थकीत देयके मार्च अखेर भरून सहकार्य करा! पिंपरी निर्मळचे सरपंच डॉ. मधुकर निर्मळ यांचे आवाहन

नायक वृत्तसेवा, राहाता
वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी शासनाच्या टँकरवर अवलंबून असणार्‍या पिंपरी निर्मळ (ता.राहाता) गावाला येथील पाणी पुरवठा योजना वरदान ठरली आहे. परंतु, थकबाकीमुळे ही योजना बंद पडल्यास ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होऊ शकतात. हे टाळण्यासाठी ग्रामस्थांनी आपल्याकडील घरपट्टी, पाणीपट्टीचे थकीत देयके मार्च अखेर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन सरपंच डॉ. मधुकर निर्मळ यांनी केली आहे.

माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून पद्मश्री विखे पाटील साखर कारखान्याने पिंपरी निर्मळ गावच्या जीवन प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा योजनेची आवश्यक लोकवर्गणी भरल्याने या कागदावर असलेल्या साडेपाच कोटी किंमतीच्या योजनेला नवसंजीवनी मिळून मूर्तरूप आले. सहा हजारांच्या पुढे लोकसंख्या असलेल्या व जिरायती टापूतील गाव असल्याने नागरिकांना कायमच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. मात्र ही पाणी योजना कार्यान्वित झाल्याने गेल्या आठ-दहा वर्षांपासून गाव टँकरमुक्त झाले. गावठाणसह वाड्यावस्त्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाल्याने महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरला.

गेल्या काही वर्षांत सरपंच डॉ. मधुकर निर्मळ यांनी ही योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावठाणसह वाड्यावस्त्यांवर पोहोचविली आहे. वेळोवेळी तत्कालिन जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीत विखे पाटील यांनीही वाढीव पाईपलाईन, वितरण व्यवस्थेसाठी वस्त्यावरील पाण्याच्या टाक्या यांच्यासाठी जिल्हा परिषदेतून निधी उपलब्ध करून दिल्याने योजनेची जवळपास 40 किलोमीटर अंतराची वितरण व्यवस्थेची पाईपलाईन पूर्ण झाली आहे. या योजनेवर जवळपास सद्यस्थितीत 700 नळ जोडणी असून गावाला दर तिसर्‍या दिवशी पाणी पुरवठा केला जातो. शुद्ध व पुरेसा पाणी पुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांमधून विशेषतः महिलांमधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, योजनेचा खर्च व मिळणारे उत्पन्न यांचा मेळ बसविणे ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांपुढे मोठे आव्हान आहे.

पाणी पुरवठा योजनेचा कर्मचारी, खर्च, वीजबिल, पाटबंधारेची पट्टी असा जवळपास वार्षिक 22 लाखांचा खर्च ग्रामपंचायतीला येतो. 700 नळ जोडणी असल्याने व वार्षिक पाणीपट्टी एक हजार प्रतीजोडणी असल्याने ग्रामपंचायतीला वर्षाला अवघा सात लाखांचा वसूल मिळतो. त्यामध्येही मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने उत्पन्न व खर्च यामध्ये मोठी तफावत पडत आहे. थकबाकीमुळे योजना बंद पडल्यास ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होऊ शकतात. हे टाळण्यासाठी ग्रामस्थांनी आपल्याकडील घरपट्टी, पाणीपट्टीचे थकीत देयके मार्च अखेर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे.
– डॉ. मधुकर निर्मळ (सरपंच-पिंपरी निर्मळ)

Visits: 13 Today: 1 Total: 116719

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *