संत ज्ञानेश्वरांच्या पायी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान नेवासा नगरीत फटाक्यांची आतिषबाजीत केले उत्स्फूर्त स्वागत


नायक वृत्तसेवा, नेवासा
ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिर देवस्थानच्यावतीने काढण्यात आलेल्या माऊलींच्या आषाढी वारी पायी पालखी दिंडीचे बुधवारी (ता.14) शिवाजी महाराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या दिंडीत सुमारे पाचशे वारकर्‍यांचा सहभाग आहे.

बुधवारी सकाळी दिंडीच्या प्रस्थानापूर्वी माऊलींचे मूर्तीमंत रूप असलेल्या पैस खांबाचे वेदमंत्राच्या जयघोषात चंदन उटी लावून शिवाजी महाराज देशमुख व आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी आमदार शंकरराव गडाख, मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, रामभाऊ जगताप, कृष्णा पिसोटे, कैलास जाधव यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊलींच्या प्राकृत चांदीच्या पादुकांचे पूजन झाले.

सदरच्या पादुका डोक्यावर घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिराला दिंडी प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी पुष्पांनी सजविण्यात आलेल्या रथामध्ये माऊलींच्या पादुका ठेवण्यात आल्या. यावेळी आमदार शंकर गडाख, पांडुरंग अभंग, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, सुनील वाघ यांनी आपल्या भाषणातून पायी दिंडी सोहळ्यास शुभेच्छा दिल्या. अग्रभागी नृत्य करणारे अश्व, त्यामागे भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोष करणारे वारकरी, भजनी मंडळ, पुष्पांनी सजविण्यात आलेला पालखी रथ, त्यामागे डोक्यावर तुळशी कलश घेतलेल्या महिला भाविक असे या दिंडीचे स्वरूप होते. नेवासा नगरीत या दिंडीचे फटाक्यांची आतिषबाजी व तोफांची सलामी देत स्वागत करण्यात आले. विविध संस्था, सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी शिवाजी महाराज देशमुख यांचे संतपूजन करत पालखीचे दर्शन घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *