शहरातून समाधानकारक वार्ता तर ग्रामीण भागात संक्रमणाचा वेग कायम..! पठार भागात कोविडचा संसर्ग वाढला, नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दररोज सापडणारी मोठी रुग्णसंख्या आणि संगमनेर असं सूत्र घट्ट असल्याचा अभास असतांना रविवारी हा धागा आश्चर्यकारकरित्या सैल झाल्याने शहरापाठोपाठ तालुक्यातील रुग्णसंख्या झपाट्याने खाली आली असे दिसत होते. त्यातून काहीसा दिलासा मिळत असतांना, आज तो पुन्हा मागे सरुन शहरातील पाच जणांसह तालुक्यातील एकूण 32 जणांचे अहवाल पॉझिटिव आले. आज प्राप्त झालेले सर्व अहवाल रॅपिड अँटीजेन चाचणीतून समोर आले आहेत. आज वाढलेल्या रुग्ण संख्येने तालुका आता 3 हजार 772 वर पोहोचला आहे. आज वाढलेली ग्रामीण रुग्णसंख्या बहुतेक पठार भागातील आहे.
ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून दिलासादायक चित्र दाखवणार्या कोविडने मध्यंतरी अचानक उसळी घेतल्याने आटोक्यात आलेली रुग्णांची प्रतिदिवस सरासरी टप्प्याटप्प्याने पुन्हा वाढली व आजच्या स्थितीत ती तब्बल 44.73 रुग्ण दररोज या गतीवर पोहोचली आहे. गेल्या महिन्यात दररोज 51 रुग्ण समोर येत होते, या महिन्यात सुरुवातीपेक्षा आत्ताची रुग्णगती अधिक असली तरीही गेल्या महिन्याच्या तुलनेत आजचे चित्र काहीसे दिलासादायक आहे.
रविवारी (ता.11) खासगी प्रयोगशाळेकडून सर्वाधीक चौदा जणांचे तर रॅपिड अँटीजेन प्रणालीद्वारा दोघांचे आणि शासकीय प्रयोगशाळेकडून तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले होते. त्यात शहरातील मालदाड रस्त्यावरील 18 वर्षीय तरुण तर नवीन नगर रस्त्यावरील 20 वर्षीय महिला बाधित असल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही अहवाल खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झाले आहेत. त्याशिवाय रॅपिड अँटीजेन चाचणीतून गुंजाळवाडीतील 70 व घुलेवाडीतील 43 वर्षीय महिला बाधित असल्याचे समोर आले आहे.
शासकीय प्रयोगशाळेकडून रविवारी प्राप्त अहवालातून नान्नज दुमाला येथील अवघ्या सहा वर्षीय बालिकेसह कोकणगाव येथील 30 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, तर खासगी प्रयोगशाळेकडून घुलेवाडीतील 48 वर्षीय महिलेसह 33 वर्षीय तरुण, आनंदवाडी येथील 24 वर्षीय तरुण, घारगावमधील 40 वर्षीय महिला, नान्नज दुमाला येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, गुंजाळवाडी शिवारातील गोल्डन सिटी येथील 22 वर्षीय तरुण,
शिंदोडी येथील 28 वर्षीय तरुण, पिंपरी लौकी येथील 50 वर्षीय इसम, वाघापूर येथील 31 वर्षीय महिला, खांजापूर येथील 19 वर्षीय तरुण, रहिमपूर येथील 54 वर्षीय महिला व सुकेवाडीतील 48 वर्षीय महिलेचा अहवाल संक्रमित आला आहे. रविवारच्या 19 रुग्णसंख्येने तालुक्यातील बाधितांची संख्या 3 हजार 742 वर पोहोचली होती, आता आज त्यात आणखी 32 रुग्णांची भर पडली आहे. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे संगमनेर शहरातील रुग्ण वाढीला लागलेली ओहोटी अपवाद वगळता आजही कायम आहे. आज शहरात आढळून आलेले जवळपास सर्व रुग्ण एकाच भागातील आहेत. ग्रामीण भागात दररोज नवनवीन भागातून रुग्ण समोर येण्याचा सिलसिला मात्र अद्यापही कायम आहे.
आज शहरातील कोष्टी गल्लीतून चार रुग्ण समोर आले. त्यात 85 व 50 वर्षीय महिलेसह 55 वर्षीय इसम, तसेच आठ वर्षीय बालिका, आणि चंद्रशेखर चौकातून 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अहवाल प्राप्त झाला आहे. आजच्या चाचण्यांमधून पठारावरील अकलापूरसह चंदनापुरी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या आनंदवाडी मधून अधिक रुग्ण समोर आले आहेत. आजच्या एकूण रुग्ण संख्येत पठार आणि घाटाच्या खालच्या परिसराचाच बहुतेक समावेश समावेश आहे.
ग्रामीण भागातून आज एकूण सत्तावीस रुग्ण समोर आले. त्यात केळेवाडी येथील 60 वर्षीय इसमासह 55 वर्षीय महिला, शेळकेवाडी येथील 55 वर्षीय महिला, भोजदरी येथील 35 वर्षीय तरुण, कुरकुटवाडी येथील 22 व 16 वर्षीय तरुण, आंबी दुमाला येथील 18 वर्षीय तरुणी, अकलापुर येथील 37 व 20 वर्षीय महिलेसह 17 व 15 वर्षीय तरुण, आनंदवाडी येथील 52 इसमासह 40 व 35 वर्षीय तरुण, 45, 38 व 21 वर्षीय महिला, तसेच 12 व चार वर्षे वयाची दोन बालके, झोळे येथील 18 वर्षीय तरुण, संगमनेर खुर्द मधील 30 वर्षीय तरुण, जवळेबाळेश्वर येथील 29 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी पठार येथील चार वर्षीय बालक, जवळेकडलग येथील 52 वर्षीय महिला, तळेगाव येथील 30 वर्षीय तरुण व वडगाव पान येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे. आजच्या रुग्णसंख्येत रविवारच्या तुलनेत जवळपास 60 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने तालुक्याची रुग्णसंख्या आज किंचीत गतिमान होऊन तालुका 3 हजार 772 वर पोहोचला आहे.