माणुसकी! घरी जाऊन नेत्ररुग्णाची तपासणी करुन दिला चष्मा नेवासा येथील स्वप्नील कांदे यांच्या दायित्वाचे होतेय कौतुक
नायक वृत्तसेवा, नेवासा
पंधरा वर्षांपूर्वी अपघातामुळे आलेले अपंगत्व यातच हलाखीची आलेली परिस्थिती, दोन्ही पाय नसल्याने घरीच राहून जीवन व्यथित करत असलेल्या चाळीसवर्षीय चाँदभाई पठाण यांच्या घरी जाऊन नेत्रचिकित्सा करून त्यांना दिलासा देण्याचे काम करणार्या नेत्र चिकित्सक स्वप्नील कांदे यांच्या या निष्काम सेवा कार्याचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
नेवासा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर चाँदभाई पठाण यांचे घर आहे. उत्तम चालक म्हणून सेवा करत असताना त्यांचा पंधरा वर्षांपूर्वी अपघात झाला. या अपघातात चाँदभाई यांचे पाय गेले. त्यामुळे त्यांना 95 टक्के अपंगत्व आले. परिणामी घरची परिस्थिती हलाखीची बनली. रोजीरोटीचाही प्रश्न निर्माण झाला. अशातच डोळ्यांची दृष्टीही कमी कमी होत चाललेली असताना चष्मा तयार करण्यासाठी जायचे कसे, त्यात रिक्षा व हाताखाली दोन माणसे असा प्रश्न उद्भवला होता.
कांदे चष्मावालेचे प्रमुख स्वप्नील कांदे यांच्या कानावर ही वस्तुस्थिती घालण्यात आली. त्यांनी मशिनरी व इतर साहित्य घेऊन चाँदभाई यांचे घर गाठले. मोफत नेत्र चिकित्सा करुन अगदी स्पष्ट दिसेल असा चष्माही तयार करून भेट म्हणून दिला. त्यामुळे चाँदभाईंना चांगली दृष्टी आल्याचा आनंद झाला. त्यांच्या चेहर्यावर उमटलेले हाष्य व मिळालेला आनंद यातच देव भेटल्याल्याच समाधान झाल्याची भावुक प्रतिक्रिया नेत्र चिकित्सक स्वप्नील कांदे यांनी दिली.