आमच्या घबाडामुळे तुम्हीही ओक्के झाले आणि आम्हीही ओक्के झालो! लोणीच्या सरपंच प्रभावती घोगरेंचा व्हिडिओ समाज माध्यमांवर तुफान व्हायरल
नायक वृत्तसेवा, राहाता
ज्यावेळेस सांगोल्यात माझी शहाजी बापू पाटील यांच्याशी भेट झाली त्यांनी मला विचारलं की पाहुणे कुठले? मी म्हणाले प्रवारानगरचे. ते म्हणाले अरे बापरे तुमच्या घबाडामुळेच आम्ही 40 लोक ओक्के झालो. मी म्हटले आमच्या घबाडामुळे तुम्हीही ओक्के झाले आणि आम्हीही ओक्के झालो, असा मजेशीर किस्सा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या लोणी येथील सरपंच प्रभावती घोगरे यांनी नुकत्याच झालेल्या गणेश कारखान्याच्या प्रचार सभेत सांगितला होता. प्रभावती घोगरे यांनी त्यावेळेस केलेले भाषण सध्या समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी विखे पिता-पुत्राचा चांगालाच समाचार घेतलाय. यावेळी मंचावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे विवेक कोल्हेही उपस्थित होते.
प्रभावती घोगरेंनी विखे पाटलांच्या दहशतीचे अनेक किस्से सांगितले. विखेंना वाटायचं लोणीत परिवर्तन होऊ शकत नाही. इथले नागरिक आपल्या ताटाखालची मांजर आहे. पण ज्यावेळेस आम्ही ग्रामपंचायत आणि सोसायटी ताब्यात घेतली, तेव्हापासून आमच्या मागे हात धुवून लागले. आम्ही काय करतो? प्रत्येक ठिकाणी केसेस. आमचे काम अडवणं, सदस्यांना दमदाटी करणं, माझ्याबरोबर कोणाचा स्टेटस असेल तर त्याला बोलावून घेऊन जाब विचारणं अशी अवस्था आहे. ते पायाजवळ पाहणारे लोक आहेत. असे असून तुम्ही स्वतःला महाराष्ट्राचे नेते म्हणवता, ही कुठली प्रवृत्ती आहे तुमची. ते म्हणता मी कोणाविषयी कटूता धरत नाही. आम्हांला विचारा आमच्याविषयी काय तुमच्या मनात कटूता आहे. विखेंची हुकूमशाही थांबवायची असेल तर तुम्ही एकजूट व्हा, असा सल्लाही घोगरेंनी उपस्थितांना दिला.
आमच्या प्रवरेचं काय सांगता, आम्हांलाच घर घर लागलेली आहे. आमचाच कारखाना पाहायला परदेशी कोण जिमे आलेला आहे, सार्या थड्यावर हात ठेवायचे, इकडे गणेश कडे ठेवायचे तिकडे राहुरीकडे ठेवायचे, सगळे आपल्याकडे आणि आपल्याच घराकडे पाहिजे. पार सरपंचापासून मंत्र्यांपर्यंत दुसरे कोणतेही व्यक्तिमत्व तयार होऊ द्यायचं नाही. गावातल्या टपरीचे उद्घाटन असलं तरी हेच पाहिजे. लग्नपत्रिकेत नाव यायलाचं पाहिजे. सगळ्यांचे सोयरे आहे हे. माझे सासरे शिर्डीचे पहिले आमदार चंद्रभान घोगरे. या परिसरानेच त्यांना निवडून आणले. त्यानंतर काळ गेला, आम्ही आपलं शेती प्रपंचाकडे वाळालो. मात्र हे पन्नास वर्षांपासून सत्ता उपभोगताय, असे घोगरे म्हणाल्या.
लोणी खुर्द गावामध्ये सर्वात जास्त जमिनी प्रवरा कारखाना आणि शैक्षणिक संस्थेच्या आहेत. माझे सासरे चंद्रभान घोगरे, गाडगीळ आदी मंडळींनी प्रवरा कारखाना उभा केला. इतिहास तर असा बदलला यांनी की घरातूनच तो उभा केला आणि आम्हांलाच सभासद ठेवलं नाही. प्रवरा मेडिकलला ट्रस्टकडून पाटलांनी काढले आणि आम्हांला केस पेपरच्या लाईनीत उभं केलं. याला कारणीभूत आपणच आहोत. तुम्ही महसूल मंत्री आहे ना. उसाला भाव देऊन तोंड गप करा ना आमचे, असे म्हणत सरपंच प्रभावती घोगरेंनी विखे पिता-पुत्रांची चांगलीच कान उघाडणी केली. आता हा व्हिडिओ चांगलाच समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.