विनयभंगाच्या गुन्ह्यातही बाळ बोठेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला रेखा जरे खून खटल्यावरही 28 फेब्रुवारीला खंडपीठात होणार सुनावणी
नायक वृत्तसेवा, नगर
सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणात अटकेत असलेला आरोपी पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे पाटील याला आणखी एका महिलेच्या विनयभंग प्रकरणात जामीन नाकारण्यात आला आहे. गुन्हा घडल्यानंतर आरोपी दीर्घकाळ फरार होता. पोलिसांनी आरोपीला मोठे प्रयत्न करून अटक केली आहे. त्यामुळे जामीन मिळाला तर आरोपी पुन्हा फरार होण्याची आणि साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे, त्यामुळे जामीन देता येणार नाही, असे निरीक्षण जिल्हा व सत्र न्यायालयाने नोंदविले आहे.
रेखा जरे यांचा 30 नोव्हेंबर, 2020 रोजी नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात गळा चिरून खून झाला होता. यामध्ये आरोपी बोठे सूत्रधार असल्याचे तपासात पुढे आले. त्यानंतर तो फरार झाला होता. मधल्या काळात त्याच्याविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल करण्यात आले. नगरमधील एका सामाजिक कार्यकर्तीची सून असलेल्या एका तरुणीने नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बोठे याने सप्टेंबर 2019 ते नोव्हेंबर 2020 याकाळात वेळोवेळी विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आपल्या सासूशी ओळख असल्याने बोठेचे आमच्या घरी येणे जाणे असे. घरी आल्यावर सासूशी बोलत असताना आपल्याबद्दल अश्लील शेरेबाजी करणे, हावभाव करणे, स्पर्श करणे तसेच मोबाइलवर संपर्क साधून पाठलाग करणे अशी कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मूळ प्रकरणात बोठेला अटक झाल्यानंतर या गुन्ह्यातही वर्ग करून घेण्यात आले.
यामध्ये जामीन मिळण्यासाठी आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश मंजुषा देशपांडे यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी बाजू मांडली. आरोपीला जामीन दिल्यास त्याच्याकडून साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो. त्यामुळे आरोपीला जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तीवाद करीत त्यांनी संपूर्ण प्रकरणाची आणि त्यासोबत काही संदर्भांची माहिती न्यायालयात दिली. दोन्ही बांजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. दोषारोपपत्र दाखल झाल्याने जामीन देण्यास हरकत नाही, असा युक्तीवाद आरोपीतर्फे करण्यात आला असला तरी आत्तापर्यंतचे रेकॉर्ड पाहाता आरोपी फरार होण्याची शक्यता आहे. मूळ गुन्ह्यात आरोपीला मोठ्या प्रयत्नांनंतर अटक झालेली आहे. त्याला जामीन मिळाला तर तो पुन्हा पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे जामीन फेटळाण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, रेखा जरे खून प्रकरणात जिल्हा न्यायालयाने बोठे याचा जामीन यापूर्वीच फेटाळला आहे. त्याला आरोपीतर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. तेथे सुनावणीसाठी हे प्रकरण प्रलंबित आहे. आत्तापर्यंत अनेकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता 28 फेब्रुवारी रोजी त्यावर सुनावणी होणार आहे.