवाय त्यांना तात्पुरती व्यवस्था सोडून दुसरे काहीच करता आले नाही. त्यातच आता गुरुपौर्णिमा उत्सवही अवघ्या दोन दिवसांवर आल्याने मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. या उत्सवासाठी एकट्या साईमंदिरात सुमारे 15 ते 20 हजार भाविकांची तर संतोषी माता, श्री बहिरेबाबा यांच्या कपिलाश्रमासह गंगामाई परिसरात दहा हजारांहून अधिक भाविक दर्शन आणि महाप्रसादासाठी गर्दी करीत असतात. इतक्या लोकांना जाण्यासाठी सद्यस्थितीत पालिकेने उभारलेला तात्पुरता पूल हा एकमेव पर्याय असल्याने या पुलावर मोठी गर्दी होवून एखादा अपघात घडण्याची शक्यता आहे.

सध्या धरणांच्या पाणलोटात पाऊसही सुरु झाला आहे. त्यातच पावसाळ्यात पुलांची कामे करता येत नसल्याने गेल्या आठ महिन्यांपासून या भागातील मोठ्या लोकसंख्येला आधार बनलेल्या तात्पुरत्या पुलाची सुरक्षाही धोक्यात आली आहे. भोजापूर धरणाच्या पाणलोटात दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस झाल्यास म्हाळुंगी नदी वाहती होण्याचीही शक्यता आहे. अशा स्थितीत म्हाळुंगीच्या वेगवान प्रवाहासमोर सध्याचा कच्चा पूल किती काळ तग धरेल हा देखील प्रश्न असल्याने या परिसरातील नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत.

दरवर्षी गुरुपोर्णिमेला साईमंदिरापासून ते स्वामी समर्थ मंदिरापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात येते. स्वामी समर्थ मंदिराजवळ आल्यानंतर साईबाबांच्या प्रतिमेची आणि साईंच्या प्रतिमेची भेट घडवून आणली जाते, या सोहळ्याला संतभेटीची उपमा देण्यात आली आहे. मात्र यंदा या पालखी मिरवणुकीचा मार्गच खचलेला असल्याने हा सोहळा होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
