अखेर ‘त्या’ मुन्नाभाई विरोधात गुन्हा दाखल! दैनिक नायकच्या वृत्ताचा ‘इफेक्ट’; बारावीच्या पदवीवर सुरु होता दवाखाना..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहराच्या मध्यभागात राजरोसपणे ‘डॉक्टर’ अशी उपाधी लावून बेकायदा संस्थेकडून प्राप्त केलेल्या ‘नॅचरोपॅथी व योगीक सायन्स’या प्रमाणपत्राच्या आधारावर चक्क दवाखाना चालवणार्या बारावी पास मुन्नाभाईवर अखेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सर्वप्रथम दैनिक नायकने वृत्त प्रसिद्ध करुन या बोगस डॉक्टरचा कारनामा आणि त्याला पाठिशी घालणार्या तालुका वैद्यकीय अधिकार्यांचा प्रताप चव्हाट्यावर आणला होता. त्याची गांभीर्याने दखल घेत बोगस डॉक्टर शोध समितीच्या अध्यक्षांनी पालिकेच्या शहरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी सायंकाळी उशिराने शहरातील बागवानपुरा परिसरात ‘हमसफर क्लिनिक’ नावाने बोगस वैद्यक व्यवसाय करणार्या जावेद आय्युब शेख या मुन्नाभाईवर महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बुधवारी (ता.31) सायंकाळी उशिराने पालिकेच्या शहरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा कचकुरे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार बागवानपुर्यातील नवरंग कॉम्प्लेक्समध्ये हमसफर क्लिनिक नावाने योग व निसर्गोपचाराचे अनधिकृत प्रमाणपत्र व अवघे बारावीपर्यंत कला शाखेचे शिक्षण घेतलेला जावेद शेख नावाचा इसम दवाखाना चालवून रुग्णांवर उपचार करीत असल्याचे आढळला. त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसाय नोंदणीबाबत प्रमाणपत्र असल्याबाबत विचारणा केली असता आवश्यक तितका वेळ देवूनही तो अधिकृत कागदपत्रे सादर करु शकला नाही. त्यामुळे तो बोगस डॉक्टर असल्याचे सिद्ध झाल्याने त्याच्यावर महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमाच्या कलम 33 व 36 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे म्हंटले आहे.

तत्कालीन प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे यांना याबाबतची माहिती समजल्यानंतर त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी तथा बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष राहुल वाघ यांना चौकशी करुन कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार मुख्याधिकार्यांनी 10 एप्रिल, 2023 रोजी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिभा कचकुरे चौकशी करुन कारवाई करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी 13 एप्रिल रोजी आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचार्यांसह ‘त्या’ बोगस डॉक्टरच्या ठिकाणावर छापा घालून सखोल तपासणी केली.

त्यावेळी पथकाने कागदपत्रे मागितली असता कथित डॉक्टर जावेद आयुब शेख याने यावेळी इयत्ता बारावीच्या कला शाखेचे गुणपत्रक सादर केले. संबंधित मुन्नाभाई आपल्या नावापुढे ‘डॉक्टर’ अशी उपाधी लावत असल्याने त्याबाबत विचारणा केली असता त्याने अनधिकृत ‘रुरल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन’ या छत्रपती संभाजीनगरमधील एका संस्थेकडून ‘नॅचरोपॅथी व योगीक सायन्स’ हा कोर्स केल्याचे प्रमाणपत्र दाखवले. या सर्व गोष्टींवरुन तो बोगस डॉक्टर असल्याचे व केवळ बारावीपर्यंत अधिकृत शिक्षण घेवून तो चक्क रुग्णांवर उपचार करीत असल्याचेही सिद्ध झाले होते. त्यामुळे तपासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा कचकुरे यांनी 25 एप्रिल रोजी जावेद आयुब शेख याने महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियमानुसार त्याच्यावर कारवाई करण्याची शिफारस पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांना केली होती.

बोगस डॉक्टर शोध समितीचे तालुकास्तरीय सचिव या नात्याने त्यांच्याकडून सदरील अहवाल प्राप्त होताच संबंधित बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी या प्रकरणात ‘त्या’ बोगस डॉक्टरला फायद्याचे ठरावे व त्याला पुरावे नष्ट करुन पसार होता यावे यासाठी जाणीवपूर्वक कागदी घोडे नाचवले. त्यासाठी त्यांनी या प्रकरणाशी संबंध नसलेल्या घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांनाही पत्र पाठवून त्यांना यात ओढले. मात्र त्यांनी त्या पत्राचा प्रतिसाद देण्याऐवजी तालुका वैद्यकीय अधिकार्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करुन मुख्याधिकारी तथा बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष राहुल वाघ यांनाच चौकशी करुन कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार बुधवारी (ता.31) बागवानपुर्यातील ‘त्या’ बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक नायकने सामाजिक बांधिलकी जोपासून ‘या’ प्रकरणाचा संपूर्ण पाठपुरावा करताना तालुका वैद्यकीय अधिकार्यांचा दबावही चव्हाट्यावर आणल्याने कुजलेल्या संगमनेरच्या आरोग्य यंत्रणेला ‘त्या’ बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करावा लागला. याबाबतची माहिती समोर आल्यानंतर शहरातील अनेक वैद्यकीय व्यावसायिकांनी व कायदाप्रेमी नागरिकांनी दैनिक नायकच्या कार्यालयात फोन करुन अभिनंदन केले आहे.

