संगमनेरात ‘विखे-थोरात’ राजकीय संघर्ष विकोपाला! निषेध मोर्चात पोस्टरला काळे फासले; संतप्त थोरात समर्थक पोलीस ठाण्यात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरात सकल हिंदू समाज या बॅनरखाली निघालेल्या भगवा मोर्चातून उठलेला धुरळा खाली बसण्याचे नाव घेत नसल्याचे आता दिसू लागले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरच्या जनतेला खुले पत्र लिहून संगमनेरातील सौहार्दपूर्ण वातावरणाची आठवण करुन दिली होती. मात्र त्यांच्या ‘त्या’ पत्रातून हिंदू समाजाचा अवमान झाल्याचे सांगत आज सकाळी स्थानिक भाजपाने माजीमंत्री थोरात यांच्या घराजवळ ठिय्या आंदोलन केले. मात्र यावेळी स्थानिक पदाधिकार्यांनी थोरात यांच्या प्रतिमेला काळे फासल्याने आता त्यांचे समर्थक आक्रमक झाले असून यशोधन या त्यांच्या कार्यालयाजवळ मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा होवू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरातील शांततेला पोहोचू नये यासाठी स्थानिक काँग्रेसने पोलिसांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यातून दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सार्वजनिक पातळीवर राजकारण सुरु असतांना त्यात व्यक्तिगत पातळी गाठली गेल्याने संगमनेरात ‘थोरात – विखे’ यांच्यातील राजकीय संघर्ष विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबत संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीने पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची भेट घेत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने पक्षाच्यावतीने पोलिसांना निवेदनही देण्यात आले असून त्यात म्हंटले आहे की, आज सकाळी भाजपाच्या काही स्वयंघोषीक पुढार्यांनी सकल हिंदू समाजाच्या नावावर जाणता राजा मैदान येथे 100 ते 150 लोकांनी बेकायदा जमा होवून आंदोलन केले. यावेळी राज्यातील ज्येष्ठनेते, विधीमंडळातील काँग्रेसचे गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यादरम्यान काहींनी थोरात यांच्या प्रतिमेशी छेडछाड करुन प्रतिमेला काळे फासण्याचा घृणास्पद प्रकार केला.

संबंधितांची ही कृती लोकप्रतिनिधींचा अवमान आणि संगमनेरकर जनतेच्या भावना दुखावणारी आहे. या आंदोलनातून संगमनेरचे लोकप्रतिनिधी हिंदू विरोधी असल्याची खोटी प्रतिमा निर्माण करण्याचा कुटील डाव साधण्याचाही प्रयत्न झाला. काहीजण जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम समाजातील सौहार्द नष्ट करुन संगमनेरचे शांत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहे, अशा स्थितीत भाजपाच्या टोळक्याने त्या आदेशाचे उल्लंघन करीत प्रत्येक निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी झालेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमेला काळे फासून लोकप्रतिनिधी कायद्याचा भंग केला आहे.

आमदार थोरात संपूर्ण समाज आणि महाराष्ट्राचे सुसंस्कृत ज्येष्ठ नेते आहेत. अशा नेत्याच्या विरोधात आंदोलन करुन व त्यांच्या प्रतिमेशी छेडछाड करुन काहीजण संगमनेरची शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचा कुटील डाव साधीत आहे. अशा व्यक्तिंवर कायदेशीर कारवाई हा एकमेव पर्याय असल्याने संगमनेरकरांच्या भावना दुखावणार्या त्या कृतीबद्दल संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रताप उर्फ बाबा ओहोळ, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा आदींच्या सह्या आहेत.

