… अखेर राहुरी फॅक्टरी येथील खुनाचे रहस्य उलगडले! सराफाचा खून करणार्‍या आरोपीनेच केलाय नाशिकच्या तरुणीचा खून

नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी फॅक्टरी येथे गुंजाळ नाक्याजवळ 14 मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात तरुणीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून झाला होता. त्या खुनाला अखेर चार महिन्यांनी वाचा फुटली आहे. या घटनेतील आरोपीने पंधरा दिवसांपूर्वी आणखी एक खून केला. त्यात, तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मग मागील खुनाचा उलगडा झाला. पोलीस चौकशीत आरोपीने राहुरी फॅक्टरी येथे मित्राच्या मदतीने केलेल्या खुनाची कबुली दिली. यावेळी सांगितलेल्या घटनाक्रमामुळे पोलिसही चक्रावून गेले.

मुख्य आरोपी ज्ञानेश्वर उर्फ भैय्या गायकवाड व केतन लोमटे (दोघेही रा.शिरुर कासार, जि.बीड) अशी आरोपींची नावे आहेत. शीतल भामरे (रा.गाडेकर मळा, नाशिक) असे मृत तरुणीचे नाव असल्याचे समोर आले. आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड मूळचा भातकुडगाव (ता.शेवगाव) येथील रहिवासी आहे. गावात मुलींची छेड काढत असल्याने घरच्यांनी त्याची रवानगी मामाकडे शिरूर कासार येथे केली. त्याची सोशल मीडियातून शीतल भामरे या विवाहितेशी ओळख झाली. तिला दोन मुले असूनही तिचे ज्ञानेश्वरसोबत प्रेम जमल्याने सहा महिन्यांपूर्वी तिने शिरूर कासार गाठले. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले.


चारित्र्याच्या संशयावरून त्रास सुरू झाल्याने तिने परत नाशिकला सोडण्यास सांगितले. ज्ञानेश्वरने नाशिकला जाताना मित्र केतन लोमटेच्या मदतीने राहुरी फॅक्टरी येथे प्रेयसी शीतलचा डोक्यात दगड घालून खून केला. मागील अडीच महिन्यांपासून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके खुनाचा तपास करीत होते. परंतु, तरुणीची ओळख पटत नव्हती. त्यामुळे तपास थंडावला होता. दरम्यान, आरोपी ज्ञानेश्वरने एप्रिल महिन्यात पुन्हा दुसर्‍या मुलीशी लग्न केले. पत्नीला दागिने खरेदी केले. सराफ व्यावसायिक विशाल सुभाष कुलथे (वय 25, रा.शिरुर कासार) याला दागिने घेऊन घरी बोलावले. त्याचा पंधरा दिवसांपूर्वी खून केला. तर मृत विशालला वडील नसल्याने वृद्ध आजोबा सुधाकर जगन्नाथ कुलथे (वय 70) हे नातवाच्या खुनाच्या धक्काने मृत्यू पावले.

विशालचा मृतदेह आरोपीने मामाच्या दुचाकीवरून भातकुडगाव (ता.शेवगाव) येथे स्वतःच्या शेतात नेऊन पुरला. मामाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला. भीतीपोटी आरोपीचे मामा आजिनाथ गायके (रा.शिरुर कासार) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरुन आरोपी दोन खून व दोन मृत्यूस कारणीभूत ठरला असल्याचे उघड होत आहे.

प्रेयसीच्या खुनात वर्ग करण्यासाठी अर्ज..
मुख्य आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड याने प्रेयसी शीतल भामरे हिचा राहुरी फॅक्टरी येथे खून केल्याची कबुली दिली आहे. शिरूर कासार (जि.बीड) येथे विशाल कुलथे यांच्या खून प्रकरणात आरोपी पोलीस कोठडीत आहे. दोन दिवसांनी कोठडी संपल्यावर आरोपीला राहुरी फॅक्टरी येथील खून प्रकरणात अटक करण्यासाठी न्यायालयात अर्ज दिला जाईल.
– संदीप मिटके (पोलीस उपअधीक्षक, श्रीरामपूर)

Visits: 11 Today: 3 Total: 116328

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *