बकुपिंपळगाव येथील महिलांची दारूविक्री बंद करण्याची मागणी
बकुपिंपळगाव येथील महिलांची दारूविक्री बंद करण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील बकुपिंपळगाव येथे गणेशोत्सव काळातही सर्रासपणे दारूविक्री सुरू आहे. यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ही दारूविक्री तात्काळ बंद करावी अशी मागणी येथील महिलांनी निवेदनाद्वारे पोलिसांकडे केली आहे.

नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत डेरे यांना दिलेल्या निवेदनात महिलांनी म्हंटले आहे की, आमच्या गावातील दारूविक्री बंद व्हावी म्हणून पोलिसांना दोन ते तीन वेळा निवेदन दिले. मात्र अद्यापही काही कार्यवाही झाली नाही. तरी या निवेदनाची तुम्ही स्वतः दखल घेऊन दारूविक्री बंद करावी अशी मागणी महिलांनी केली आहे. या निवेदनावर पंधरा ते सोळा महिलांच्या सह्या आहेत. दरम्यान, नेवासा पोलिसांनी देवगड नजीक असलेल्या या गावाकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. उत्पादन शुल्क तर खाते नावालाच असल्याने कोणतीही कारवाई येथे होत नाही, असा सूर सर्वसामान्य नागरिकांतून उमटत आहे. त्यामुळे पोलीस आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

