बिनविरोध निवडीने बँकेच्या प्रगतीला सुवर्ण झळाळी ः मालपाणी व्यापारी एकता मंडळ; माजी चेअरमन व सभासदांच्या उपस्थितीत आभार सोहळा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील काही दिवसांत जिल्ह्यातील काही मोठ्या बँका अवसायनात गेल्या, काहींवर रिझर्व्ह बँकेने दंडात्मक कारवाई करीत त्यांच्यावर निर्बंधही घातले, याशिवाय वारंवार होणारे सायबर हल्ले, एटीएम घोटाळे, बनावट सोनेतारणाच्या घटना अशा वेगवेगळ्या वृत्तांनी बँकींगचे क्षेत्र काहीसे गढूळ झालेले असताना सभासदांचा आशीर्वाद आणि संचालक मंडळाच्या समर्पित भूमिकेने आपल्या बँकेवर मात्र कोणतेही गंडांतर येवू शकले नाही. गेल्या सात वर्षात बँकेने साधलेली प्रगती संचालक मंडळ आणि बँकेच्या कर्मचार्यांनी हातात हात घालून केलेल्या सांघिक कामाचा परिपाक असून नूतन संचालक मंडळाची निवडही बिनविरोध झाल्याने बँकेच्या प्रगतीला सोन्याची झळाळी प्राप्त झाल्याचे प्रतिपादन व्यापारी एकता मंडळाचे प्रमुख, उद्योगपती राजेश मालपाणी यांनी केले.

संगमनेरच्या उद्योग क्षेत्राची कामधेनू समजल्या जाणार्या संगमनेर मर्चन्ट्स बँकेच्या संचालकांची निवड बिनविरोध झाली, त्यानिमित्त सभासदांचे ऋण व्यक्त करण्यासाठी व्यापारी एकता मंडळाने आभार सोहळ्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी मालपाणी बोलत होते. यावेळी गेल्या 58 वर्षांच्या इतिहासात बँकेचे चेअरमनपद भूषविलेल्या माजी संचालकांची मंचावर उपस्थिती होती. गतवर्षीच्या ज्या बारा संचालकांनी नवीन इच्छुक व उत्साही उमेदवारांसाठी थांबण्याचा निर्णय घेतला, त्यांचा बँकेसाठी त्यांनी दिलेल्या मौलिक सेवेप्रती कृतज्ञता म्हणून माजी अध्यक्षांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना मालपाणी म्हणाले की, दरवेळी धूमधडाक्यात होणारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक सर्वांच्या आशीर्वादाने यावर्षी बिनविरोध झाली. या माध्यमातून होणारा संस्थेचा खर्च आणि बँक कर्मचार्यांचे परिश्रमही वाचवता आले. कोणत्याही निवडणुकांमध्ये आरोप-प्रत्यारोप हा राजकारणाचा भाग असतो. त्यातून एकमेकांमध्ये कटूता निर्माण होवून परस्परांचे संबंधही ताणले जातात. या सगळ्या गोष्टी टाळून यंदाची निवडणूक बिनविरोध झाली आणि त्यासाठी विद्यमान संचालकांसह अन्य इच्छुक उमेदवारांनीही मोलाची साथ दिली म्हणूनच यावर्षीची निवडणूक ऐतिहासिक ठरल्याचेही उद्योगपती राजेश मालपाणी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या आभार सोहळ्याच्या निमित्ताने बँकेने गेल्या सात वर्षात साधलेल्या प्रगतीचा आलेखही सभासदांसमोर मांडण्यात आला. यावेळी सर्व नवीन संचालकांचा परिचय व त्यांच्यावतीने व्यापारी एकता मंडळाचे प्रमुख राजेश मालपाणी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर निवृत्त होणार्या सर्वश्री ओंकार बिहाणी, सुनील दिवेकर, दिलीप पारख, ज्ञानेश्वर करपे, राजेश करवा, श्रीगोपाळ पडताणी, डॉ. संजय मेहता, ओंकार सोमाणी, सतीष लाहोटी, गुरुनाथ बाप्ते, ज्योती पलोड व अर्चना माळी यांचा बँकेचे माजी चेअरमन ओंकारनाथ भंडारी, डॉ.अरविंद रसाळ, डॉ.अशोक पोफळे, बिहारीलाल डंग, डॉ.ओमप्रकाश सिकची, नीलेश जाजू, सीए. नारायण कलंत्री, जसपाल डंग, ओमप्रकाश आसावा, नंदू भडांगे, सुनीता कलंत्री व उषा नावंदर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप आणि आभार व्यक्त करताना डॉ.संजय मालपाणी यांनी सर्वांनी एकत्रित येवून यावर्षी सहमतीचा संगमनेर पॅटर्न निर्माण केल्याचे सांगितले. यासाठी ज्यांनी साथ दिली, राजेशभाऊंच्या एकसष्टी समारंभानिमित्त झालेल्या रामायणाच्या विविध कार्यक्रमातूनही त्यागाची प्रेरणा घेतली त्या सर्वांच्याप्रती त्यांनी कृतज्ञतेचे भाव व्यक्त केले. या कार्यक्रमाला बँकेचे आजी-माजी संचालक, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
