संस्कार बालभवनच्या मुलांनी लुटला जलक्रीडेचा आनंद! शंभर मुलांचा सहभाग; वनभोजनाचाही घेतला आस्वाद
नायक वृत्तसेवा, संगमनेर
उन्हाची तीव्रता सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याने घामाच्या धारा वाहत असताना संगमनेरच्या गीता परिवार संचलित संस्कार बालभवनच्या शंभरावर मुलांनी जलक्रीडेचा आनंद घेतला. मालपाणी हेल्थ क्लबच्या सहकार्याने या सर्व मुलांना जीवरक्षकांच्या निगरानीत जलतरण तलावात सोडण्यात आले होते. यावेळी लहान मुलांसाठी असलेल्या स्वतंत्र वर्तुळाकार हौदात बालभवनमधील सर्वाधिक लहान मुलांची धम्माल अनुभवायला मिळाली. जवळपास दीड तास या मुलांनी पाण्यात मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेतला.
गीता परिवाराच्यावतीने दरवर्षी उन्हाळ्यात ज्याप्रमाणे संस्कार शिबिरांचे आयोजन होते, त्या धर्तीवर बालभवनच्या संचालिका अनुराधा मालपाणी यांनी बालभवनमधील मुलांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले आहे. सध्या सुट्ट्यांचा काळ असल्याने बरीच लहान मंडळी पाहुणे म्हणून संगमनेरात आली आहेत. त्यांच्यासह बालभवनमध्ये नोंदणी केलेल्या बालकांचा या सर्व उपक्रमातील उत्स्फूर्त प्रतिसादाने बालभवनचा परिसर बाळगोपाळांच्या बागडण्याने फुलून गेला आहे.
या उपक्रमाचाच एक भाग म्हणनू बालभवनमधील सर्व मुलांना मालपाणी हेल्थ क्लबच्या जलतरण तलावामध्ये मनसोक्त डुंबण्याची संधी देण्यात आली. जवळपास दीड तास शंभराहून अधिक लहान-मोठ्या मुलांनी जलक्रीडेचा आनंद घेताना एकमेकांवर पाणी उडवणे, छोट्या राईड्सवरुन घसरत येणे, आपल्याला कसं पोहता येतं हे दाखवण्याची धडपड यातून जलतरण तलावाचा परिसरात गोकुळातील नर्मदाकाठासारखा भासू लागला होता. पोहून थकल्यानंतर विस्तीर्ण लॉनवर काहीजण पाय पसरुन बसले, तर कोणी हिरव्याशार गवतावर स्वतःला झोकून दिले. काही वेळाने सर्वांनी सोबत आणलेले डबे सोडले आणि सहभोजनाचा आनंद लुटला. सरतेशेवटी मालपाणी क्लबच्यावतीने सर्व मुलांना थंडगार सरबत देण्यात आले आणि मुले तेथून बालभवनमध्ये परतली. या छोट्याशा सहलीत मुलांची काळजी घेण्यासाठी हेल्थ क्लबचे सर्व जीवरक्षक, प्रशिक्षिका रूपाली रायकर, ज्योती भालेराव, ईश्वरी सोनवणे उपस्थित होते.