वरुणराजाच्या तडाख्याने भंडारदरा धरण दुसर्‍यांदा झाले ओव्हर फ्लो! निळवंडे धरणानेही शंभर टक्के क्षमता गाठल्याने अमृतवाहिनी पुन्हा एकदा वाहती झाली


नायक वृत्तसेवा, अकोले
दक्षिणेतल्या धरणांची परिस्थिती बिकट असताना उत्तरेतल्या धरण क्षेत्रात मात्र पावसाने उच्छाद मांडला आहे. गेल्या काही दिवसांपासून जवळपास पूर्णतः विश्रांती घेणार्‍या वरुणराजाने सोमवारी मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोटाला पुन्हा झोडपल्याने तुडूंब झालेल्या भंडारदर्‍यात पुन्हा पाण्याची आवक सुरु झाली, त्यामुळे भरण्याच्या प्रतीक्षेत असलेला निळवंडेचा जलाशयही गच्च भरला असून धरणातून 1 हजार 305 क्युसेकचा प्रवाह सोडण्यात आला आहे. भंडारदर्‍यानंतर आता निळवंडे प्रकल्पही तुडूंब झाल्याने लाभक्षेत्रातील पाण्याची चिंता संपुष्टात आली आहे.


गेल्या मोठ्या कालावधीपासून मुळा, भंडारदरा व निळवंडे पाणलोटातील पावसाने अपवाद वगळता विश्रांती घेतली होती. त्यामुळे पाणलोटातील पाऊस परतल्याच्या चर्चा सुरु झाल्या असतानाच सोमवारी विशाखा नक्षत्राने काळ्याकुट्ट मेघांना आवतणं धाडल्याने काल दिवसभर पाणलोटात सर्वदूर रिमझीम पावसाने फेर धरला होता. त्याचा परिणाम भंडारदर्‍यातील पाण्याची आवक पुन्हा सुरु झाली, त्यामुळे धरणाच्या पहिल्या क्रमांकाच्या विद्युतगृह जलवाटीकेचे द्वार उघडण्यात आले असून त्याद्वारे 812 क्युसेक्सचा प्रवाह सोडण्यास सुरुवात झाली.


भंडारदर्‍या पाठोपाठ निळवंडे धरणाच्या पाणलोटातील कळसूबाईच्या शिखरांवरही पावसाने काहीसा जोर धरल्याने प्रवरेची उपनदी असलेल्या कृष्णवंतीचा प्रवाह पुन्हा जागता झाला, त्यामुळे ऑगस्टमध्येच ओव्हर फ्लो झालेल्या 112.66 द.ल.घ.फूट क्षमतेच्या वाकी जलाशयावरुनही 197 क्युसेकचा प्रवाह सुरु झाल्याने निळवंड्यात 1 हजार क्युसेकची आवक सुरु झाली आहे. पावसाचा जोर मंदावल्याने यापूर्वीच निळवंड्यातून सोडला जाणारा विसर्ग बंद करण्यात आला होता. मात्र सोमवारच्या पावसाने 8 हजार 320 द.ल.घ.फूट क्षमतेच्या निळवंडे धरणाचा पाणीसाठाही शंभर टक्के केल्याने धरणाच्या विद्युतगृहाद्वारे 650 क्युसेक तर सांडव्याद्वारे 655 क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अमृतवाहिनी प्रवरा पुन्हा एकदा प्रवाहित झाली आहे.


मुळा धरणाच्या पाणलोटातील हरिश्चंद्रगडासह अंबित, कुमशेत, खडकी, कोथळे, पाचनई आदी क्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्याने आकुंचलेली मुळा पुन्हा वेगाने धावू लागली आहे. गेल्या चोवीस तासात मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 979 द.ल.घ.फूट भर पडली आहे. त्यामुळे सोमवारी धरणातून 12 हजार क्युसेक तर आज सकाळी सहा वाजेपासून सात हजार क्युसेकचा विसर्ग सोडला जात आहे. म्हाळुंगी नदीवरील भोजापूर जलाशयही पुन्हा एकदा ओसंडला असून या जलाशयाच्या भिंतीवरुन 190 क्युसेकने पाणी वाहत असल्याने संगमनेरनजीकच्या म्हाळुंगी नदीची पाणीपातळी वाढली आहे. लाभक्षेत्रातही सर्वदूर मुसळधार पाऊस झाला असून संगमनेर तालुक्यातील अनेक भागात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. आजही अहमदनगर जिल्ह्यातील बहुतेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने नद्यांच्या पात्रातील पाण्याचे प्रवाह फुगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


गेल्या चोवीस तासांत घाटघर येथे 66 मिलीमीटर, रतनवाडीत 60 मिलीमीटर, पांजर्‍यात 58 मिलीमीटर, भंडारर्‍यात 45 मिलीमीटर, निळवंडे येथे 61 मिलीमीटर, वाकी येथे 40 मिलीमीटर, कोतूळमध्ये 13 मिलीमीटर, अकोल्यात 80 मिलीमीटर तर संगमनेरात 19 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील चोवीस तासांत मुळा धरणात 979 द.ल.घ.फूट, भंडारदर्‍यात 42 द.ल.घ.फूट, निळवंड्यात 112 द.ल.घ.फूट, भोजापूर जलाशयात 17 द.ल.घ.फूट तर आढळा धरणात 8 द.ल.घ.फूट नवीन पाण्याची आवक झाली आहे.

Visits: 4 Today: 1 Total: 27352

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *