संगमनेरातील बेकायदा गोवंश कत्तलखाने धूमधडाक्यात सुरु! ‘त्या’ पोलीस निरीक्षकांचे पत्रकारांना फोन; सगळं काही आलबेल असल्याचाही केला दावा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील सर्वात मोठी कारवाई होवून गेल्या दोन वर्षांपासून ‘कथित’ स्वरुपात बंद असलेले संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने धूमधडाक्यात सुरु झाले आहेत. दररोज शेकडो गोवंश जनावरांच्या कत्तली होवून त्याचे मांस सुरळीतपणे राज्यात विविध ठिकाणी पोहोचवणारी यंत्रणाही कार्यरत झाली आहे. आपल्या कार्यकाळात आपण येथील कत्तलखान्यांवर करडी नजर ठेवून ते कडेकोट बंद ठेवले होते. मात्र आता तो इतिहास झाला असून अहमदनगर पोलिसांनी छापा टाकून अटक केलेल्या निम्म्या कसायांचे कत्तलखाने आता पूर्ववत सुरु झाल्याचा दावा संगमनेर शहरातून बदली होवून गेलेल्या एका वरीष्ठ पोलीस निरीक्षकांनी केला आहे. याबाबत सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शहरातील ‘काही’ पत्रकारांना फोन करुन या विषयाकडे त्यांचे लक्ष्य केंद्रीत केले आहे. पोलीस खात्यातीलच एका वरीष्ठ अधिकार्याने शहर पोलिसांची ‘पोलखोल’ केल्याने शहरातील कत्तलखाने बंद असल्याचा पोलिसांचा दावाही ‘खोटा’ ठरला आहे. यातून कत्तलखान्यांचे ‘येवला’ कनेक्शनही चर्चेत आले आहे.

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू होवून दशकाचा काळ लोटला आहे. या कालावधीत शहर पोलीस ठाण्यात अर्धा डझनहून अधिक पोलीस निरीक्षक आले आणि बदली होवून गेले. त्यातील गोकुळ औताडे या एकमेव पोलीस निरीक्षकांच्या कार्यकाळात संगमनेरातील बेकायदा कत्तलखान्यांना कायद्याचा चाप बसला होता. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी धडाकेबाज कारवाया केल्याने शहरातील कत्तलखाने जिल्ह्याच्या वेशीवरील आळेफाटा येथे हलविण्याच्याही हालचाली सुरु झाल्या होत्या. मात्र दुर्दैवाने त्याचवेळी त्यांची शिर्डीच्या वाहतूक शाखेत बदली झाल्याने कसायांना हायसे झाले. त्यांच्या आधी आणि नंतर आलेल्या अधिकार्यांनी मात्र केवळ कत्तलखाने ‘बंद’ असल्याचा आभास निर्माण करुन ‘बक्कळ’ छापण्याचाच उद्योग केल्याचेही त्यानंतर वेळोवेळी समोर आले.

दोन वर्षांपूर्वी 2020 मध्ये शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी आलेल्या मुकुंद देशमुख यांची संगमनेरातील कारकीर्द तर अतिशय वादग्रस्त ठरली होती. त्यांच्याच कार्यकाळात 2 ऑक्टोबर 2021 रोजी श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी अहमदनगर पोलिसांच्या मदतीने भारतनगर परिसरातील दहा साखळी कत्तलखान्यांवर एकाचवेळी छापा घालून राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यापासूनची आजवरची सर्वात मोठी कारवाई केली. ‘त्या’ कारवाईत पोलिसांनी 31 हजार किलो गोवंशाच्या कापलेल्या मांसासह 71 जिवंत गोवंश, अनेक मालवाहक टेम्पो व अन्य साहीत्य असा एक कोटीहून अधिक रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली होती. यावेळी नवाज कुरेशी या कुख्यात कसायाच्या कत्तलखान्यातून पोलिसांना काही लाखांच्या रोकडसह अनेक रंगाच्या ‘डायर्या’ही हाती लागल्याने व त्यातून पोलिसांच्या दाव्यांचे बिंग फुटण्यासह काही कथीत सामाजिक व राजकीय कार्यकर्ते व काही हप्तेखोर पत्रकारांची नावेही चर्चेत आली होती.

या कारवाई राज्यात ऐतिहासिक संगमनेरची ओळख ‘कत्तलखान्यांचे शहर’ अशी निर्माण झाल्याने नागरी रोष उफाळून आला आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या विरोधात हिंदुत्त्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि त्यांनी नवीन नगर रस्त्यावरील प्रशासकीय भवनासमोर आंदोलनही केले. तेव्हापासून संगमनेरातील ‘ते’ कुप्रसिद्ध कत्तलखाने बंद असल्याचा दावा पोलिसांकडून वारंवार केला जात असला तरीही या दरम्यान भारतनगर वगळता अन्य ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात गोवंशाची कत्तल होत असल्याचे पोलीस कारवाईतूनच समोर आले आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी केलेल्या ‘त्या’ कारवाईत बारा कसायांना अटक होवून दीर्घकाळ त्यांना कारागृहातच खितपत पडावे लागले होते, तर दोघांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला. मात्र त्या कारवाईने शहर पोलिसांवर सामाजिक दबाव निर्माण झाल्याने पोलिसांनी आपले संपूर्ण लक्ष्य भारतनगर परिसरात केंद्रीत केल्याने व कत्तलखान्यांचे चालकही दीर्घकाळ तुरुंगात राहील्याने किरकोळ स्वरुपाच्या कत्तली वगळता येथील कत्तलखाने बंद होते.

या दरम्यान उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवलेल्या एका व्यापार्याने जिल्ह्याची हद्द ओलांडून नाशिक जिल्ह्यातील ‘येवला’ येथे आपला उद्योग थाटला. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या बदलीनंतर त्याचे मनोबल वाढल्याने नुकताच तेथील उद्योग गुंडाळून त्याने आता आपल्या साथीदारासह जोर्वे नाक्याजवळील मौलाना आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस पुन्हा आपला उद्योग जोमाने सुरु केला असून त्यासाठी त्याने ‘येवला’ कनेक्शनचा पुरेपूर वापर केल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून कसायांसह संगमनेरात सुरु आहे. त्यातच संगमनेरातून बदलून गेलेल्या एका वरीष्ठ पोलीस निरीक्षकांनीही शहरातील काही पत्रकारांना फोन करुन दोन वर्षांपासून बंद असलेले बेकायदा कत्तलखाने कसे जोरकसपणे सुरु झाले आहेत याची ‘कन्फर्म’ माहिती दिली. विशेष म्हणजे येथील बंद झालेले कत्तलखाने पुन्हा कसे सुरु झाले, कोणी त्यासाठी मदत केली, कशी केली आणि आताची स्थिती काय आहे याची इत्यंभूत माहितीही ‘त्या’ अधिकार्याने पत्रकारांना सांगितली.

त्यावरुन संगमनेरचे नाव राज्यात बदनाम करणारे ‘ते’ कत्तलखाने आता पुन्हा सुरळीतपणे सुरु झाल्याचे स्पष्ट झाले असून चुटपूट कारवाया करुन त्यांच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा प्रकार केवळ आभास असल्याचेही त्या अधिकार्याच्या बोलण्यातून सिद्ध झाले आहे. संगमनेरकरांनी त्यावेळी केलेल्या ‘गोमाता बचाओ’ आंदोलनाला भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठिंबा दर्शविला होता, तेव्हा ते विरोधी पक्षात होते. मात्र आज भाजप-शिवसेनेचे (शिंदे गट) राज्यात सरकार असतानाही महाविकास आघाडी सरकारच्या काळात ‘बंद’ झालेले संगमनेरातील कुप्रसिद्ध गोवंश कत्तलखाने राजरोसपणे सुरु झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा गोवंश कत्तलखाने सुरु असतील तेथील प्रभारी अधिकार्याला त्याचा उर्वरीत कार्यकाळ नियंत्रण कक्षात घालवावा लागेल असे आदेश काढून तीन पोलीस ठाण्यांच्या प्रभार्यांवर कारवाईचा बडगाही उगारला. गेल्या एक दशकापासून संगमनेरातील कत्तलखान्यांवर शेकडो कारवाया झाल्या, मात्र तरीही येथील कत्तलखाने बंदच होत नसल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनीही जिल्ह्यात ‘नागपूर पॅटर्न’ राबविण्याची मागणी आता हिंदुत्त्ववादी संघटनांकडून केली जात आहे.

