कोपरगावात कोरोना रुग्ण घटल्याने नागरिकांत समाधान
कोपरगावात कोरोना रुग्ण घटल्याने नागरिकांत समाधान
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोरोना रुग्णांची संख्या विक्रमी घटल्याने कोपरगावात टाळेबंदीमध्ये शिथिलता आल्याने दीपावली निमित्ताने नागरिकांची झुंबड उडाली आहे. सात-आठ महिने टाळेबंदीमुळे व्यापार्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली तर ग्राहकांना रोजगार नसल्याने आणि ग्राहक नसल्याने बाजारपेठत मंदी आहे. मार्च ते ऑगस्ट या काळापेक्षा सप्टेंबरमध्ये 50 टक्के कोरोनाचे रुग्ण वाढले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णांचे प्रमाण घटल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. मात्र अजूनही कोरोनाचे संकट संपले नसल्याने नागरिकांनी सावध राहून नियम पाळणे गरजेचे आहे.

कोपरगाव तालुक्याच्या बाजारपेठत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, गोदावरी खोरे नामदेव परजणे सहकारी दूध संघ यांच्याकडून कामगार, सभासद यांना वाटलेल्या पैशांची वाट व्यापारी पाहत आहे. यात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. दरम्यान, राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणींमुळे कामगार बोनस 18 टक्के व ऊस उत्पादकांना पहिली उचल म्हणून 2600 रूपये प्रतिटन भाव जाहीर करुन राज्यात खळबळ माजवून दिली आहे. स्व.कर्मवीर शंकरराव काळे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे या दोघांनी आपल्या छत्तीस अंकी राजकारणाचा कधीच साखर कारखान्यांवर वाईट परिणाम होऊ दिला नाही. स्थानिक राजकारणात त्यांच्या मिलीभगतीने तिसरा गट कधीच उभा राहू शकत नाही. तर जनताही दोन्ही गटाकडे आळीपाळीने सत्ता बहाल करीत आली आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा मंगळवारी (ता.3) गळीत शुभारंभ होणार असून यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे हे साखर कारखाना सध्या अडचणीत असल्याने उसाला किती भाव व कामगार बोनस देतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

